पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एआयएमआयएम) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अनेकवेळा पाकिस्तानची लक्तरं काढली. त्यांनी पाकिस्तानवर तीव्र हल्ला करत दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात आणि भारतात सीमापार दहशतवादी कारवायांना चालना देण्यात पाकिस्तनचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या क्रूरतेचाही निषेध केला आहे. त्यांनी पाकिस्तानला भिकमंगे, जोकर म्हणत अनेकदा पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत. ते नक्की काय म्हणाले..

“पाकिस्तान का दुल्हा भाई”

ओवेसी हैदराबादमध्ये एका पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना त्यांना सांगण्यात आले की, पाकिस्तानी सोशल मीडिया हँडल्सवर त्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यावर त्यांनी उपहासात्मक टीका केली. ते म्हणाले, “अब मैं पाकिस्तान का दुल्हा भाई हूं. इतना बोलने वाला, इतना सुंदर इंसान और कहा दिखेगा उन्हे.” म्हणजेच त्यांनी म्हटले, “मी पाकिस्तानचा राष्ट्रीय भाऊ झालो आहे, त्यांना माझ्यापेक्षा अधिक स्पष्टवक्ता आणि देखणा कोणीही सापडणार नाही.”

“पाकिस्तानी भिकमंगे”

भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान आयएमएफने पाकिस्तानचे कर्ज मंजूर केले. त्यावर ओवेसींनी प्रतिक्रिया दिली आणि म्हटले, “पाकिस्तान अधिकृत भिकमंगे (भिकारी) आहेत.” ते पुढे म्हणाले, “त्यांनी आयएमएफकडून एक अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले. आयएमएफ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नाही, तर ते पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय दहशतवादी निधी देत आहेत. अमेरिका, जर्मनी आणि जपान यांनी हे कसे मान्य केले?,” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “नेतृत्व तर विसरा, पण त्यांना पाकिस्तानची अर्थव्यवस्था कशी चालवायची हेदेखील माहीत नाही. तुम्ही लोक तिथे बसून आम्हाला इस्लाम म्हणजे काय हे सांगत आहात, परंतु तुमच्याकडे फक्त येथील शांतता बिघडवण्यासाठी आणि हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी चुकीची धोरणे आहेत,” असे त्यांनी म्हटले.

“नक्कल करायला अक्कल लागते”

ओवेसी यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी पाकिस्तानी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना चिनी लष्करी सरावाचा फोटो भेट दिल्याबद्दल टीका केली. ओवेसी म्हणाले, “हे मूर्ख जोकर भारताशी स्पर्धा करू इच्छितात. त्यांनी २०१९ च्या चिनी लष्कराच्या सरावाचा फोटो दिला होता आणि तो भारतावर विजय असल्याचा दावा केला होता.” ते पुढे म्हणाले, “पाकिस्तान हेच करत आला आहे. एखाद्या गोष्टीची नक्कल करण्यासाठीही अक्कल वापरावी लागते. या पाकिस्तानी लोकांकडे तेही नाही,” अशी टीका त्यांनी केली. असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर मुस्लीम लोकसंख्येवरूनदेखील टीका केली होती. “पाकिस्तान हा मुद्दा धर्माचा असल्याचे सांगत ते मुस्लीम आहेत असे म्हणू शकत नाही, कारण भारतात मुस्लीम लोकसंख्या जास्त आहे.”

“पाकिस्तानकडून निधीचा गैरवापर”

ओवेसी यांनी पाकिस्तानमध्ये इतर देशांकडून मिळणाऱ्या निधीचा गैरवापर कसा होतो हे उघड केले आणि एलईटी या दहशतवादी गटाला एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्याचे आवाहन केले. ओवेसी म्हणाले, “भारताविरुद्ध दहशतवादी गटांना पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय निधीचा गैरवापर करतो हे सत्य आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओवेसी यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळातील भूमिका

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी भारताने सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर पाठवले आहे. त्यातील भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात असणाऱ्या सदस्यांपैकी ओवेसी एक आहेत. शिष्टमंडळात भाजपा खासदार निशिकांत दुबे, भाजपा खासदार फांगनॉन कोन्याक, भाजपा खासदार रेखा शर्मा, सतनाम सिंग संधू, गुलाम नबी आझाद आणि राजदूत हर्ष श्रृंगला यांचाही समावेश आहे. या शिष्टमंडळाचे उद्दिष्ट सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि अल्जेरियामधील नेत्यांशी संवाद साधत त्यांना २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेल्या प्रतिसादाबद्दल माहिती देणे आहे.