प्रशांत देशमुख

वर्धा : राज्य कुस्तीगीर परिषदेला लागलेले गटबाजीचे ग्रहण सुटण्या पलिकडे गेल्याचे चित्र पुढे आले असून संघटनेचे सर्वेसर्वा राहलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही आदेश धुडकावून लावण्यात येऊ लागले आहेत. राज्य कुस्तीगीर परिषद क्रीडा क्षेत्रातील बलाढ्य संघटना म्हणून ओळखली जाते. खासदार शरद पवार यांचेच वर्चस्व राहलेल्या या संघटनेस आता वादाचे वळण लागले आहे. पूर्णवेळ देऊ शकत नसल्याने संस्थेचा कारभार शरद पवार यांनी त्यांचे विश्वासू म्हटले जाणारे बाळासाहेब लांडगे यांच्यावर सोपविला.

मात्र गत काही वर्षांत संघटनेकडून भरीव कार्य झाले नसल्याची चर्चा झाली. तिजोरी रिकामी झाल्याने वर्गणी मागून संस्था चालवावी लागत असल्याचा अनुभव खासदार रामदास तडस यांनी सांगितला. यास लांडगे हेच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. देशात कुस्तीक्षेत्रात अव्वल असलेला महाराष्ट्र माघारल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. याबाबी पवारांच्याही कानी गेल्या. त्यांनी खासदार तडस यांना लक्ष घालण्याची सूचना केली होती. दरम्यान भारतीय कुस्ती संघाने २५ ऑक्टोबरला लांडगे महासचिव असलेली कार्यकारिणी बरखास्त केल्याचे पत्र काढले. त्यांच्या कुस्ती विषयक कोणत्याही कार्यक्रमास हजर न राहण्याची तंबी कुस्तीपटू, प्रशिक्षक आदींना दिली.

हेही वाचा: रणजीतराजे भोसले : अभ्यासू नेता

मात्र त्यास न जुमानता लांडगे हे हस्तक्षेप करीतच राहिले. त्यातच त्यांनी नगरला कुस्ती परिषदेचे आयोजन करण्याची घोषणाही केली. हे जरा अतिच झाले म्हणून कार्यकारिणीचे अध्यक्ष असलेल्या तडस यांनी शरद पवार यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. शनिवारी झालेल्या या बैठकीत पवारांनी लांडगे यांना राजीनामा देण्याची सूचना केली. मात्र लांडगे यांनी तयारी दर्शविताना स्वत:च्या विश्वासू व्यक्तीला महासचिवपदी नेमण्याची मागणी केली. त्यास सर्वांनी विरोध केला. पवार व अन्य मान्यवरांनी काका पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने तो निर्णय अमान्य करत बैठकीतून काढता पाय घेतला. आणि वाद कायमच राहला. यापुढे काय हा प्रश्नच उभा राहिला. त्यामुळे राज्यातील कुस्तीक्षेत्राचे काय, ही चिंता कुस्तीप्रेमींना सतावत आहे. कारण कुस्ती सामन्यांचे आयोजन कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असते. मात्र गत दहा वर्षांपासून राज्यात एकही स्पर्धा आयोजित झाली नाही. ही परिस्थिती सुधारण्याचा चंग खासदार तडस यांनी बांधला आहे. ते म्हणतात माझ्या अध्यक्षतेखालील संघटना अधिकृत आहे. त्यास राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यता मिळाली आहे.

हेही वाचा: हातकणंगलेमध्ये चार मोठ्या घराण्यांतील तरुण नेतृत्वाची चाचपणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुणी एखादा मीच सर्वकाही आहे, या गुर्मीत वागत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात अधिवेशन व कुस्ती सामन्यांचे आयोजन करण्याचे ठरले आहे. तेच अधिकृत असल्याचे खासदार तडस निक्षून सांगतात. लांडगे गट काय भूमिका घेतो हे पुढेच दिसेल. एकेकाळी पवारांचे राजकीय शिष्य राहलेले तडस आता कुस्तीक्षेत्रातील पवारांचे अनुयायी राहलेल्या लांडगेंना कशी धोबीपछाड देत मात करतात, हा उत्सुकतेचा भाग आहे.