भाजपा भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ; विरोधकांवर हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले ‘२०४७’ मधील भारताचे स्वप्न

PM Modi Takes Digs At Opposition : भाजपाला निवडणुकीत सर्वदूर यश मिळत असल्यामुळे विरोधक नैराश्यात गेले असून ते संवैधानिक यंत्रणांवर हल्ला करत आहे. पण भाजपा भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई सुरूच ठेवणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Pm Narendra Modi speech
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo – PTI)

PM Modi attacks Opposition over corruption : नवी दिल्ली येथील भाजपा मुख्यालयाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाच्या खासदारांनी कॉंग्रेसच्या कमेरखालील टीकेला न जुमानता सडेतोड उत्तर द्यावे, असे आवाहन मोदी यांनी केले. भाजपाने भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात अभियान सुरू केल्यामुळे सर्व भ्रष्ट नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले असल्याची टीकादेखील पंतप्रधान मोदी यांनी केली. उद्घाटनप्रसंगी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना मोदी यांनी भाजपा हा आता देशव्यापी पक्ष झाला असून भारताविरोधातील शक्तींशी लढत असल्यामुळेच संवैधानिक यंत्रणा आणि सरकारी संस्थांना बदनाम करण्याचा प्रकार विरोधकांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत थेट न बोलता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उलट विरोधकांच्या हेतूवर टीका केली. ते म्हणाले, “आपल्या देशातील संवैधानिक संस्था या देशाचा आधार आहेत. भारताचा विकास रोखण्यासाठी विरोधकांकडून देशाचा आधारस्तंभ असलेल्या संस्थांना लक्ष्य केले जात आहे, त्यांची बदनामी केली जात आहे. आपल्या संस्थांच्या विश्वासार्हतेला तडा जाईल, असे षडयंत्र रचले जात आहे.”

हे वाचा >> “डोकं अदाणींचं अन् पैसा मोदींचा”, अरविंद केजरीवालांचा पंतप्रधानांवर गंभीर आरोप; म्हणाले, “जगातील…”

भारताची प्रगती रोखण्यासाठी हल्ला होत आहे. जेव्हा जेव्हा केंद्रीय यंत्रणा भ्रष्टाचारात गुंतलेल्या लोकांवर कारवाई करतात, तेव्हा यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले जातात. न्यायालयाने एखादा निर्णय दिल्यानंतर न्यायालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते. काही पक्षांनी एकत्र येऊन भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्याची मोहीमच हाती घेतली आहे, असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांच्या बैठकीला संबोधित केले. या बैठीकत मोदी म्हणाले, “नुकत्याच झालेल्या गुजरात पोटनिवडणूक आणि ईशान्य भारतातील निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळाला. भाजपाच्या या यशामुळे विरोधक नैरश्यात गेलेले आहेत. भाजपा जसे यश मिळवत जाईल, तसा विरोधकांकडून आणखी हल्ला केला जाईल.” तसेच भाजपा मुख्यालयात बोलत असताना ते म्हणाले की, एकेकाळी काँग्रेस नेते म्हणायचे की, जनसंघाला मुळापासून उखडून फेका. आज काँग्रेसचे नेते माझी बदनामी करतात. भाजपा आणि जनसंघाला संपविण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले. पण त्यांना एकदाही यात यश मिळाले नाही.

हे ही वाचा >> विरोधकांच्या आक्रमणाला योजनांतून प्रत्युत्तर द्या!, भाजप खासदारांना मोदींचा सल्ला

भाजपाच्या काळात भ्रष्टाचाऱ्यांवर खूप मोठी कारवाई

काँग्रेसच्या काळात देशाने खूप मोठा भ्रष्टाचार पाहिला. भ्रष्टाचाराने या देशाला वाळवीसारखे पोखरून काढले. त्यांच्या काळात भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई हा थट्टेचा विषय होता. मात्र भाजपाच्या काळात भ्रष्टाचाऱ्यांवर कशी कारवाई केली जाते, हे मागच्या नऊ वर्षांत देशातील जनतेने पाहिले. मागच्या नऊ वर्षात भाजपाने भ्रष्टाचाराच्या विरोधात आघाडी उघडली असून अनेक भ्रष्ट नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला. जेव्हा जेव्हा भाजपा सत्तेवर येईल, तेव्हा तेव्हा भ्रष्टाचाऱ्यांवर प्रहार केला जाईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भ्रष्टाचाराच्या विरोधातील कारवाईचा हिशेब देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसच्या २००४ ते २०१४ या काळात देशभरात फक्त पाच हजार कोटींच्या अवैध संपत्तीवर कारवाई झाली. मात्र भाजपाने नऊ वर्षांत १.१० लाख कोटींच्या संपत्तीवर टाच आणली. तसेच या काळात आधीपेक्षा दुपटीने भ्रष्टाचारांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, तसेच १५ पटीने अधिक अटकेच्या कारवाया झाल्या आहेत.

भाजपा परिवारवादाच्या विरोधात जाऊन तरुणांना संधी देणारा पक्ष

भाजपा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे. भारतातील पक्षाची व्याप्ती पाहता भाजपा देशव्यापी पक्ष झाल्याचे दिसते. विविध परिवारांकडून प्रादेशिक पक्ष चालवले जात असताना भाजपा हा एकमात्र पक्ष आहे, जो युवकांना संधी देतो. आपल्या पक्षाला देशातील महिलांचे आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत. आज विकास, अपेक्षा, प्रगती याचा समानअर्थी शब्द म्हणून भाजपाचा उल्लेख केला जातो, असे पक्षाबद्दलचे कौतुकही मोदी यांनी सांगितले. तसेच आज भाजपा हा फक्त मोठा पक्ष नसून दूरगामी योजना असणाराही पक्ष आहे. भारताला आधुनिक आणि विकसित राष्ट्र बनविणे, हे भाजपाचे एकमात्र स्वप्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा >> “१९८४ साली काँग्रेसच्या लाटेसमोर आपला पक्ष संपला होता, पण…”, पंतप्रधान मोदींचं विधान

२०४७ मध्ये भाजपा भारताला विकसित राष्ट्र बनणार

तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९८४ च्या प्रसंगाची आठवण करून दिली. ते म्हणाले, १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर निर्माण झालेल्या भावनिक लाटेवर काँग्रेसला मोठा विजय मिळाला. ज्यामध्ये भाजपाची पीछेहाट झाली. तरीही भाजपाने आपला विश्वास न गमावता संघटना बळकट करण्याचे काम सुरूच ठेवले होते. पक्षाने आजवर दिलेला लढा सोपा नव्हता. भ्रष्टाचार, जातीवाद, वर्गवाद, राष्ट्रविरोधी शक्ती आणि त्यांना पूरक असलेली व्यवस्था यांचे आव्हान भाजपासमोर होते. तरीही भाजपाने निकराने लढा दिला. भारताला २०४७ सालापर्यंत एक पूर्ण विकसित राष्ट्र बनविण्याचे भाजपाचे स्वप्न आहे, त्यासाठी वाट्टेल तो संघर्ष करण्याची आपली तयारी असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 16:21 IST
Next Story
‘कसब्या’मुळे भाजप सावध, बापट कुटुंबियांना संधी ?
Exit mobile version