आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रा काढली आहे. या यात्रेला प्रचंड गर्दी होत असल्याने भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांच्यासह राहुल गांधी हे भाजपावर सातत्यानं मतचोरीचा आरोप करीत आहेत. याशिवाय मतदारांच्या विशेष फेरतपासणी मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून इंडिया आघाडीचे नेते निवडणूक आयोगाची कोंडी करताना दिसून येत आहे. दुसरीकडे विरोधकांच्या कथित अपप्रचाराला खोडून काढण्यासाठी भाजपाने आपल्या मित्रपक्षांची मोट बांधली आहे. विरोधकांची एकजूटही मोडून काढण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.
मतदारांच्या विशेष फेरतपासणी मोहिमेमुळे राज्यात सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती भाजपाच्या नेत्यांना आहे. कारण- मतदार यादीतून वगळले गेलेले बरेच मतदार हे भाजपाचे पारंपारिक मतदार होते, अशी शंका त्यांना आहे. निवडणूक आयोगाची मतदार मोहीम व वक्फ दुरुस्ती कायद्यामुळे राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसला मुस्लीम मतदारांचा मोठा पाठिंबा मिळू शकतो, असं भाजपाच्या एका नेत्यानं म्हटलं आहे.
प्रशांत किशोर यांच्या आरोपांमुळे भाजपाची कोंडी
जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर भ्रष्टाचाराचे व गैरव्यवहाराचे आरोप सुरू केल्यामुळे भाजपाची चिंता वाढली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून किशोर यांनी भाजपाच्या तीन दिग्गज नेत्यांवर थेटपणे शाब्दिक हल्ला चढवला आहे. यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कुमार जयस्वाल, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि आरोग्य मंत्री मंगल पांडे यांचा समावेश आहे. जयस्वाल यांनी किशनगंज येथील ‘माथा गुजरी मेडिकल कॉलेज’ या शीख संस्थेवर बेकायदा ताबा मिळवल्याचा आरोप प्रशांत किशोर यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचे शैत्रणिक कागदपत्रे खोटे असल्याचं किशोर यांनी म्हटलं आहे. तर आरोग्य मंत्री मंगल पांडे यांच्यावर त्यांनी रुग्णवाहिका घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप केला आहे. मंत्री पांडे यांच्या मंत्रालयाने ४६६ रुग्णवाहिकांची चढ्यादराने खरेदी केली असून इतर राज्यांना त्या स्वस्त दरात मिळाल्याचा आरोप किशोर यांनी केला आहे.
आणखी वाचा : भाजपाच्या ‘या’ नेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप; महिलेची थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार, प्रकरण काय?
भाजपाने फेटाळले प्रशांत किशोर यांचे आरोप
प्रशांत किशोर यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत भाजपा नेत्यांनी ते फेटाळून लालले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकत्रित येऊन सुरू केलेली मोहीम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीश कुमार यांचे स्वच्छ आणि प्रामाणिक नेतृत्व या सर्व आरोपांना निष्प्रभ करतील, असा भाजपाच्या नेत्यांना विश्वास असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं आहे. यामुळेच भाजपाने रवी शंकर प्रसाद, शाहनवाज हुसेन, राजीव प्रताप रुडी, संजय जयस्वाल, गुरु प्रकाश आणि अजय आलोक यांसारख्या बिहारमधील अनेक वरिष्ठ नेत्यांना आणि राष्ट्रीय प्रवक्त्यांना राज्याच्या सर्व ३८ जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा घेण्याची जबाबदारी दिली आहे. यातून ते प्रशांत किशोर यांच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराला यश, भाजपाची चिंता वाढली
राहुल गांधींच्या व्होटर अधिकार यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादाने बिहारमधील भाजपची चिंता वाढली आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या या मोहिमेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेत्यांची १४ पथके तयार केली आहेत. या पथकांकडे राज्याच्या २४३ विधानसभा मतदारसंघांमध्ये बैठका आणि रॅली आयोजित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्व बैठकांमध्ये प्रत्येक मतदारसंघातील एनडीएतील सर्व नेत्यांनी सहभागी व्हावे आणि मित्रपक्षांचे झेंडेही लावावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. भाजपाच्या एका नेत्यानं सांगितलं की, या कार्यक्रमांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि त्यांची कामगिरी ठळकपणे मांडली जाणार आहे, ज्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या मोहिमेला मिळालेला फायदा कमी होण्यास मदत होईल अशी आम्हाला आशा आहे.

