संतोष प्रधान
महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्याचा निर्णय काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीने घेतला असला तरी प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसबाबतची भूमिका, जागावाटपाचा तिढा या साऱ्या बाबी लक्षात घेतल्यास वंचित निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीबरोबर राहिल का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करणार का, याबाबत अनेकदा विचारणा केली होती. त्याच वेळी प्रवेशासाठी अटही घातली होती. आघाडीत प्रत्येकी १२ जागा वाटून घ्याव्यात अशी त्यांची सुरुवातीला भूमिका होती. तिन्ही पक्षांना ही भूमिका मान्य नव्हती. प्रकाश आंबेडकर यांच्या एकूणच भूमिकबद्दल तिन्ही पक्षांमध्ये संशयाचे वातावरण होते. पण दबाव वाढू लागल्याने अखेर महाविकास आघाडीत वंचितला प्रवेश देण्यात आला आहे. जागावाटपावर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत स्वत: प्रकाश आंबेडकर सहभागी होण्याची शक्यता आहे. खरी कसोटी जागावाटपातच आहे.
हेही वाचा… खासदार बारणे यांचा दिल्लीचा मार्ग खडतर ?
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपापल्या कोट्यातील जागा वंचितला सोडावी, अशी तिन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांना अकोल्याची जागा सोडण्यावर सर्वाचे एकमत झाले आहे. याशिवाय अन्य कोणत्या जागा देता येतील यावर खल सुरू आहे. खरा प्रश्न प्रकाश आंबेडकर किती जागांची मागणी करतात आणि महाविकास आघाडीचे नेते किती जागा त्यांना सोडतात यावर सारे अवलंबून आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपाचे पत्ते अद्याप खुले केलेले नाहीत. पण ते जास्त जागांची मागणी लावून धरण्याची शक्यता आहे. प्रत्येक मतदारसंघात वंचितची सुमारे अडीच लाख मते असल्याचे अधोरेखित करीत आंबेडकर यांनी जागावाटपात नमते घेणार नाही हा संदेश सुरुवातीलाच दिला आहे.
भाजपचा पराभव करणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे प्रकाश आंबेडकर हे वारंवार भूमिका मांडत आहेत. त्यासाठी बिगर भाजप पक्षांनी एकत्र येण्याची त्यांची भूमिका आहे. पण हे करताना वंचितची भूमिका काय असणार हे महत्त्वाचे असेल. नांदेड, सोलापूरसारख्या जागांवर वंचितने दावा केल्यास काँग्रेस ते मान्य करणार नाही.
हेही वाचा… कोल्हापुरात महालक्ष्मी विकास आराखड्यावर अजित पवारांच्या भूमिकेवरून संतप्त भावना
एकत्र लढल्यास फायदाच
शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी, शेकाप, समाजवादी पक्ष, डावे पक्ष हे सारे इंडिया आघाडीचे घटक पक्ष एकत्र लढल्यास त्याचा महाविकास आघाडीला निवडणुकीत फायदा होऊ शकतो. गेल्या निवडणुकीत वंचितमुळे नांदेड, सोलापूर, सांगलीसह सहा ते सात मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना त्याचा फटका बसला होता. अर्थात, वंचितची तेवढी मते कायम राहतील का ? तरीही एकत्र लढल्यास त्याचा निश्चितच महाविकास आघाडीला फायद होऊ शकतो. यामुळेच आंबेडकर यांना बरोबर घेण्याबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मनात संशयाची भावना असली तरी राजकीय फायद्याचे गणित डोळ्यासमोर ठेवून त्यांना आघाडीत समाविष्ठ करण्यात आले आहे.