सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवरात्रीनंतर विजयादशमीचा धार्मिक सोहळा आता राजकीय होत चालला असून त्यातील गर्दीची गणिते या वर्षी जरा अधिकच बारकाईने आखली जात आहेत. ‘चला, चला गर्दी जमवा’, ‘गाड्या बुक करा’, ‘समर्थक दिसायला हवेत’, अशा सूचना शिंदे गटाच्या आमदारांना आल्या आहेत. औरंगाबादहून २५ हजार समर्थकांना मुंबईत घेऊन जाण्याची जय्यत तयारी झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतून नेते गेले आहेत कार्यकर्ते आहे तिथेच आहेत, हा संदेश द्यायचा असल्याने उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनीही गर्दीची गणिते नव्याने मांडायला सुरूवात केली आहे. एक दसरा मेळावा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडूनही आयोजित होतो. त्यामध्ये ‘ओबीसी’ समर्थक आपल्याचबरोबर आहेत असा राजकीय संदेश देण्यासाठी पंकजा मुंडे यांनीही बांधणी सुरू केली आहे. मात्र, मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात कोण मोठा वक्ता असेल हे मात्र अद्यापि ठरलेले नाही.

हेही वाचा… पंकजा मुंडे यांना मोदींबाबतचे विधान अंगलट येणार?

शिंदे गटाच्या समर्थक आमदारांनी दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी ३०० बस गाड्या भाड्याने घेतल्याचे नुकतेच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीर केले होते. या शिवाय २५ हजार कार्यकर्ते वेगवेगळया गाड्यांनी, वेगवेगळया मार्गाने मुंबईत पोहचतील असे नियोजन सुरू असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार व महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली. आम्ही कोणालाही बळजबरीने घेऊन जाणार नाही. मात्र, बहुतांश शिवसैनिकांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतील याची उत्सुकता असल्याने ते आवर्जून दसरा मेळाव्यास येणार असल्याचा दावा आमदार जैस्वाल यांनी केला. गर्दीची गणिते जमिवण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक मेळावाही आयोजित केला आहे. एका बाजूला सत्तेत असणाऱ्या पक्षाची गर्दी जमविण्याची तयारी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्या समर्थक शिवसैनिकांनीही जोर लावला आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातून उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी व्हावी यासाठी आतापासून प्रयत्न सुरू झाले आहेत. कोणाची सभा मोठी होते यावरुन सुरू असणाऱ्या कुरघोडीच्या खेळात एकमेकांच्या ‘ गर्दी’चे आकडे कसे मोजायचे याचेही नियाेजन केले जात आहे. कोठे गाडी लावायची, कोणत्या मार्गाने गाड्या न्यायच्या याची माहिती असल्याने सर्व सामान्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने गर्दीचे नियोजन केल्याचा दावा आमदार जैस्वाल यांनी केला.

हेही वाचा… पिचड पितापुत्रांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न

पंकजा मुंडेच्या दसरा मेळाव्यालाही गर्दी पण …

पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात भाजपामधील राज्यस्तरीय नेत्यांवर अप्रत्यक्षपणे बोलतात. त्यांचा रोख देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही असतो. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने पसरतात. दसरा तसेच गोपीनाथ गडावरील मेळाव्यात फडणवीस विरोधी गटाची मोट बांधण्याची प्रक्रिया त्यांनी हाती घेतली होती. त्यातूनच पुढे त्यांच्याशिवाय विकसित होणाऱ्या नेतृत्वाच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आल्याच्या घटना घडल्या. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या विरोधात तसेच आमदार रमेश कराड यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली होती. पंकजा मुंडे यांच्या भाषणातून कार्यकर्त्यांना मिळणारे संदेश नेहमीच भाजप नेत्यांना अडचणीचे ठरू लागल्याने त्यांच्या जाहीर कार्यक्रमांना राज्यातील नेते आता हजेरी लावत नाहीत, असेही दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दसरा मेळाव्याला गर्दी जमविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सावरगाव घाट येथे होणाऱ्या या मेळाव्यात सामाजिक विषयावर प्रबोधनाची प्रथा असल्याचा दावा संयोजकांच्या वतीने केला जातो. या मेळाव्यालाही गर्दी होईल असे मानले जात आहे. दसरा मेळाव्यातील गर्दी ही राजकीय प्रतिमा संवर्धनासाठी वापरली जाण्याची पद्धत आता राज्यभर सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public meeting crowd and politics at dussehra print politics news asj
First published on: 28-09-2022 at 16:28 IST