दयानंद लिपारे
कोल्हापूर: सीमाभागात विधानसभा निवडणुकीवेळी एकीकरण समिती अंतर्गत मतभेद, गटबाजी त्यातून उद्भवणारी बंडखोरी असे नकारात्मक घटक बाजूला असल्याने यावेळच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत यश साथ देईल असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. महाराष्ट्र एकीकडे समितीच्या भगव्या झेंड्याखाली सहा उमेदवारांनी रिंगणात उतरले आहेत. भाजप व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांच्या तगड्या उमेदवारांशी दोन हात करून निवडून येण्यासाठी एकीकरण समितीच्या उमेदवारांनी दंड थोपटले आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारचा अखेरचा दिवस ढगाळ वातावरणात प्रचाराने ढवळून निघाला. यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदरात नेमके कोणते आणि किती यश मिळणार याकडे लक्ष लागले आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षातील एकीकरण समितीतील अंतर्गत राजकारणाचा फटका उमेदवारांना बसत राहिला आहे. तरीही कधी पाच कधी दोन आमदार निवडून येत. गेल्या वेळी तर एक ही जागा एकीकरण समितीला जिंकता आले नाही. बेळगाव महापालिकेच्या संख्याबळात दुहेरी आकडा गाठता आला नाही. एकीकरण समितीच्या राजकारणाचा प्रवास असा घसरणीला लागला असताना यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बरेचसे अनुकूल वातावरण बेळगाव जिल्ह्यामध्ये दिसत आहे.
आणखी वाचा-बाजार समित्यांमध्ये ताकद वाढवून भाजपचे पक्ष बांधणीत पुढचे पाऊल
गेल्या काही निवडणुकीमध्ये एकीकरण समितीच्या दोन्ही गटाकडून उमेदवार दिले जात. त्यांची एकमेकांत लढतानाच ताकद खर्ची पडत असे. परिणामी भाजप किंवा काँग्रेसच्या उमेदवारांची सरशी होत असे. दोन्ही एकीकरण समितीने डावलेले काही जण स्वतंत्रपणे रिंगणात उतरत असत. काँग्रेस-राष्ट्रवादीने पुरवलेल्या रसदीच्या ताकदीवर ते जी ५-१० हजार मते घेत तीच मते अधिकृत उमेदवारांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरत असत. ही पार्श्वभूमी पाहता असे दुर्गुण बरेचसे दूर झाल्याचे चित्र यावेळी दिसत आहे. एकीकरण समितीचे दोन्ही गट जवळ आले आहेत. यातून एकच अधिकृत उमेदवार दिला गेला आहे. बंडखोरीचे प्रमाणही बरेचसे घटले आहे. याचा फायदा यावेळी एकीकरणच्या उमेदवारांना होईल असे आशादायक वातावरण अखेरच्या टप्प्यात दिसत आहे.
बेळगाव दक्षिण मतदारसंघात तीन वेळा विजय मिळवलेले भाजपचे अभय पाटील यांना याहीवेळी जिंकण्याचा आत्मविश्वास असला तरी त्यांच्यापुढे एकीकरण समितीच्या रमाकांत कोंडुसकर यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. कोंडुसकर यांनी पूर्वी श्रीराम सेनेमध्ये काम केले असल्याने तिकडे यंत्रणा कशी हाताळली जात होती याचाही त्यांना अनुभव आहे. काँग्रेस अंतर्गत राजकारणात सतीश जारकीहोळी या बऱ्या नेत्यांनी अभय पाटील यांना शह देण्यासाठी काँग्रेसचा कमकुवत उमेदवार उभा केला आहे. याचा फायदा कोंडुस्कर यांना होईल अशी लक्षणे आहेत.
आणखी वाचा- राज ठाकरेंबद्दल केवळ कुतुहल, उध्दव ठाकरेंच्या राजकीय खेळीची चर्चा
बेळगाव ग्रामीण मध्ये काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विकास कामे, लोकसंपर्क यातून स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली आहे. येथे भाजपने नागेश मंनोळकर यांना उमेदवारी दिली असल्याने पक्षांतर्गत तीव्र नाराजी दिसते . माजी आमदार संजय पाटील, धनंजय जाधव, विनायक कदम हे डावलले गेलेल्या इच्छुक उमेदवारांचा परिणाम निकालावर होणार असे दिसत आहे. यामुळे एकीकरण समितीचे आर. एन. चौगुले यांना पोषक वातावरण असल्याचे मानले जाते. खानापूर मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाची काँग्रेस आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना भाजपचे विठ्ठल हलगेकर यांनी कडवे आव्हान दिले आहे. गेल्यावेळी हलगेकर हे अडीच हजाराच्या मतांनी पराभूत झाले होते. येथे भाजपचे अनेक जण इच्छुक असले तरी ग्रामीण प्रमाणे नाराजीचा सूर दिसत नाही. अशाही परिस्थितीमध्ये एकीकरण समितीचे मुरलीधर पाटील यांनी आव्हान निर्माण केले आहे. ठाकरेसेनेने के. एम. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी येथे एकीकरण समितीला शिवसेनेचा पाठिंबा राहील असे जाहीर केले असले तरी पाटील हे अजूनही प्रचारात आहेत. ही परिस्थिती मतदानावर प्रभाव टाकू शकते असे चित्र आहे.
यमकनमर्डी मतदार संघात काँग्रेसचे तगडे नेते सतीश जारकीहोळी स्वतः लढत आहेत. एकीकरण समितीचे मारुती नाईक येथे लढत देत आहेत. गतवेळी जारकीहोळी यांना कडवी झुंज देणारे मारुती अष्टगी आता त्यांच्या छावणीत दाखल झाले आहेत.
आणखी वाचा-गडकरींना वारंवार अधिकाऱ्यांचे कान का पिळावे लागतात?
बेळगाव उत्तर मतदार संघामध्ये भाजपचे माजी आमदार अनिल बेनके यांना उमेदवारी नाकारली असल्याने ते नाराज झाले आहेत. भाजपने लिंगायत समाज फॅक्टर लक्षात घेऊन डॉ. रवी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. एकीकरण समितीचे ऍडव्होकेट अमर येळ्ळूरकर नशीब आजमावत आहेत.या मतदारसंघाचे माजी आमदार फिरोज शेठ यांनी बंधू राजू शेठ यांना काँग्रेसची उमेदवारी दिली असून उर्दू भाषकांची संख्या अधिक असल्याचा फायदा श उचलण्यास सुरुवात केली आहे. निपाणीत मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार उतरवला असला तरी म्हणावा तितका प्रभाव जाणवत नाही. भाजपच्या मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विरोधात लढताना काँग्रेसचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी शेवटची संधी द्यावी असे भावनिक आवाहन चालवले आहे. या आजी-माजी आमदारांच्या लढतीत संघर्षात काँग्रेसने उमेदवारी नाकारलेले राष्ट्रवादीचे उत्तम पाटील यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची सभा त्यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.