मुंबई : भाजपला फक्त वंचित बहुजन आघाडीच लढत देऊ शकते, असा दावा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला असतानाच, वंचितला उमेदवार माघारीचे ग्रहण लागले आहे. वंचितने आत्तापर्यंत ३४ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यातील नऊ उमेदवारांनी ऐनवेळी रणांगणातून पळ काढल्याने मिळेल तो उमेदवार देण्याची वेळ वंचितवर ओढावली आहे.

शिरुरमध्ये मंगलदास बांदल हे महायुतीच्या व्यासपीठावर गेल्याने त्यांची उमेदवारी रद्द करत तेथे अफताब शेख यांना उमेदवारी दिली. दिंडोरीमध्ये गुलाब बर्डे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी ऐनवेळी नकार दिल्याने मालती थविल यांना उमेदवारी दिली. रामटेकमध्ये शंकर चहांदे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र काँग्रेसचे बंडखोर किशोर गजभिये यांना वंचितने नंतर उमेदवारी दिली. यवतमाळ-वाशिममध्ये सुभाष पवार यांनी प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतली. वंचितने तेथे अभिजीत राठोड यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरला. त्यामुळे अपक्ष उमेदवार अनिल राठोड यांना पाठिंबा दिला.

हेही वाचा – केरळमध्ये तिरंगी लढतीचा फायदा भाजपलाच ५ पेक्षा जास्त जागा मिळतील! पक्षाचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांचा विश्वास

अमरावतीमध्ये प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र आंबेडकर यांचे बंधू आनंदराज तेथे रिपब्लिकन सेनेचे उमेदवार म्हणून उभे राहिले. त्यामुळे तेथे आनंदराज यांना पाठिंबा द्यावा लागला. सोलापूरमध्ये राहुल गायकवाड यांनी पक्षनेतृत्वावर आरोप करत उमेदवारी मागे घेतली. जळगावमध्ये प्रफुल्ल लोढा यांनी ऐनवेळी लढण्यास नकार दिला. आता तेथे युवराज जाधव यांना उमेदवारी दिली. उत्तर-मध्य मुंबईतून अब्दुल खान यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांना आता दक्षिण- मध्यमधून लढण्यास सांगण्यात आले आहे. परभणीत बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर झाली होती. तेथे आता पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आली.

हेही वाचा – “नेहरू, इंदिरा गांधी मूर्ख नव्हते, देशाला एका साच्यात बसवणं अशक्य”, जेएनयूच्या कुलगुरूंची स्पष्टोक्ती

नऊ मतदारसंघात वंचितने कोणत्या ना कोणत्या कारणांनी उमेदवार बदलले आहेत, त्यातील बहुतांश मतदारसंघ राखीव आहेत. वंचितने ३४ उमेदार उभ केले आहेत. बारामती, नागपूर, यवतमाळ-वाशिम, अमरावती, भिवंडी, कोल्हापूर या ६ मतदारसंघात इतर पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. आता निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील उमेदवारीबाबत पक्षात खल सुरू आहे.