Savarkar defamation case: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधानावर बोलताना भाजपा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर पुणे न्यायालयाने राहुल गांधींना समन्स पाठवले आणि काही वेळा हजर राहण्याचे आदेशही दिले होते.
त्यानंतर या प्रकरणी राहुल गांधी यांना जामीनही मंजूर करण्यात आला. सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यात आरोप करण्यात आला की, मार्च २०२३ मध्ये लंडनमधील भाषणात काँग्रेस नेत्याने म्हटले, “व्ही. डी. सावरकर यांनी एका पुस्तकात लिहिले आहे की, त्यांनी आणि त्यांच्या पाच-सहा मित्रांनी एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती आणि त्यांना याचा आनंद झाला होता.”

राहुल गांधी काय म्हणाले होते?

राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले, “संविधानावर बोलत असताना मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याने संविधानाबाबत केलेले विधान उद्धृत करत आहे. संविधानाबाबत बोलताना सावरकर म्हणाले होते की, भारतीय संविधानाबाबत सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे यात काहीही भारतीय नाही. हिंदू राष्ट्रात वेदानंतर मनुस्मृती हा सर्वांत पूजनीय असा धर्मग्रंथ आहे. या ग्रंथाने अनेक शतकांपासून देशाच्या आध्यात्मिक आणि दैवी मार्गाचे संहिताकरण केले आहे. आजही मनुस्मृती हा कायदा आहे.” सावरकर यांनी संविधानाबाबत काय म्हटले आहे, याचे उदाहरण देताना राहुल गांधी म्हणाले, “सावरकर यांनी लिहिले होते की, संविधानात भारतीय असे काहीही नाही. आपल्या संविधानाची जागा मनुस्मृतीने घ्यावी.” तसेच “व्ही. डी. सावरकर यांनी एका पुस्तकात लिहिले आहे की, त्यांनी आणि त्यांच्या पाच-सहा मित्रांनी एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती आणि त्यांना याचा आनंद झाला होता.”

मात्र, आता हे प्रकरण एका वेगळ्या कारणाने पुन्हा समोर आले आहे. राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी सावरकरांच्या अनुयायांकडून राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसे निवेदन पवार यांनी पुण्यातील विशेष न्यायालयात सादर केले होते. विशेष म्हणजे याबाबत राहुल गांधी यांनाच त्यांच्या वकिलांनी माहिती दिली नव्हती. बुधवारी १३ ऑगस्ट रोजी याबाबत न्यायालयात मिलिंद पवार यांनी अर्ज केला होता. ही खबर दिल्लीला पोहोचल्यावर काही तासांतच हा अर्ज मागे घेण्यात आला.

राहुल गांधींनी व्यक्त केली नाराजी

काही तासांनंतरच मिलिंद पवार यांनी यू-टर्न घेतला आणि राहुल गांधींच्या संमतीशिवाय हा अर्ज दाखल झाल्यामुळे तो मागे घेणार असल्याचे सांगितले. हे निवेदन सादर केल्याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधींनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, त्यातील मजकुराशी सहमत नसल्याचे म्हटले आहे, असे पवार यांनी सांगितले.

“वकील मिलिंद पवार यांनी चर्चा केली नाही”

काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनीही सांगितले की, पवार यांनी गांधींशी चर्चा न करता किंवा त्यांची संमती न घेता हे पाऊल उचलले. बुधवारी पक्षाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, राहुल गांधी याच्याशी सहमत नाहीत आणि पवार लवकरच अर्ज मागे घेणार आहेत.

मानहानी खटल्याचं काय?

या प्रकरणी याआधी दाखल करण्यात आलेल्या अर्जात मिलिंद पवार यांनी म्हटले होते, “तक्रारदार सात्यकी सावरकर यांनी मान्य केले की, ते नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांचेही मातृक वंशातून थेट वंशज आहेत. त्याशिवाय हिंदुत्व विषयावरील संसदीय चर्चेदरम्यान पंतप्रधान आणि राहुल गांधी यांच्यात जोरदार वाद झाला होता हे सर्वांना ठाऊक आहे. या पार्श्वभूमीवर तक्रारदार, त्यांचे पणजोबा गोडसे बंधू, सावरकरांच्या विचारसरणीशी जोडले गेलेले लोक आणि सध्या सत्तेत असलेले सावरकरांचे अनुयायी हे राहुल गांधींविषयी वैमनस्य, तसेच द्वेष बाळगत असतील यात शंका नाही.”

“तक्रारदारांच्या वंशाशी संबंधित हिंसक आणि संविधानविरोधी प्रवृत्तीचा नोंदवलेला इतिहास, तसेच सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता, राहुल गांधी यांच्या जीवाला धोका, चुकीच्या गुन्ह्यात अडकवले जाण्याची किंवा सावरकरांच्या अनुयायांकडून धोका आहे”, असे नुकतेच दाखल केलेल्या अर्जात नमूद केले आहे.

काँग्रेसच्या या भूमिकेचा वापर विरोधी गटाकडून टीका करण्यासाठी होण्याची दाट शक्यता आहे. देशभरात राहुल गांधी यांच्याविरोधात अनेक ठिकाणी मानहानीचे खटले दाखल आहेत. त्यातील काहींमधून त्यांची निर्दोष सुटका झाली आहे. मात्र, पुण्यातील हा खटला अजूनही सुरू आहे. सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याविरुद्ध राहुल गांधी वकिलांमार्फत युक्तिवाद करीत आहेत. खरं तर राहुल गांधी यांच्यावरील हा खटला संपवण्यासाठी मिलिंद पवार यांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. एखाद्या देश पातळीवरच्या राजकीय नेत्याला न सांगता, त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा न्यायालयात दाखल करणे आणि नंतर तो मागे घेणे हा सर्व प्रकार काँग्रेसच्या विरोधकांसाठी आयतं कोलीत ठरेल यात शंका नाही.
मिलिंद पवार यांच्या या कृतीमुळे राहुल गांधी यांच्या न्यायालयीन अडचणीत वाढ होऊ शकतील हे काँग्रेसच्या लक्षात आले. त्यामुळे पुण्यातील विशेष न्यायालयात केलेला हा दावा काँग्रेसने मागे घेतला आहे. मिलिंद पवार यांनी राहुल गांधी यांना याबाबत अनभिज्ञ ठेवल्याने राहुल गांधींवर आता तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.

पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी याबाबत स्पष्ट सांगितले की, हे विधान राहुल यांच्या संमतीशिवाय न्यायालयात सादर करण्यात आले. श्रीनाते यांच्या म्हणण्यानुसार, राहुल यांच्या वकिलाने त्यांच्याशी बोलल्याशिवाय किंवा त्यांची परवानगी न घेता, न्यायालयात हे लेखी निवेदन दाखल केले होते. त्यात त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते.