पुणे : भोर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना प्रवेश देऊन भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांंचे प्राबल्य असलेल्या पुणे जिल्ह्यात त्यांना शह दिला आहे. लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भोरचे माजी आमदार, ज्येष्ठ माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी ५० वर्षांच्या राजकीय वैराला तिलांंजली दिली असताना, आता भाजपने थोपटे यांना पक्षात घेऊन पवार-थोपटे कुटुंबात पुन्हा राजकीय ‘संग्राम’ घडवून आणला आहे. त्यामुळे या कुटुंबातील संघर्षाचे दुसरे पर्व सुरू झाले आहे.

माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केल्याने आगामी काळात भोर विधानसभा मतदार संघात अजित पवार आणि संग्राम थोपटे यांंच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शंकर मांडेकर हे आमदार आहेत. थोपटे हे सलग तीनवेळा या मतदार संघातून निवडून आले होते.

लोकसभा निवडणुकीत थोपटे यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांंचे काम केल्याने सुळे यांना भोरमधून ४७ हजाराचे मताधिक्य मिळाले. खासदार सुनेत्रा पवार यांंच्या पराभवात थोपटे यांंचा मोठा वाटा असल्याने विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थोपटे यांंच्या पराभवासाठी ताकद पणाला लावली. त्यांनी ऐनवेळी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्षाचे कुलदीप कोंडे आणि भाजपचे किरण दगडे हे नाराज झाले. या दोघांंनीही बंडखोरी केली. मात्र, त्याचा फायदा मांडेकर यांना झाला. कोंडे आणि दगडे यांनी सुमारे ५१ हजार मते घेतल्याने मांडेकर हे विजयी झाले. त्यामुळे थोपटे यांना पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला. आता थोपटे हे काँग्रेस सोडून भाजपत गेल्याने अजित पवार यांंच्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आव्हान उभे राहिले आहे.

‘राजगड’ कारखान्याला मदत मिळणार का?

पवार आणि थोपटे हे कुटुंब पारंंपरिक राजकीय वैरी समजले जातात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांंना ज्येष्ठ मंत्री अनंतराव थोपटे यांंना १९९० मधील विधानसभा निवडणूक वगळता एकदाही थोपटे यांना थोपविता आले नाही. १९७२ पासून अनंतराव थोपटे यांच्या ताब्यात भोर मतदार संघ आहे. २००९ पासून ते सक्रिय राजकारणापासून दूर असले, तरी पवार आणि थोपटे यांंच्यातील राजकीय वैर हे कायम होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांंच्यातील सुमारे ५० वर्षांतील राजकीय वैर संपविण्यात आले. त्यामुळे खासदार सुळे यांंना या भागातून भरघोस मते मिळाली. आता पुणे जिल्ह्यातील या राजकीय वैराच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

संग्राम थोपटे हे राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. हा कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. या कारखान्याला राज्य सरकारने ८० कोटी रुपयांंचे मार्जिन कर्ज मंजूर केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांंच्यामुळे सुनेत्रा पवार यांंचा पराभव झाल्याचा वचपा काढण्यासाठी अजित पवार यांनी या कारखान्याला कर्ज देण्यास विरोध केला. त्यामुळे जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली. आता संग्राम थोपटे हे महायुतीत सामील झाल्याने ‘राजगड’वरून अजित पवार आणि थोपटे यांंच्यात संंघर्षाची ठिणगी पडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.