Lakshmanrao Inamdar PM Modi relation देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचदरम्यान मोदींना घडवणाऱ्या एका नावाची सध्या चर्चा सुरू आहे. ते नाव आहे लक्ष्मणराव इनामदार. पंतप्रधान मोदी त्यांना आपल्या आयुष्यातील मार्गदर्शक मानतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) लक्ष्मणराव इनामदार यांनी मोदींच्या वैयक्तिक आयुष्यात आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीतही वडीलतुल्य व्यक्ती म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. नक्की कोण होते लक्ष्मणराव इनामदार? त्यांचा पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या राजकारणावर काय प्रभाव राहिला? जाणून घेऊयात…

लक्ष्मणराव इनामदार कोण होते?

लक्ष्मणराव इनामदार यांचा जन्म १९ सप्टेंबर १९१७ मध्ये झाला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) संस्थापक सदस्य होते. वयाच्या २५ व्या वर्षी, इनामदार महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रचारक म्हणून आले. त्यांचा जन्म पुण्यापासून १३० किलोमीटर दक्षिणेकडील खटाव या गावात झाला होता. तेव्हापासून त्यांनी गुजरातला आपली ‘कर्मभूमी’ मानले आणि पिढ्यानपिढ्या हजारो स्वयंसेवकांना समाज आणि देशासाठी काम करण्याची प्रेरणा दिली. इनामदार यांचा प्रभाव खूप मोठा आहे. त्यांचा प्रभाव अनेक पिढ्यांवर दिसून येतो. चिमणभाई शुक्ला, अरविंदभाई मणियार, वसंतराव गजेंद्रगडकर, केशुभाई पटेल आणि नरेंद्र मोदी यांच्यावर इनामदार यांचा प्रभाव दिसून येतो.

लक्ष्मणराव इनामदार यांचा जन्म १९ सप्टेंबर १९१७ मध्ये झाला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) संस्थापक सदस्य होते. (छायाचित्र-एक्स)

इनामदार यांनी लोकांना राष्ट्र मजबूत करणाऱ्या संस्था उभारण्यासाठी प्रेरित केले. असे म्हटले जाते की, सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. खरंतर, जेव्हा सहकार चळवळीची बरोबरी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि अकार्यक्षमतेशी केली जात होती, तेव्हा त्यांच्यापासून प्रेरित झालेल्या लोकांनी राजकोट सहकारी बँक, जनता सहकारी बँक, पुणे आणि अशा अनेक उत्कृष्ट सहकारी संस्था उभारल्या. ८० च्या दशकात त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. तरीही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आरएसएसची सेवा केली.

मोदी त्यांना आपले गुरु का मानतात?

इनामदार यांना आरएसएसच्या वर्तुळात ‘वकील साहेब’ म्हणूनही ओळखले जाते. मोदी मेहसाणा जिल्ह्यातील वडनगरमध्ये असताना त्यांची ओळख इनामदार यांच्याशी झाली. त्यावेळी इनामदार गुजरातमध्ये आरएसएस चळवळीला बळकटी देत होते. पंतप्रधान मोदींच्या स्वतःच्या म्हणण्यानुसार, वकील साहेब त्यांच्या आयुष्यात १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांच्या गावात आले, तेव्हा त्यांची पहिली भेट झाली. वकील साहेबांबरोबरच्या त्या भेटीची आठवण सांगताना त्यांनी निलंजन मुखोपाध्याय यांना सांगितले, “मी त्यांच्यामुळे खूप प्रभावित झालो, त्यांचे विचार माझ्या हृदयाला भिडले.”

मोदी मेहसाणा जिल्ह्यातील वडनगरमध्ये असताना त्यांची ओळख इनामदार यांच्याशी झाली. (छायाचित्र-जनसत्ता)

कदाचित आरएसएसवरील मोदींचे लक्ष आणि इनामदार यांच्याशी त्यांची मैत्री यामुळेच ते त्यांच्या स्वतःच्या वडिलांपासून दूर गेले. ‘नरेंद्र मोदी: अ पॉलिटिकल बायोग्राफी’ या पुस्तकाचे लेखक अँडी मारिनो यांनी लिहिले आहे, “नक्कीच वडील आपल्या मुलांना मोठे होताना पाहतात, त्यांच्या प्रभावापासून दूर जाताना पाहतात आणि कधीकधी या प्रेमामुळे ते त्याचा रागही करतात. जेव्हा एखादा नवीन वडीलतुल्य व्यक्ती त्यांच्या जागी येतो, विशेषतः वकील साहेबांसारखा स्थानिक स्तरावर प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, तेव्हा ते दुःख जास्त असू शकते.”

