PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वयाची ७५ वर्षे पूर्ण केली असून ते ७६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने देशभरातील अनेक राजकीय नेत्यांसह प्रतिष्ठित व्यक्तींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाजपाने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यादरम्यान अनेकांनी आपापल्या ‘एक्स’ अकाउंटवरून व्हिडिओ शेअर करीत मोदींबरोबरच्या आठवणी सांगितल्या आहेत. सध्या समाजमाध्यमांवर ‘मोदी स्टोरी’ (माझ्या आठवणीतले मोदी) असा ट्रेंड व्हायरल होत आहे. दरम्यान, कोणकोणत्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींबरोबरच्या आठवणी शेअर केल्या? त्याबाबत जाणून घेऊ…

अमित शाहांनी सांगितली मोदींबरोबरच्या प्रवासाची आठवण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबरोबर केलेल्या प्रवासाची आठवण सांगितली. “एकदा मी मोदींबरोबर अहमदाबाद येथून राजकोटला जाण्यासाठी निघालो होतो. या प्रवासादरम्यान रात्रीचे साडेआठ वाजले होते. मोदीजी त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरी जेवण करायचे. मात्र, त्यादिवशी त्यांनी सूर्यनगर परिसरात असलेल्या एका भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या ढाब्यावर कार थांबवली आणि ते जेवायला बसले. त्यावेळी मला आणि आमच्याबरोबर असलेल्या इतर कार्यकर्त्यांना कडाडून भूक लागली होती. त्यामुळे आम्ही पोटभर जेवण केले. मोदींनी मात्र काही फळं आणि चिप्सच खाल्ले. रात्री मी विचार केला की- मोदीजींनी ढाब्यावर जेवण केले नाही. मग त्यांनी कार नेमकी कशासाठी थांबवली होती. नंतर माझ्या लक्षात आले की- त्यांनी कार स्वत:साठी नाही तर इतर कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी थांबवली होती. अशा प्रकारे ते काहीही न बोलता कार्यकर्त्यांची काळजी घेतात,” असे सांगताना अमित शाह भावुक झाले होते.

मोदींच्या एका सल्ल्यामुळेच माझे राजकीय आयुष्य बदलले : जे.पी नड्डा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सल्ल्यामुळेच माझे राजकीय आयुष्य बदलले, अशी आठवण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी सांगितली. ते म्हणाले, “माझ्याकडे हिमाचल प्रदेशच्या विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी असताना मोदीची आमच्या प्रदेशचे प्रभारी होते. एकेदिवशी त्यांनी मला विचारले की तुम्ही विधानसभेत प्रश्न नेमके कसे मांडतात आणि ते कुठून येतात. त्यावर मी वर्तमानपत्रे वाचून आणि नोंदी करून प्रश्न तयार करतो असे उत्तर दिले. माझ्या या उत्तरावर मोदी हसले आणि म्हणाले नड्डाजी विरोधी पक्षनेत्याचे काम फक्त सभागृहापुरते मर्यादित नसावे. तुम्ही लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे. त्यांनी मला प्रत्येक जिल्ह्यात जाऊन लोकांच्या तक्रारी ऐकण्याचा सल्ला दिला. मी तात्काळ त्यांच्या सूचनेचं पालन करून १५ दिवसांतच मी दोन-तीन जिल्ह्यांचा दौरा केला आणि हळुहळू संपूर्ण राज्य पिंजून काढले.”

नड्डा पुढे म्हणाले, “या काळात मी शेतकरी, तरुण, कर्मचारी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांशी थेटपणे संवाद साधला. या अनुभवातून मला खूप काही शिकायला मिळाले आणि त्यामुळेच माझी राजकीय शैली बदलली. मला लोकांच्या समस्यांची थेटपणे जाणीव झाली. विरोधी पक्षही राज्याचे नेतृत्व करू शकतो असा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण झाला. वर्तमानपत्रातून मिळालेली माहिती आणि जनतेकडून मिळालेली माहिती यात किती फरक असतो याची जाणीव मला त्यावेळी पहिल्यांदा झाली. परिणामी, आमच्या पक्षाची प्रतिमा सुधारली आणि आम्हाला पहिल्यांदा सत्तास्थापन करता आली. निवडणुकीच्या वेळीही आम्ही सत्तेत येऊ असे मला कधीच वाटले नव्हते. पण, मोदीजींची रणनीती आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले.”

