पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ आणि २७ मे असे दोन दिवस गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते रेल्वे आणि विविध राज्य सरकारी विभागांच्या २४ हजार कोटी रुपयांच्या अनेक विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच गुजरात दौरा असणार आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके)मधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते.

२६ मे रोजी संध्याकाळी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी एक भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे. या भव्य सोहळ्यात ५० हजारांहून अधिक भाजपा कार्यकर्ते सहभागी होण्याची अपेक्षा आहे. हा रोड शो विमानतळ सर्कल ते इंदिरा ब्रिजपर्यंत म्हणजेच दोन किलोमीटरपर्यंत करण्यात आले आहे. हा संपूर्ण मार्ग राष्ट्रध्वजाच्या रंगांनी सजवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींचा हा दौरा किती महत्त्वाचा असणार आहे? त्याचे स्वरूप कसे असेल? त्याविषयी जाणून घेऊयात.

२४ हजार कोटींच्या प्रकल्पाचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी गुजरातमधील दाहोद, कच्छ आणि गांधीनगर या तीन प्रमुख जिल्ह्यांना भेट देतील. ते २६ मे रोजी दाहोदमधील खारोद येथे एका कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात ते २४ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील, असे एका अधिकृत निवेदनात सांगण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी दाहोदमधील रोलिंग स्टॉक वर्कशॉपमध्ये २१,४०५ कोटी रुपये खर्चून रेल्वे मंत्रालयाने बांधलेल्या लोकोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग शॉपचे उद्घाटन करणार आहेत. ते ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या पहिल्या नऊ हजार एचपी लोकोमोटिव्ह इंजिनचेदेखील उद्घाटन करतील. दाहोद येथील प्लांटची पायाभरणी पंतप्रधानांनी २०२२ मध्ये केली होती.

पंतप्रधान २,२८७ कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचेदेखील उद्घाटन करणार आहेत. या अंतर्गत आनंद-गोधरा, मेहसाणा-पालनपूर आणि राजकोट-हडमतिया रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण, साबरमती-बोटाड रेल्वे मार्गाचे १०७ किलोमीटरपर्यंतचे विद्युतीकरण आणि कलोल-काडी-काटोसन रेल्वे मार्गाचे गेज रूपांतरण करण्यात येणार आहे. महिसागर आणि दाहोद येथील रहिवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी १८१ कोटी रुपयांच्या चार जुथ सुधारणा पाणी पूर्वथा योजनांचे उद्घाटनदेखील करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत १९३ गावे आणि एका शहराला प्रति व्यक्ती १०० लिटर (एलपीसीडी) दराने स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवले जाईल.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुजरात पाणीपुरवठा मंडळाने ४९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नामनार सुधारणे जुथ पाणी पूर्वथा योजनेचे आणि ७० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या खेरोली जुथ सुधारणे पाणी पूर्वथा योजनेचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच, मोदी दाहोद स्मार्ट सिटी अंतर्गत २३३ कोटी रुपयांच्या सार्वजनिक विकास प्रकल्पांचेही लोकार्पण करतील. या प्रकल्पात नगरपालिका इमारत, आदिवासी संग्रहालय आणि इतर सार्वजनिक कल्याणकारी व नागरी सुविधांचा समावेश आहे. ते ५३ कोटी रुपयांच्या पोलिस गृहनिर्माण प्रकल्पांचेही उद्घाटन करणार आहेत.

इतर प्रकल्प कोणते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात ५८१ कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करतील. या प्रकल्पात सावली-टिंबा रस्त्याचे चौपदरीकरण, कायावरोहन-साधली रस्त्याचे रुंदीकरण, जरोड-समल्या रस्त्याचे रुंदीकरण आणि पद्माला-रानोली रस्त्यावरील नवीन पूल यांचा समावेश आहे. ते अमृत २.० अंतर्गत २६ कोटी रुपयांच्या प्रकल्पांची, तसेच महिसागर जिल्ह्यातील बालासिनोर येथे स्वर्णिम जयंती मुख्यमंत्री शहरी विकास योजनेची पायाभरणीदेखील करण्याची शक्यता आहे .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, पंतप्रधान छोटा उदयपूर जिल्ह्यातील २६ कोटी रुपयांच्या भरेज पुलाची आणि ७३ कोटी रुपयांच्या एलसी ६५ येथील रेल्वे ओव्हरब्रिजची पायाभरणी करतील. पंतप्रधान मोदी ३० मे रोजी कानपूरला भेट देणार आहेत. या भेटीत ते जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबाला भेट देण्याची शक्यता आहे.