बिहारमध्ये पुढील महिन्यात दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहे. प्रशांत किशोर यांचा जन सुराज्य पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राज्यात यंदा तिरंगी लढत होत आहे. यादरम्यान प्रशांत किशोर यांनी मंगळवारी जाहीर पत्रकार परिषद घेत निवडणुकीबाबत मोठं भाकित केलं आहे. त्याशिवाय सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर त्यांनी गंभीर आरोपही केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून जन सुराज पक्षाच्या उमेदवारांना धमकावले जात असल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. भाजपाची निवडणुकीवरील पकड सैल होत असल्याने आता त्यांच्याकडून दबावतंत्राचा वापर होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
प्रशांत किशोर यांचा आरोप काय?
प्रशांत किशोर यांच्या या आरोपांमुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाकडून विरोधी पक्षांच्या उमेदवारांना खरेच धमकावले जात आहे का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. पाटण्यातील शेखपुरा हाऊस येथील जाहीर पत्रकार परिषदेत प्रशांत किशोर म्हणाले, “मागील काही वर्षांत झालेल्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला विजय मिळाला तरी राज्यात भाजपाचेच सरकार स्थापन होते. यंदा मात्र वेगळेच चित्र असून बिहारची जनता भाजपाला सत्तेतून बाहेर करण्यास उत्सुक आहे, त्यामुळेच भाजपाला पराभवाची भीती वाटत असल्याने ते जन सुराज पक्षाच्या उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
भाजपाकडून निवडणुकीत दबावतंत्राचा वापर?
पुढे बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. जन सुराज पक्षाला बिहारमध्ये मोठा पाठिंबा मिळत असल्यामुळे भाजपा आणि त्यांच्या उमेदवारांचा विजयाचा आत्मविश्वास कमी झाला आहे. राज्यावरील पकड सैल होण्याच्या भीतीपोटी ते आमच्या पक्षातील उमेदवारांवर निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाव आणत आहेत. दानापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाने जन सुराज पक्षाचे उमेदवार अखिलेश कुमार उर्फ मुतुर शाह यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले आहे. त्यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिवसभर एकाच आपल्याबरोबर ठेवले होते, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला आहे.
अमित शाहांवर केला गंभीर आरोप
“मुतुर शाह याचे राष्ट्रीय जनता दल पक्षातील गुंडांनी अपहरण केल्याची अफवा बिहारमध्ये उठवण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर होते. निवडणूक आयोगाने या गोष्टीची गंभीर दखल घ्यायला हवी. एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला नामांकन अर्ज भरण्यापासून रोखणे आणि त्याला दिवसभर आपल्याबरोबरच ठेवणे ही केंद्रीय गृहमंत्र्यांची कृती योग्य आहे का?” असा प्रश्नही प्रशांत किशोर यांनी उपस्थित केला. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही किशोर यांनी टीकेचा भडिमार केला. धर्मेंद्र प्रधान यांनी जन सुराज पक्षाच्या तीन उमेदवारांवर नामांकन अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला, असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला. या आरोपांचा पुरावा म्हणून त्यांनी धर्मेंद्र प्रधान आणि जन सुराज पक्षाचे ब्रह्मपूर मतदारसंघातील उमेदवार डॉ. सत्य प्रकाश तिवारी यांचा एक कथित फोटोदेखील पत्रकार परिषदेत दाखवला.
निवडणूक आयोगावर किशोर यांची टीका
प्रशांत किशोर यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाला जर उमेदवारांचीच काळजी नसेल तर ते मतदारांचे संरक्षण तरी कसे करतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीआधी सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकावून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांवरही अशाच प्रकारचा दबाव टाकला जाऊ शकतो, अशी भीती प्रशांत किशोर यांनी बोलून दाखवली. आतापर्यंत जन सुराज्य पक्षाच्या १४ उमेदवारांना धमक्या मिळालेल्या आहेत. मात्र, ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. कोणी कितीही दबावतंत्राचा वापर केला तरी आम्ही ही निवडणूक लढवू आणि जिंकू असा विश्वासही किशोर यांनी व्यक्त केला.
बिहारमधील तरुण मतदारांना केले आवाहन
बिहारमधील तरुण मतदारांनी सत्ताधारी पक्षाचे षडयंत्र लक्षात घेऊन मतदान करावे आणि आपल्या पूर्ण ताकदीनिशी राज्यात सत्तांतर घडवून आणावे, असे आवाहन प्रशांत किशोर यांनी केले. उमेदवारांच्या निवडीबाबत बोलताना, जन सुराज पक्षाने अति मागासलेल्या समाजातील ५४ आणि मुस्लीम समुदायातील ३४ उमेदवारांना तिकीट दिले आहे. या दोन्ही समुदायाला कोणत्याही पक्षाने दिलेला हा आजवरचा सर्वाधिक वाटा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशांत किशोर यांनी केलेल्या आरोपांवर भारतीय जनता पक्षाने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेला नाही, त्यामुळे या आरोपांना सत्ताधारी कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रशांत किशोर यांनी सुरुवातीला विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यासाठी मतदारसंघाची चाचपणीदेखील करण्यात आली. मात्र, ऐनवेळी किशोर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आपण निवडणूक लढवली तर जन सुराज पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराकडे दुर्लक्ष होईल, असे कारण त्यांनी यावेळी सांगितले होते.