अलिबाग: विधानसभा निवडणूकीत बंडखोरी करणाऱ्या सुधाकर घारे यांच्याकडे रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या जखमेवर आणखीनच मिठ चोळण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूकीनंतर रायगड जिल्ह्यात सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदावरील नियुक्तीवर स्थगिती आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी जिल्ह्यात शिवसेनेच्या तीनही आमदारांविरोधात मोहीम उघडली आहे. रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासह, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघात लक्ष घालून पक्ष संघटना बांधणीला सुरूवात केली आहे. तीनही शिवसेना आमदारांच्या वर्चस्वाला धक्के देण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.
अशातच आता कर्जत मधून महेंद्र थोरवे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या सुधाकर घारे यांच्यावर रायगडच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना आमदारांचा संताप होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूकीत कर्जतचा मतदारसंघ महायुतीकडून शिवसेनेला सोडण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधाकर घारे यांनी बंडखोरी करत कर्जत मधून निवडणूक लढवली. पक्षाच्या पदाचा राजिनामा देऊन ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी जाहीर केले. अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे महेंद्र थोरवे निवडून आले. मात्र शेवटच्या फेरी पर्यंत घारे यांनी त्यांना झुंजवले होते. निवडणूकीनंतर घारे यांचा राजीनामा नामंजुर करून तटकरे यांनी त्यांना पुन्हा पक्षात घेतले आणि आता त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
दुसरीकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील हनुमंत जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्याऱ्या स्नेहल जगताप यांचा आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असलेल्या हनुमंत जगताप यांचा तटकरे यांनी निवडणूकीनंतर लागलीच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून घेतला होता. आता हनुमंत जगताप यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती करून त्यांना राजकीय पाठबळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माणगाव मधील शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ नेते राजीव साबळे यांनाही तटकरेंनी आपल्या बाजूने वळवले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्याच मतदारसंघात अडकवून ठेवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
कोण आहेत सुधाकर घारे….
सुधाकर घारे हे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे अत्यंत विश्वासु सहकारी अशी त्यांची ओळखले जातात. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश लाड यांचे राजकीय महत्व कमी करण्यात घारे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. शेवटी लाड यांनी पक्षत्याग करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. लाड यांच्या राजिनाम्यानंतर सुनील तटकरे यांनी घारे यांच्याकडे मतदारसंघाची सुत्र त्यांच्याकडे सोपवली होती. शिवसेना शिंदे गटाशी दोन हात करत घारे यांनी पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर महायुती विरोधात जाऊन कर्जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.