कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू झाल्याने सामान्य जनतेसह लोकप्रतिनिधींनी जल्लोषी आनंद व्यक्त केला आहे. याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून यातून छुपा श्रेयवाद सुरू झाला आहे. यात भाजपने आघाडी घेतली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनाही मागे राहिलेली नाही. तुलनेने इतर पक्षाच्या नेत्यांनी केवळ प्रतिक्रिया देऊन आनंद व्यक्त करण्यात समाधान मानले आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा ,सोलापूर , रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे यासाठी ४० वर्षापासून लढा सुरू होता. त्यासाठी विविध पातळ्यांवर संघर्ष केला जात होता. ५८ दिवसाचे धरणे आंदोलन, न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार, अटक सत्र, वकिलांचे मेळावे, लोकप्रतिनिधींकडे बैठका, शासनाकडे पाठपुरावा, उच्च न्यायालय- सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी अशा विविध पातळीवर हे प्रयत्न सातत्याने सुरू होते. त्याला सहा जिल्ह्यातील बार असोसिएशन व वकिलांचा पाठिंबा मिळत होता. ही मागणी दृष्टीपथात येणार का याविषयी निश्चितपणे काही सांगता येत नव्हते.
याचवेळी उच्च न्यायालयाचे खंडपीठ नसले तरी किमान सर्किट बेंच तरी सुरू व्हावे, असाही मागणीचा एक रेटा सुरू होता. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची निवड झाल्यानंतर त्यांनी या कामी पुढाकार घेतला. त्याला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांचे पाठबळ मिळाले. यातूनच महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रांमध्ये कोल्हापूरमध्ये १८ ऑगस्ट पासून मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू होणार असल्याचे घोषित करण्यात आले. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर कोल्हापुरात वकील सामान्य, जनता यांच्याकडून दिवाळी प्रमाणे स्वागत करण्यात आले.
नेते सरसावले
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ ,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते, माजी पालक मंत्री सतेज पाटील, राज्य कार्यकारी नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, छत्रपती शाहू महाराज, धनंजय महाडिक, धैर्यशील माने या खासदारांसह जिल्ह्यातील सर्व आमदारांनी आनंद व्यक्त केला.
भाजप आघाडीवर
सर्किट बेंच कोल्हापूर सुरू होण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा भाजपने उठवल्याचे दिसते. कोल्हापूर महानगर भाजपच्या जल्लोषात खासदार धनंजय महाडिक, इचलकरंजी महानगरपालिका जल्लोषात आमदार राहुल आवाडे सहभागी झाले होते. साखर पेढे वाटून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला. इतरत्रही भाजपच्या वतीने असाच आनंद व्यक्त करून या निर्णयाचे श्रेय पक्षाकडे घेण्याचा प्रयत्न केला गेला. तुलनेने इतर पक्ष याबाबतीत काहीसे मागे राहिले. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयासमोर छोटेखानी सोहळा पार पडला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, काँग्रेस पक्ष, ठाकरे शिवसेना यांनी यांच्याकडून असे जल्लोषी स्वागत झालेले नाही. काँग्रेसच्या कार्यकाळात शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांनीही या कामासाठी पुढाकार घेतला होता. पण त्याचे श्रेय घेणे काँग्रेसला जमले नाही. महाविकास आघाडी काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडूनही या कामाला गती देण्याचा प्रयत्न झाला असताना शिवसेना या घटनक्रमात कोठेच दिसली नाही. यापुढे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू करणे हे सहा जिल्ह्यातील बारा असोशियशन आणि लोक प्रतिनिधीसमोर आव्हान असणार आहे.