पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कोथरुड विधानसभा मतदार संघात ‘मतचोरी’चा प्रकार उघडकीस आला आहे. परदेशात पलायन केलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळ याने कोथरुडसह कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातही नाव नोंदणी केल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यातून तडीपार असलेला घायवळ याचे राजकीय हितसंबंध असल्याने निवडणूक जवळ आल्यावर त्याच्या बळाचा वापर करण्यात येत असल्याने काही राजकीय व्यक्तींचे त्याला कायम पाठबळ राहिले आहे. त्याला पारपत्र कोणी मिळवून दिले, याचा तपास सुरू असतानाच आता त्याने मतदार म्हणून नावनोंदणी करताना कोणती कागदपत्रे दिली, नावनोंदणी कशी केली, याचीही चौकशी सुरू झाल्याने राजकीय क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे.
कोणतीही निवडणूक आली की, कोथरुडमध्ये घायवळ आणि कुख्यात गुंड गजानन मारणे या दोघांच्या बळाचा आधार काही राजकीय व्यक्ती घेत आल्या आहेत. पूर्वी हे दोघे एकत्र होते. आता दोघांमध्ये वितुष्ट असल्याने त्याचा फायदा राजकीय व्यक्ती घेत आल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून तयारी सुरू असताना घायवळ याने परदेशात पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मूळचा अहिल्यानगरमधील सोनगावचा रहिवासी असलेला घायवळ याला पुण्यातून तडीपार करण्यात आल्याने तो आतापर्यंत सोनगावला होता. त्याने पलायन केल्यानंतर त्याला पारपत्र मिळवून देण्यात कोणी मदत केली, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हे प्रकरण सुरू असतानाच आता त्याने मतदार म्हणून पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदार संघ आणि कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघ या दोन्ही ठिकाणी नावनोंदणी केल्याचे निदर्शनास आले आहे, मात्र, ही नावनोंदणी करताना त्याने नावात बदल केला आहे. घायवळ या आडनावाऐवजी गायवळ हे आडनाव वापरले आहे. तसेच निलेश आणि निलेशकुमार अशी दोन नावे दाखवून मतदार यादीत नाव नोंदणी केली असल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते, आम आदमी पक्षाचे पुण्यातील नेते विजय कुंभार यांनी उघडकीस आणली आहे.
मतदार यादीत असलेल्या दुबार नोंदीबाबत विजय कुंभार म्हणाले, ‘निलेश घायवळचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. तो आणि त्याची पत्नी स्वाती या दोघांची नावे दोन विधानसभा मतदार आहेत. कोथरुडमध्ये निलेशकुमार बन्सीलाल गायवळ या नावाने नोंदणी करण्यात आली आहे. या ठिकाणी ४७ वय दाखविण्यात आले आहे. कर्जत- जामखेड विधानसभा मतदार संघात वय ४८ नोंदविण्यात आले आहे. त्याची पत्नी स्वाती हिचे कोथरुडमध्ये वय ४२ आणि कर्जत-जामखेडमध्ये ३३ दाखविण्यात आले आहे. ही दुबार नावे असून, मतचोरीचा प्रकार आहे. हे एक प्रकरण निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे अनेक ठिकाणी दुबार नावे आहेत.त्याची चौकशी झाली पाहिजे’.
हा प्रकार उघड झाल्यानंतर आता मतदार म्हणून नावनोंदणी करताना त्याने कोणती कागदपत्रे सादर केली. प्रत्यक्ष नावनोंदणी कोणी केली, याचीही चौकशी सुरू झाल्याने काही राजकारण्यांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.