चंद्रपूर येथे नुकताच यशस्वीरित्या पार पडलेला कुणबी समाजाचा कृषी मेळावा सर्वपक्षीय नेत्यांचे राजकीय व्यासपीठच ठरला. मेळाव्यातील सर्वपक्षीय नेत्यांची भाषणे बघितली तर त्याला राजकीय आखाड्याचेच स्वरूप आले होते.

हेही वाचा- अनिल देशमुख यांच्या तेव्हा भाजप प्रवेशाची चर्चा आणि ती घटना….

चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित या तीन दिवसीय कृषी मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्यपालन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. या मेळाव्यात कुणबी समाजाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांनी धनोजे कुणबी समाजाचे संघटन मजबुतीचे दाखले देत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून आल्याचे सांगत पालकमंत्री मुनगंटीवार यांना आगामी लोकसभा निवडणूक बघता तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे जाहीर सूतोवाच केले. त्याला पालकमंत्री मुनगंटीवार यांनी राजकीय शैलीत उत्तर देत, विधानसभेच्या सहा निवडणुकांसह गेल्या ३० वर्षांच्या राजकारणात अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे आता मी निवडणुकांच्या राजकारणापलीकडे गेलो आहे. कुणाचा पाठिंबा मिळेल किंवा नाही, याची चिंता मला नाही. केवळ चांगले काम करीत राहायचे आणि चांगले काम करणाऱ्यांना मदत करायची, असे सांगत ‘जिंकलो म्हणून माजायचे नाही, हरलो म्हणून लाजायचे नाही’, अशी रोखठोक भूमिका मांडली.

हेही वाचा- निवडणूक यंत्रणा हॅक करण्यासाठी इस्त्रायली हॅकर्सचा वापर? काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल

त्याचवेळी कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे खा. बाळू धानोरकर व आ. प्रतिभा धानोरकर दाम्पत्याने समाजातील व्यक्ती मोठ्या पदावर जात असेल तर सर्वांनी तन-मन-धनाने सहकार्य केले पाहिजे, असा सल्ला दिला. राजकारण व पक्ष न बघता मला २०१९ च्या निवडणुकीत आपल्या समाजाने भक्कम पाठिंबा दिला. त्याबद्दल खा. धानोरकर यांनी समाजबांधवांचे आभार मानले. आ. प्रतिभा धानोरकर यांनी धनोजे कुणबी समाजात जन्माला आले, याचा अभिमान असल्याचे सांगितले. एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी केल्या जातात आणि दुसरीकडे समाजातील महिलांचे पाय मागे खेचले जातात, ही बाब दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. मी घाबरणारी महिला नसून लढणारी आहे. १२ पुरुषांविरोधात निवडणूक जिंकून आलेली लोकप्रतिनिधी आहे. प्रामाणिकपणे काम करणारी लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे जनता माझ्या पाठीशी असल्याचे त्या म्हणाल्या. याच मेळाव्याच्या मंचावर आ. किशोर जोरगेवार यांनी कुणबी समाजाच्या उपक्रमाचे कौतुक केले, तर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी उपस्थिती दर्शवून समाजाचे महत्त्व सांगितले. धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मीनगर समिती अध्यक्षांनी समाजाला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, असे सांगितले.

हेही वाचा- ‘कमळ’ फुलवण्यासाठी अमित शहा कोल्हापूरच्या आखाड्यात; सहकार क्षेत्रातही लगबग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेळाव्याला आ. सुभाष धोटे, आ. सुधाकर अडबाले, ॲड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, संजय धोटे, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजुरकर, काँग्रेस नेते सुरेश महाकुलकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊनकर, सचिन भोयर, पप्पू देशमुख, देवानंद वाढई, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया यांच्यासह विविध राजकीय पक्षांची असंख्य नेतेमंडळी उपस्थित होती. यामुळे कृषी मेळाव्याला एकप्रकारे राजकीय व्यासपीठाचे स्वरूप आले होते.