Rahul Gandhi on Election Commission News : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीतील पत्रकार परिषदेतून भाजपासह केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. कर्नाटकमधील आलंद विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्यासाठी त्यांच्या नावाने भलत्याच व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकानिशी अर्ज करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर निवडणूक आयोगाने बुधवारी आपल्या ईसीआयनेट पोर्टल आणि ॲपवर ‘ई-साइन’ ही नवीन सुविधा सुरू केली. त्यानुसार आता मतदार याद्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मतदारांची ई-पडताळणी होणार आहे. त्याच मुद्द्याला हाताशी धरून, राहुल यांनी आयोगावर पुन्हा एकदा टीका केली आहे.
“काँग्रेसने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतरच निवडणूक आयोगाला जाग आली. मतचोरीच्या आरोपानंतरच त्यांनी ऑनलाइन मतदार वगळण्याचा प्रक्रियेला कुलूप लावले. मतांची चोरी पकडली गेली असून, आता लवकरच चोरांनाही पकडले जाणार,” असा इशारा राहुल गांधी यांनी दिला. दी इंडियन एक्स्प्रेसने बुधवारी दिलेल्या वृत्तानुसार, नवीन मतदारांची नाव नोंदणी, नाव वगळणे किंवा त्यात दुरुस्ती करायची असल्यास अर्जदारांना आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे आपली ओळख पडताळणी करावी लागणार आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या गैरप्रकाराच्या आरोपाआधी अर्जदाराला कोणत्याही ओळखपत्राची पडताळणी न करताच मतदार ओळखपत्र (EPIC) क्रमांक टाकून निवडणूक आयोगाच्या ॲप आणि पोर्टलवर अर्ज करता येत होते, ज्यामुळे मतदारांच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता होती. निवडणूक आयोगाने मंगळवारपासून ईसीआयनेट पोर्टलवरील फॉर्म ६ (नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी), फॉर्म ७ (नाव वगळण्यासाठी किंवा समाविष्ट करण्यावर आक्षेप घेण्यासाठी) आणि फॉर्म ८ (नाव दुरुस्तीसाठी) भरण्यासाठी ‘ई-साइन’ची अट पूर्ण करणे अनिवार्य केले.

या प्रक्रियेमुळे नवीन मतदार नोंदणीसाठी, तसेच मतदार यादीतून नाव वगळण्यासाठीही अर्जदाराला आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर नावाची दुरुस्ती करायची असल्यास अर्जामध्ये वापरलेले मतदार कार्डावरील नाव हे आधार कार्डवरील नावाप्रमाणेच असावे लागणार आहे. त्याशिवाय मतदाराचे नाव वगळण्यासाठी किंवा त्यावरील हरकतीसाठी अर्ज करताना अर्जदाराला संबंधित व्यक्तीच्या सर्व तपशिलांची माहिती द्यावी लागणार आहे.
राहुल गांधी यांनी बुधवारी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून दी इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करीत निवडणूक आयोगावर टीका केली. “ज्ञानेश कुमारजी (मुख्य निवडणूक आयुक्त) आम्ही चोरी पकडली म्हणून तुम्हाला कुलूप लावायची आठवण झाली. आता आम्ही चोरांनाही पकडणार आहोत,” असे राहुल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. दरम्यान, निवडणूक आयोगाने आपल्या ईसीआयनेट पोर्टलवर केलेले बदल हे राहुल गांधींनी केलेल्या आरोपांनंतरच झाल्याचे मानले जाते. आठवडाभरापूर्वीच राहुल यांनी कर्नाटकमधील आलंद विधानसभा मतदारसंघात मतदारांची नावे वगळण्यासाठी ऑनलाइन फॉर्मचा गैरवापर झाल्याचा आरोप केला होता. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घडलेल्या या घटनेला त्यांनी ‘मतदानातील फसवणूक’ असे संबोधले होते.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मतांची चोरी करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप राहुल यांनी पत्रकार परिषदेतून केला होता. निवडणूक आयोगाकडून आलंद प्रकरणाचा पुरावा कर्नाटक गुन्हे अन्वेषण विभागाला (CID) कधी दिला जाईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. आलंद येथे एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न झाला. मात्र, गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाची वेळीच दखल घेऊन फसवणूक रोखली. या मतदार फसवणुकीमागे कोण आहे याची माहिती तपास यंत्रणेला द्यावी, अशी मागणी राहुल यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना निवडणूक आयोगाने निवेदन जारी केले. “गैरसमज पसरवण्यात आल्याप्रमाणे कोणत्याही सामान्य नागरिकाचे नाव मतदार यादीतून ऑनलाइन हटवता येत नाही. तसेच प्रभावित व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय त्याचे नाव वगळता येत नाही. २०२३ मध्ये आलंद विधानसभा मतदारसंघात नावे वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वत: एफआयआर दाखल केला होता,” असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले. “आलंद मतदारसंघात ज्या ६,०१८ नावांना वगळण्यासाठी अर्ज करण्यात आले होते, त्यांची आम्ही प्रत्यक्ष पडताळणी केली. त्यावेळी केवळ २४ अर्ज योग्य असल्याचे आढळून आले. उर्वरित ५,९९४ अर्जांवर प्रक्रिया केली गेली नाही. कारण- ते मतदार त्याच ठिकाणी राहत असल्याचे आमच्या लक्षात आले”, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.