मोदी गुजरातला परतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा इनामदार यांच्याशी संपर्क साधला. इनामदार अहमदाबादमधील आरएसएसच्या मुख्यालयात हेडगेवार भवन येथे होते. “जेव्हा मोदी एका महत्त्वाच्या टप्प्यावर होते, तेव्हा इनामदार पुन्हा त्यांच्या आयुष्यात आले,” असे मुखोपाध्याय यांनी त्यांच्या नात्याबद्दल लिहिले आहे. मुखोपाध्याय यांनी पुढे लिहिले, “मोदी १९६८ मध्ये घर सोडून गेले. जेव्हा ते परतले, तेव्हा त्यांची पत्नी अजूनही त्यांची वाट पाहत होती, म्हणून ते अहमदाबादला गेले.” अखेर मोदी इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली हेडगेवार भवनमध्ये स्थायिक झाले, त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

१९७२ मध्ये इनामदार यांनी अधिकृतपणे मोदींना आरएसएसमध्ये घेतले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

१९७२ मध्ये इनामदार यांनी अधिकृतपणे मोदींना आरएसएसमध्ये घेतले आणि त्यांना दिल्लीत पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहनही दिले. १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी (Emergency) लागू केली, तेव्हा आरएसएसवर बंदी घालण्यात आली आणि तत्कालीन पंतप्रधानांच्या टीकाकारांना तुरुंगात टाकण्यात आले. त्याच वेळी, इनामदार यांनी मोदींना दिल्लीत पत्रके वाटून हिंदू राष्ट्रवादी आणि विरोधी नेत्यांमध्ये संदेशांचे आदानप्रदान करण्याची जबाबदारी सोपवली. याच काळात पंतप्रधान मोदींनी पगडी घातलेल्या शीख व्यक्तीचा वेश धारण केला होता.

आणीबाणी उठवल्यानंतर इनामदार यांनी मोदींना ‘विभागीय प्रचारक’ म्हणून बढती दिली आणि त्यांना बडोदा जिल्ह्याचे प्रभारी केले. १९७९ पर्यंत ते ‘संभाग प्रचारक’ म्हणून नडियाद, डांग आणि पंचमहाल जिल्ह्यांचे प्रभारी झाले. मोदींच्या कारकिर्दीला वेग आल्याने इनामदार यांच्याबरोबरच्या त्यांच्या भेटीगाठी कमी झाल्या, परंतु मोदींनी आपल्या मार्गदर्शकाबरोबर वेळ घालवण्याची एकही संधी सोडली नाही.

इनामदार यांच्या निधनानंतर मोदींना त्यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी जाणवली, असे म्हटले होते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

मोदी इनामदार यांच्याबद्दल काय म्हणतात?

इनामदार यांच्या निधनानंतर मोदींना त्यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी जाणवली, असे म्हटले होते. “जेव्हा कधी मला कोणतीही समस्या यायची, तेव्हा मी त्यांच्याशी बोलायचो,” असेही ते म्हणाले होते. पंतप्रधान मोदींनी इनामदार यांच्यावर ‘ज्योती पुंज’ नावाचे पुस्तकही लिहिले. हे पुस्तक त्यांच्या मार्गदर्शकाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी होते. पुस्तकात मोदींनी इनामदार यांच्या कामाची प्रशंसा केली आणि मोहनदास करमचंद गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने न्यायालयातील आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम कसे घेतले, हे सांगितले.

२०२३ मध्ये ‘मन की बात’ च्या १०० व्या भागात, पंतप्रधान मोदींनी इनामदार यांचा उल्लेख केला. “माझे एक मार्गदर्शक, श्री लक्ष्मणराव जी इनामदार होते. आम्ही त्यांना वकील साहेब म्हणायचो. ते नेहमी म्हणायचे की आपण दुसऱ्यांमधील चांगले गुण बघितले पाहिजे. मग तो कोणीही असो, सहकारी असो किंवा प्रतिस्पर्धी असो, आपण नेहमी त्यांचे चांगले गुण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते आपल्यामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या शब्दांनी मला नेहमीच प्रेरणा दिली आहे. मन की बात हे इतरांकडून शिकण्याचे एक महत्त्वाचे माध्यम झाले आहे,” असे ते म्हणाले होते.