बिहारमध्ये एनडीएत जगावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यात एनडीएमध्ये अनेक प्रादेशिक पक्ष सामील झाल्याने भाजपा अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. भाजपाने जेडी(यू)बरोबर हातमिळवणी केल्याने भाजपाला लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) खासदार चिराग पासवान यांच्यासह त्यांचे काका लोकजनशक्ति पार्टी (लोजपा)चे नेते पशुपती कुमार पारस यांनाही खूश करावे लागणार आहे. लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) आणि लोजपात फार जुना संघर्ष आहे. जानेवारीमध्ये मुख्यमंत्री आणि जेडी(यू) अध्यक्ष नितीश कुमार एनडीएमध्ये परतण्यापूर्वी लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) बिहारमधील भाजपाचा प्रमुख मित्रपक्ष होता. जेडी(यू) एनडीएमध्ये सामील झाल्याने आणि काका पशुपती कुमार पारस यांच्यामुळे नाराज असल्याने चिराग पासवान वेगळा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अलीकडेच चिराग पासवान यांना बिहारमध्ये आठ आणि उत्तर प्रदेशात दोन जागा देण्याची ऑफर इंडिया आघाडीकडून आली आहे. चिराग पासवान यांनी अद्याप यावर आपली प्रतिक्रिया दिली नाही. एनडीएकडून चिराग पासवान यांना सहा जागांची ऑफर देण्यात आली आहे. बिहारमध्ये इंडिया आघाडीकडून चिराग पासवान यांना दोन अधिकच्या जागा देण्याची ऑफर मिळाली आहे. ऑफरमुळेही भाजपा अडचणीत आल्याचे सूत्रांनी सांगितले. आपल्या पक्षासाठी मोठ्या प्रमाणात जागा मिळवून देण्याची ही चिराग यांची रणनीती असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे. एका आरजेडी नेत्याने सांगितले, “चिराग आणि तेजस्वी एकमेकांचा आदर करतात. चिराग यांच्यासाठी आमच्याकडे नेहमीच स्टँडिंग ऑफर असते. निर्णय त्यांचा आहे. लालू प्रसाद आणि रामविलास पासवान यांचे राजकीय संबंध चांगले होते, हे सर्वांना माहीत आहे." काका पुतण्या वाद केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख पशुपती कुमार पारसदेखील एनडीएमध्ये आहेत. त्यामुळे चिराग पासवान यांच्यासह भाजपाला त्यांचे काका पशुपती कुमार पारस यांनाही योग्य जागावाटप करून खूश करावे लागणार आहे. बिहारमध्ये पासवान यांना मानणारा वर्ग ५ ते ७ टक्के आहे. अशात चिराग पासवान आणि काका पशुपती कुमार पारस यांच्यात मतभेद असल्यास मतांची विभागणी होऊ शकते. त्यामुळे जगावाटपाचे आव्हान भाजपासमोर आहे. भाजपाच्या एका नेत्याने सांगितले, “२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, आम्ही बिहारमध्ये लोकजनशक्ती पार्टी आणि जेडी(यू) सह ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यांच्यातील गणित बिघडले, तर नुकसान होईल. आता पारस यांना कसे आणि कुठे सामावून घ्यायचे हे आव्हान पक्षासमोर आहे, कारण हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी चिराग आणि पारस दोघेही आग्रही आहेत.” हाजीपूर हा वडील रामविलास पासवान यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. स्वत:चा पक्ष काढल्याने पशुपती पारस यांनी मतदारसंघावरचा दावा गमावला होता. परंतु पशुपती पारस यांनी पुन्हा हाजीपूरमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. रामविलास यांचा भाऊ म्हणून ते स्वतःला राजकीय दावेदार मानतात. कौटुंबिक वाद सुटणार? चिराग यांनी गेल्या आठवड्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. एका भाजपा नेत्याने सांगितले की, त्यांना आशा आहे की हा वाद लवकरच सोडवला जाईल. पारस यांना समस्तीपूरमधून निवडणूक लढवण्यास सांगितले जाऊ शकते, अशीदेखील चर्चा आहे. सध्या चिराग यांचा चुलत भाऊ प्रिन्स राज या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. हेही वाचा : प. बंगालमध्ये भाजपामधून नेत्यांचं ‘आऊटगोइंग’; नक्की काय घडतंय ममतादिदींच्या राज्यात? भाजपाचा कल चिराग पासवान यांच्या बाजूने दिसतो. रामविलास पासवान यांना मानणारा मतदारवर्ग चिराग पासवान यांच्यासोबत आहे, हे भाजपाला चांगले माहीत आहे. चिराग हे आक्रमक नेते मानले जातात. युवा नेतृत्व असल्यामुळे ते तेजस्वी यादव यांचा प्रतिकार करू शकतात. दुसरीकडे, पारस यांचे फारसे प्रभुत्व दिसत नाही. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय चिराग पासवान यांच्या बाजूने होईल, असे सांगितले जात आहे. चिराग पासवान इंडिया आघाडीत जाऊ नयेत यासाठी भाजपाचा प्रयत्न आहे.