scorecardresearch

राहुल गांधींना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर विरोधक आक्रमक, म्हणाले “आम्ही दडपशाहीसमोर…”

न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवताच काँग्रेसच्या नेत्या तथा राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी भाजपावर टीका केली आहे.

rahul gandhi
राहुल गांधी (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सुरत न्यायालयाने काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. राहुल गांधी यांनी २०१९ साली कर्नाटकमधील कोलार येथे ‘मोदी’ या आडनावावर टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात न्यायालयाने वरील निकाल दिला आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेस तसेच प्रमुख विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. काहीही झालं तरी आम्ही भाजपाच्या दडपशाहीसमोर झुकणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

हेही वाचा >>> माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश

माझा भाऊ कधीही घाबरणार नाही- प्रियंका गांधी

न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवताच काँग्रेसच्या नेत्या तथा राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी भाजपावर टीका केली आहे. “संपूर्ण यंत्रणेचा वापर करून गांधींचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर केला जात आहे. माझा भाऊ याआधी कधाही घाबरलेला नाही. भविष्यातही तो घाबरणार नाही. तो कायम सत्य बोलतो. भविष्यातही तो सत्यच बोलणार,” असे प्रियंका गांधी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.

माझा धर्म सत्य आणि अहिसेंवर आधारलेला- राहुल गांधी

राहुल गांधी यांनीदेखील ट्वीट करत न्यायालयाच्या या निर्णयावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महात्मा गांधी यांचे एक वाक्य ट्वीट केले आहे. “माझा धर्म सत्य आणि अहिसेंवर आधारलेला आहे. सत्य माझा देव आहे. तर देवापर्यंत पोहोचण्यासाठी अहिंसा हे माझे साधन आहे,” अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा >>> amil Nadu: “स्टॅलिन, मलाही अटक करा”; डीएमके सरकारविरोधात ट्विटरवर ट्रेंड

न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी आम्ही असहमत- अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीदेखील राहुल गांधी यांना पाठिंबा दिला आहे. “काँग्रेस आणि आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. मात्र राहुल गांधी यांना अब्रुनुकसानीच्या प्रकरणात अशा प्रकारे अडकवणे चुकीचे आहे. सरकारला प्रश्न विचारण्याचे काम जनता आणि विरोधी पक्षाचे असते. आमच्या मनात न्यायालयाबद्दल आदर आहे. मात्र या निर्णयाशी आम्ही असहमत आहोत,” अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली आहे.

जनतेसाठी आवाज उठवणारे शांत बसणार नाहीत- प्रियंका चतुर्वेदी

शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. “विरोधकांना सातत्याने लक्ष्य केले जात असून ते निषेधार्ह आहे. मात्र यामुळे जनतेसाठी आवाज उठवणारे शांत बसणार नाहीत. या निकालाचे दूरगामी परिणाम होतील,” अशी प्रतिक्रिया प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> Amit Shah: अमित शहांच्या ‘त्या’ वक्तव्याची सीबीआयने चौकशी करावी; राहुल गांधींच्या बचावासाठी काँग्रेसचा भाजपावर प्रतिहल्ला

दरम्यान, न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे. तसेच ३० दिवसांची मुदत दिली असून या कालावधित राहुल गांधी यांना उच्च न्यायालयाकडे दाद मागता येईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 18:05 IST

संबंधित बातम्या