भाजपा नेत्यांना राहुल गांधींच्या यात्रेची भीती?
राहुल गांधी यांच्या व्होटर अधिकार यात्रेला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. या प्रतिसादाचे कारण म्हणजे भाजपाची कमजोरी आहे, असं सत्ताधारी पक्षातील एका नेत्यानं सांगितलं. “आम्ही प्रचारात पिछाडीवर असल्यामुळेच विरोधकांच्या यात्रेला प्रचंड गर्दी होत आहे. मोदीजी आणि नितीश कुमार यांच्यासारखे मोठे नेते असतानाही प्रशांत किशोर यांच्या आरोपांमुळे आमचे नैतिक सामर्थ्य कमी झाले आहे. जेव्हा आमचे कार्यकर्ते लालू प्रसाद यांच्या ‘चारा घोटाळ्या’चा मुद्दा काढतात, तेव्हा लोक आम्हाला ‘रुग्णवाहिका घोटाळ्या’बद्दल विचारतात. या सर्व कारणांमुळे राहुल गांधींना फायदा होत आहे,” असं भाजपाच्या एका खासदारानं सांगितलं. “भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आमच्या सरकारच्या चांगल्या प्रतिमेला धक्का बसत असून भाजपासाठी ही निवडणूक अजिबात सोपी नाही, असं पक्षातील एका वरिष्ठ नेत्यानं मान्य केलं आहे.
राहुल गांधींच्या यात्रेमुळे फरक पडणार नाही : भाजपाचा विश्वास
दरम्यान, राहुल गांधी यांची ‘व्होटर अधिकार यात्रा’ आणि निवडणूक आयोगाच्या मोहिमेवरील विरोधकांच्या टीकेमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निवडणुकीत कोणताही फरक पडणार नाही, असा दावा भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं केला आहे. . विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना भाजपातील वरिष्ठ नेते अगदी आत्मविश्वासाने विरोधकांचा अपप्रचार खोडून काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बिहारमधील भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी म्हटलंय की, भारतीय इतिहासात व्होट चोरीचे दोन मोठे प्रकार घडले आहेत. १९९० ते २००० या काळात तेजस्वी यादव यांचे वडील लालू प्रसाद यांनी मतपत्रिका हिसकावून घेतल्या होत्या. तर १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मतदार यादीत फेरफार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १४,००० मतांनी हरवलं होतं, या गोष्टी लोक विसरले नाहीत, असं भाजपाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : ‘सर्वात मोठा चोर तूच आहेस’ भाजपा आमदाराची जिल्हाधिकाऱ्यांना दमदाटी; प्रकरण काय?
राहुल यांची यात्रा फक्त कार्यकर्त्यांची : शाहनवाज हुसेन
माजी मंत्री शाहनवाज हुसेन यांनी राहुल गांधी यांच्या यात्रेला मोठी गर्दी होत असल्याचा दावा फेटाळून लावला. “आमच्यासाठी चिंतेची बाब नाही. राहुल गांधींसाठी दिसणारी गर्दी ही काँग्रेस आणि आरजेडीच्या उमेदवारीची अपेक्षा करणाऱ्या लोकांची आहे. सामान्य जनतेने त्यांना नाकारले आहे, ही फक्त कार्यकर्त्यांची यात्रा आहे,” असा टोला हुसेन यांनी लगावला आहे. “जेव्हा राहुल गांधी मखाना पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना भेटतात, तेव्हा त्यांनी हे लक्षात घ्यावे की मोदीजींनी त्यांच्यासाठी काय केले आहे याची त्यांना जाणीव आहे,” असंही हुसेन यांनी म्हटलं आहे. त्यांनी ‘इंडिया’ आघाडीमधील नेतृत्वाच्या गोंधळावरही टीका केली आहे. “जेव्हा राहुल गांधींना विचारले गेले की बिहारमधील निवडणुकांसाठी तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत का, तेव्हा त्यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे आरजेडीच्या समर्थकांना वाटते की, ही यात्रा फक्त राहुल गांधींचे महत्त्व वाढवण्यासाठी आहे,” अशी टीका हुसेन यांनी केली आहे. एकंदरीत बिहारमधील भाजपा नेत्यांच्या तोंडी सध्या राहुल गांधी व आरजेडीचीच चर्चा आहे.