एजाजहुसेन मुजावर

सोलापूर : राज्यात सत्तांतर नाट्य घडण्याअगोदरपासून सोलापुरात काँग्रेस पक्षाची अवस्था बिकटच होती. सध्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघापुरताच काँग्रेस पक्ष मर्यादित राहिला आहे. त्यामुळे सोलापूर महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत गमावलेली सत्ता पुन्हा मिळविण्यापेक्षाही स्वतःची ताकद वाढविण्याचे पहिले आव्हान पक्षासमोर उभे राहिले आहे. हे आव्हान पक्षापेक्षाही आमदार प्रणिती शिंदे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

Amravati, Vanchit Bahujan Aghadi,
अमरावतीत ‘वंचित’मध्‍ये फूट; जिल्‍हाध्‍यक्षांचा काँग्रेसला पाठिंबा
Mohite-Patil, Mohite-Patil family revolt,
मोहिते-पाटील कुटुंबीयांचे २१ वर्षांनंतर पुन्हा बंड !
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…
spokesperson, Congress
काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !

आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली असता त्यात काही सर्वपक्षीय मातब्बर, प्रस्थापित मंडळींना धक्का बसला तर काहीजणांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. आरक्षण सोडतीच्या संदर्भात हरकती दाखल होतील आणि त्याची औपचारिकताही पूर्ण होईल. परंतु त्यातून परिस्थिती फारशी बदलणार नाही, असे दिसते. या पार्श्वभूमीवर शहरात सर्व राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत.

यापूर्वी १९८५ सालचा पुलोदचा प्रयोग वगळता महापालिकेवर वर्षानुवर्षे काँग्रेसची एकहाती सत्ता होती. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या गटात सत्तापदे वाटून घेतली जायची. त्यातून शरदनिष्ठ युन्नूसभाई शेख आणि नंतर तत्कालीन सुशीलनिष्ठ विष्णुपंत कोठे यांच्या मार्फत महापालिकेच्या कारभाराची सूत्रे हलत असत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरही भागीदार म्हणून राष्ट्रवादीचा सत्तेत सहभाग राहिला होता. सुशीलकुमार शिंदे आणि विष्णुपंत कोठे यांच्यात शीतयुध्द सुरू झाल्यानंतर शहरात भाजपचे कमळ फुलू लागले, त्याचवेळेस काँग्रेसची ताकद घटण्यास सुरूवात झाली. आगामी महापालिका निवडणुका लढविण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महाविकास आघाडीचे अस्तित्व कायम ठेवतील किंवा कसे, याचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. राज्यात सत्तांतर नाट्य घडल्यानंतर शिवसेनेची बदलती भूमिका पाहता पुन्हा महाविकास आघाडी होण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोलापुरात महाविकास आघाडी झाली तरी त्यातून एकमेकांच्या विरोधात संशय, अविश्वासाचे असलेले वातावरण संपुष्टात येण्याची शक्यता वाटत नाही, असा जाणकारांचा होरा आहे.

हेही वाचा… संजय राऊत : भाजपच्या दृष्टीने युतीची नाळ तोडणारा खलनायक गजाआड

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे आता राजकारणात फारसे सक्रिय राहिले नाहीत. सोलापुरात त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडेच पक्षाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. परंतु मागील पाच वर्षांचा शहरातील काँग्रेसचा लेखाजोखा विचारात घेता आमदार प्रणिती शिंदे यांना पक्ष संघटनेची बांधणी करता आली नाही, उलट पक्षाची ताकद घटतेच आहे. शहरात काँग्रेस पक्षावर प्रामुख्याने सुशीलकुमार शिंदे व आता आमदार प्रणिती शिंदे यांचाच प्रभाव राहात आला आहे. यात माजी खासदार धर्मणा सादूल, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, सत्यनारायण बोल्ली, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया यांच्यासारख्या जुन्या जाणत्या नेते मंडळींना फारसे काही स्थान उरले नाही. ॲड. बेरिया यांनी तर आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी थेट पंगा घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे पसंत केले आहे. दिवंगत स्थानिक नेते विष्णुपंत कोठे यांचे पुत्र महेश कोठे हे काँग्रेसनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेल्या संपर्कामुळे त्यांचे मन राष्ट्रवादीतही रमत नसल्याचे दिसते. महेश कोठे यांच्या राजकीय विश्वासार्हतेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना त्यांचे पुढील राजकीय भवितव्य आगामी महापालिका निवडणुकीवर अवलंबून राहणार आहे.

आमदार प्रणिती शिंदे व महेश कोठे यांचीही मानसिकता पाहता हे दोघेही एकमेकांशी जुळवून घेण्याची शक्यता यापूर्वीच मावळल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीने आगामी महापालिका निवडणूकीत महेश कोठे यांच्यावर भिस्त ठेवून सत्ता संपादनाचे गणित आखले होते. हे गणित आता बिघडण्याचीच चिन्हेच अधिक आहेत. शिवसेनेचे तर दोन्ही काँग्रेसबरोबर सूर जुळणे अशक्य दिसते, अशी परिस्थिती आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोंडीची माहिती एका क्लिकवर…

या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ताकद टिकवून ठेवण्याचा आणि त्यात वाढ करण्याचा प्रयत्न आमदार प्रणिती शिंदे करीत असल्या तरी त्यांच्या एकखांबी नेतृत्वाला हे सारे आव्हान कितपत झेपणार, याबद्दल शंका व्यक्त होत आहे. त्यांच्यासमोर भाजपसह एमआयएम पक्षाचेही आव्हान आहे. २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव होऊन पक्षाला अपमानाजनक स्थितीला सामोरे जावे लागले होते. पक्षाचे तत्कालीन शहराध्यक्ष सुधीर खरटमल (खरटमल आता राष्ट्रवादीवासी झाले आहेत.) यांच्या हातून पक्षाच्या उमेदवारांना एबी फाॕर्म देताना झालेला महाघोटाळा आणि त्यात सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिष्ठा पणाला लावून पक्षाची वाचविलेली इभ्रत इथून नन्नाच्या पाढ्याला सुरुवात झाली आणि तिचा शेवट पक्षाने महापालिका गमावण्यात झाला. मागील महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ४९ जागा जिंकून सत्ता मिळविली होती. तर काँग्रेसला अवघ्या १४ जागांवर समाधान मानावे लागले होते. शिवसेनेने २१ तर नवख्या एमआयएमने ९ जागा मिळवून काँग्रेसची वाट रोखून धरली होती. राष्ट्रवादीला केवळ ४ जागा मिळाल्या होत्या. वंचित बहुजन आघाडी (४) आणि माकप (१) हे पक्ष कसेबसे अस्तित्व टिकवून होते.

आता आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला घेरता येण्यासारख्या अनेकविध संधी असूनही दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेसह अन्य विरोधकांवर स्वतःची ताकद गमावून बसण्याची पाळी येते की काय, अशी धोक्याची परिस्थिती आतापासूनच दिसू लागली आहे. यात काँग्रेसची नाव आणखी खोल बुडणार की तावून सुलाखून बाहेर येणार, हे आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वावर अवलंबून राहणार आहे. त्यादृष्टीने विचार करता आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे, असे दिसते.