देवेंद्र फडणवीसांनी सांगितली मोदींबरोबरची आठवण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओत फडणवीस म्हणाले, मोदींबरोबर माझी पहिली भेट नागपूरमध्ये झाली. त्यावेळी माझ्याकडे महापौरपदाची जबाबदारी होती. नागपूर शहरात संघ परिवाराचा अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली होती. देशभरातून आलेल्या वरिष्ठ नेत्यांसाठी उत्तम निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. मोदी नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम डॉ. हेडगेवार यांच्या स्मारकाला वंदन केले.

फडणवीस पुढे म्हणाले, “मी मोदींना राहण्याबाबत विचारला असता त्यांनी अपेक्षेप्रमाणे विश्रांतीगृह न निवडता सरळ रेशीमबागेतील जाण्याचा निर्णय घेतला. तिथे कार्यकर्त्यांसाठी असलेल्या एका छोट्या खोलीत त्यांनी आराम केला. हा क्षण माझ्या अजूनही स्मरणात आहे. त्यांची साधेपणाची आणि संघ परंपरेशी असलेल्या घट्ट नात्याची वृत्ती साक्ष देणारी आहे. त्यावेळी मोदींनी नागपूरमधील संपूर्ण कार्यक्रमाची बारकाईने पाहणी केली होती. कार्यक्रमात सहभागी झालेल्या कार्यकर्त्याला सुविधा मिळत आहे की नाही याची ते खात्री करून घेत होते. तेव्हाच माझ्या मनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अढळ आदर निर्माण झाला.

मोदींनी वडिलांप्रमाणेच माझी काळजी घेतली : पीयूष गोयल

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनीदेखील मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबरोबरचा भावनिक अनुभव शेअर केला. “मोदीजी त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीची खूपच काळजी घेतात आणि त्यांच्यावर बारकाईने लक्ष्य ठेवतात. मी स्वतः हे अनुभवले असून त्यामुळे खूप प्रभावित झालो आहे. मला अनेक वर्षांपासून घशाची समस्या होती आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान मी वारंवार पाणी पित होतो. त्यावेळी मोदींनी मला कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला. इतकंच नाही तर त्यांनी माझ्यासाठी बैठकीत कोमट पाणी पिण्याची सोयही केली,” असे गोयल म्हणाले.

पीयूष गोयल पुढे म्हणाले, “त्या बैठकीतच मला पंतप्रधानांनी विचारले की पीयूष तुला घशाचा उपचार करून घ्यायचा आहे का? त्यावर मी होकार दिल्यानंतर त्यांनी योग चिकित्सा करण्याचा सल्ला दिला. त्या रात्री मी कुटुंबीयांना हा प्रसंग सांगितला. आमची योग शिक्षक शोधण्याबद्दल चर्चा सुरू होती, पण दुसऱ्याच सकाळी पंतप्रधान निवासातून फोन आला आणि सांगण्यात आले की मोदीजींनी तुमच्यासाठी योगतज्ज्ञाची व्यवस्था केली आहे. हे ऐकून मी थक्क झालो. सल्ला देणे एक वेगळी गोष्ट आहे, पण स्वतः पुढाकार घेऊन मदतीची व्यवस्था करणे ही अगदीच वेगळी बाब आहे. त्या दिवशी मला खरोखर जाणवले की माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर कुणीतरी पहिल्यांदा माझी वडिलांसारखी काळजी घेत आहे.”

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला मोदींबरोबरचा अनुभव

दरम्यान- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी तसेच भाजपाच्या इतर दिग्गज नेत्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच्या आठवणी सांगितल्या आहेत. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये पुष्कर सिंह धामी म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाशासित राज्यांमधील मुख्यमंत्र्यांची वाराणसी येथे बैठक घेतली. दिवसभरात या चर्चेनंतर ही बैठक रात्री १० वाजेच्या सुमारास संपली. बैठकीतील सर्वजण थकलेले होते. मात्र तरीही पंतप्रधान रात्रीच्या सुमारास लोकसभा मतदारसंघातील विकासकामे बघण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी बैठकीतील इतरांना आराम करण्याचा सल्ला दिला. मतदारसंघातील विकासकामांची दिवसा पाहणी केल्यास माझ्या सुरक्षेमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यादिवशी मोदींनी मतदारसंघातील विकासकामांची रात्रभर पाहणी केली आणि सकाळी चार वाजता ते निवासस्थानी परतले,” अशी आठवण उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे.