महाराष्ट्रातील भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पराभवाबद्दल ‘ऑर्गनायझर’ पाठोपाठ ‘विवेक’ या रा. स्व. संघाच्या विचारसरणीच्या नियतकालीकांमधून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आल्याने संघ परिवाराला अजित पवारांना बरोबर घेणे बहुधा पसंत पडलेले दिसत नाही. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना फारसे महत्त्व देऊ नका, असेच सुचवायचे असावे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसला. ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवलेल्या भाजप वा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. याउलट महाविकास आघाडीने ३० जागा जिंकून महायुतीला चांगलाच दणका दिला. भाजपच्या खासदारांचे संख्याबळ २३ वरून ९ वर घटले. महायुतीने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी चार जागा सोडल्या होत्या. त्यापैकी फक्त रायगडमध्ये सुनील तटकरे विजयी झाले. बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नीचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा पार धुव्वा उडाला. मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची अपेक्षा असताना राष्ट्रवादीला राज्यमंत्रिपद देऊ केले होते. यामुळे राष्ट्रवादीने राज्यमंत्रिपद नाकारले.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात भाजपमधील वाद टोकाला

महाराष्ट्रातील या पराभवानंतर अजित पवारांना मुख्यत्वे दोष देण्यात येत आहे. ‘ऑर्गनायझर’ने राज्यातील पराभवाबद्दल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर भाजपने केलेल्या युतीवर खापर फोडले होते. यापाठोपाठ मराठी साप्ताहिक ‘विवेक’नेही अजित पवारांबरोबरील युतीने कार्यकर्ते नाराज झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. विवेकने तर संघ परिवारातील विविध संस्था, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपला निष्कर्ष जाहीर केला आहे.

महायुतीत अजित पवारांच्या पक्षाबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचाही समावेश होता. शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार निवडून आले. पण शिवसेनेच्या शिंदे गटाची मते भाजपच्या उमेदवारांकडे हस्तांतरित झाली नाही, असे भाजप नेत्यांचे निरीक्षण आहे. भाजपची हक्काची मते शिंदे गटाकडे हस्तांतरित झाली. याउलट शिंदे गटाची मते मिळाली नाहीत. जेथे शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार होता त्या मतदारसंघात शिवसेनेची सारी मते ठाकरे गटाकडे गेली, असेही भाजप नेत्यांना आढळून आले आहे. पण पराभवाबद्दल भाजप किंवा संघ परिवाराकडून शिंदे यांच्याबद्दल काहीच मतप्रदर्शन करण्यात येत नसल्याबद्दल अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये नापसंती व्यक्त केली जाते. फक्त अजित पवारांनाच लक्ष्य करून काय साधणार, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा – लातूरमधील जातीची गणिते बदलली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फुटीचा भाजपला फायदाच

शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे राज्यात भाजपला राजकीय फायदाच झाला. शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडली नसती आणि दोन्ही पक्ष एकत्रित राहिले असते तर महाराष्ट्रात भाजपचा पार सफाया झाला असता, असे भाजपचे नेते मान्य करतात. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसेनेची मते विभागली व त्याचा भाजपला फायदा झाला. लोकसभेत ठाकरे गटाला १७ टक्के तर शिंदे गटाला १३ टक्के मते मिळाली. शिंदे गटाची ही मते भाजपच्याच फायद्याची ठरली आहेत. याबरोबरच राष्ट्रवादीतील फुटीमुळे चित्र बदलले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १०.२७ टक्के तर अजित पवार गटाला ३.६० टक्के मते मिळाली. यामुळे शिंदे व अजित पवारांना बरोबर घेतल्याचा राज्यात फायदाच झाला, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.