गया (बिहार) : बिहारच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली नसली तरी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्होटर अधिकार यात्रा काढून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात बिहार नव्हे, तर बिहार मध्ये महाराष्ट्राची चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळते. बिहारमधील १६ दिवसांच्या या यात्रेचे प्रमुख लक्ष्य मतदारांच्या मनात मतचोरीचा मुद्दा ठसवणे हाच असल्याने राहुल गांधी सातत्याने महाराष्ट्राचा उल्लेख करत आहेत. कर्नाटकातील बेंगळुरू-मध्ये लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या कथित मतचोरीचे पुरावे देऊन राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे.
मात्र, राहुल गांधी यात्रेमध्ये सातत्याने महाराष्ट्राची चर्चा करत आहेत. मतचोरीचा पहिला आरोप राहुल गांधींनी महाराष्ट्राबाबतच केला होता. त्याचा उल्लेख राहुल गांधी करत असल्याने बिहारमध्ये महाराष्ट्र गाजू लागला आहे. काँग्रेसच्या व्होटर अधिकार यात्रेत दररोज संध्याकाळी राहुल गांधींची चौकसभा होते. या सभेमध्ये राहुल गांधी मतचोरीवर बोलतात. काँग्रेसने महाराष्ट्रातील मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला होता. तिथे एकूण प्रौढ लोकसंख्येपेक्षाही नव्या मतदारांची संख्या अधिक होती. १ कोटी मतदार फक्त पाच महिन्यांमध्ये वाढले. लोकसभा व विधानसभा दोन निवडणुकांच्या दरम्यान मतदारांची संख्या इतकी वाढली कशी, असे अनेक मुद्दे राहुल गांधी सभेत मांडताना दिसत आहेत.
यापूर्वी बिहारमधील नेते महाराष्ट्राचा उल्लेख बिहारींना महाराष्ट्रात होणाऱ्या मारहाण वा भाषिक मुद्द्यासंदर्भात करत असत. त्यावरून राजकीय वादही रंगले होते. यावेळी चर्चा बिहारींबद्दल नव्हे तर महाराष्ट्रातील मतचोरीवर होत आहे. महाराष्ट्राचा बिहार होऊ दिले जाणार नाही असे महाराष्ट्रातील नेते बोलत असत. पण, या यात्रेच्या निमित्ताने बिहारचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने मतांची चोरी केली, बिहारमध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ देणार नाही, असे बिहारमधील विरोधी पक्षांतील नेते बोलत आहेत. बिहारी नेत्यांच्या भाषणातील हे वेगळेपण म्हणता येईल.
या यात्रेला सुरू होऊन फक्त ३ दिवस झाले आहेत, मात्र, महाराष्ट्रातील मतचोरीशिवाय काँग्रेसनेत्यांचे भाषण पूर्ण होत नाही. सासाराममध्ये रविवारीव्होटर अधिकार यात्रा सुरू होण्यापूर्वी जंगी जाहीर सभा झाली. त्यामध्ये महागठबंधनचे सर्व मोठे नेते उपस्थित होते. बिहारमधील राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, माकप-माले, विकासशील इन्सान पक्ष आदी घटक पक्षांच्या नेत्यांच्या भाषणातही महाराष्ट्राचा उल्लेख होताच!
या यात्रेमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होणारी मतचोरी हाच प्रमुख अजेंडा असल्याने महाराष्ट्राचा उल्लेख सातत्याने होईल पण, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रचाराला वेग येईल तेव्हाही महाराष्ट्र चर्चेत राहील अशी चिन्हे राहुल गांधींच्या या यात्रेतून दिसू लागली आहेत.