काही महिन्यांपूर्वी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मोठे बंधू व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी असलेले मतभेद बाजूला ठेवण्याची तयारी दर्शवली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात, तर आंबेडकर बंधू का नाही, असे आनंदराज आंबेडकर यांनी त्यावेळी म्हटले होते. मात्र, अवघ्या दोनच महिन्यांनंतर या दोन्ही आंबेडकर बंधूंमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे ते आता एकत्र येण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. असे होण्यामागचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात आनंदराज यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती करण्याचा निर्णय घेतला. शिंदेंचा शिवसेना पक्ष राज्यातील भाजपासोबतच्या महायुतीचा महत्त्वाचा भाग आहे.

आनंदराज यांच्या या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना भाजपा किंवा संघासोबत थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या युती केलेल्या दलित संघटनांना विरोध करण्याचे आवाहन केले. भाजपाप्रणीत एनडीएच्या काळात संविधानाला कोणताही धोका नसल्याचे वक्तव्य आनंदराज यांनी केले. त्यावर आक्षेप घेत प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेनेने त्यांची विचारसरणी शिंदे सेनेशी युती करून अडचणीत टाकल्याचा आरोप केला. “शिवसेनेसोबतची युती ही केवळ संविधान वाचवण्यासाठी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांशी सुरू असलेल्या लढाईला कमजोर करते. तसेच ती फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारसरणीविरोधीही आहे”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“फुले, शाहू व आंबेडकर यांचे अनुयायीच आता ठरवतील की, त्यांनी संविधान बदलून मनुस्मृती आणू इच्छिणाऱ्या भाजपा किंवा संघासोबत उभं राहायचं की संविधानाच्या रक्षणासाठी लढणाऱ्यांसोबत”, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. त्यावर प्रतिक्रिया देताना आनंदराज यांनी म्हटले, “शिवसेनेसोबतची आमची ही युती दबलेल्या आणि मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठीच्या अजेंड्यावर आधारित आहे. आम्ही भाजपा किंवा संघामध्ये सामील झालेलो नाही. मग विचारसरणीशी तडजोड करण्याचा प्रश्न येतोच कुठे? आम्ही आंबेडकरांच्या शिकवणी आणि तत्त्वांना बांधील आहोत.”

प्रकाश आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात वाढत चाललेला हा तणाव हे दोघेही पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेवर पूर्णविराम लावतो. आंबेडकर कुटुंबाशी जवळीक असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या एका नेत्याने सांगितले, “समाज न्याय आणि वंचितांच्या कल्याणासाठी लढणारे दलित नेते एकत्र येऊन एकसंघपणे काम करण्यात अपयशी ठरले आहेत. दुर्दैवाने प्रत्येकाला नेता व्हायचे आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनाही या कमकुवत बाजूला आपल्या फायद्यासाठी वापर करणे सोपे जाते.”

आरपीआयमधील फूट

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सप्टेंबर १९५६ मध्ये केली होती. हा पक्ष ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या विसर्जनानंतर अस्तित्वात आला. मात्र, पुढच्या काही वर्षांमध्ये आरपीआय अनेक गटांमध्ये विखुरली गेली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय अ, आरपीआय गवई, आरपीआय कवाडे व आरपीआय खोब्रागडे यांचा समावेश होता. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आरपीआयचे विविध गट एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला. या गटांनी १९९८ ची लोकसभा निवडणूक काँग्रेससोबत लढवली आणि चार जागा जिंकल्या. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, रामकृष्ण गवई व योगेंद्र कवाडे हे त्यात विजयी झाले; पण ही युती फार काळ टिकली नाही. २००९ मध्ये पुन्हा एकत्र येण्याचाही प्रयत्न फसला.

आंबेडकर कुटुंबातील दोन नातवंडे

विद्यार्थी दशेत असतानाच प्रकाश आंबेडकर आरपीआयशी जोडले गेले. १९९४ मध्ये त्यांनी पार्टी सोडून भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघ स्थापन केला. त्याचे रूपांतर पुढे २०१८ मध्ये वंचित बहुजन आघाडीत झाले. १९९८ मध्ये आनंदराज यांनी आरपीआयपासून वेगळे होण्याचा निर्णय घेत रिपब्लिकन सेनेची स्थापना केली. ही संघटना आंबेडकरवादी तत्त्वांवर आधारलेली असली तरी राज्यात तिचा प्रभाव मर्यादित आहे. मुबंईतील काही भाग आणि विदर्भात दलितांमध्ये या संघटनेचे अस्तित्व आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर अनेक दशकांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असून, त्यांचे सामाजिक आणि राजकीय नेटवर्क विस्तृत आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांच्यातील तणाव पुन्हा एकदा समो
  • आनंदराज आंबेडकरांचा शिंदे सेनेशी संवाद
  • प्रकाश आंबेडकरांचा विरोध
  • रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून शिंदे सेनेला दलित समाजात पाय रोवण्याची संधी
  • स्थानिक राजकारणातही फायदा

नोव्हेंबर २०२२ मध्ये शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी केली. दोघांनी भाजपाकडून संविधान आणि लोकशाहीला धोका असल्याचा आरोप करीत एकत्र येण्याचे कारण सांगितले. मात्र, २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांआधी उद्धव-प्रकाश यांची युती तुटली. वंचित बहुजन आघाडीने ही निवडणूक एकट्याने लढली आणि त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

प्रकाश यांचे टीकाकारच नाही, तर काही दलित समाजातील लोकही मानतात की, ते समाजाचे प्रभावी नेतृत्व करण्यात अपयशी ठरले आहेत. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्यावेळीसुद्धा त्यांना एकही जागा मिळवता आली नाही. मात्र, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी युतीला अनेक जागांवर धर्मनिरपेक्ष मतांची फूट घडवून नुकसान केल्याचे म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे सेनेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रिपब्लिकन सेनेला हाताशी धरले आहे. प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दलितांच्या पाठिंब्यासाठी रिपब्लिकन सेनेशी युती केली आहे. आनंदराज यांच्यासाठी ही युती त्यांना स्थानिक पातळीवर राज्याच्या राजकारणात पाय रोवण्याची संधी आहे. त्यांनी म्हटले, “ही युती वंचित घटकांच्या कल्याणासाठी आहे. त्यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ मिळेल.”
वंचित बहुजन आघाडीचा शिंदेच्या ताकदीपुढे झुकल्याचा आरोप फेटाळून रिपब्लिकन सेनेच्या एका नेत्याने लक्षात आणून दिले की, प्रकाश यांनीही २०२४ च्या निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा आता शिंदे सेना आनंदराज यांना ही संधी मिळू देईल का हे पाहणे महत्त्वाचे असेल.