पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाच्या मुद्द्यावर मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असला तरी त्याचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फायदा किती आणि शिवसेना ठाकरे गटाचे किती नुकसान होऊ शकते याचे ठोकताळे बांधले जात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला २.२५ टक्के मते मिळाली होती, त्यातील किती मते महायुतीकडे हस्तांतरित होतात यावरही सारे अवलंबून असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेने महायुतीमध्ये यावे म्हणून अनेक दिवस भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू होते. मुंबई, ठाण्यात शिवसेनेतच्या ठाकरे गटाला शह देण्याकरिता मनसेचा वापर करून घेण्याची भाजप आणि शिंदे गटाची योजना स्पष्टच दिसते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची ताकद शिल्लक राहिली नाही, असे भाजप आणि शिंदे कितीही दावे करीत असले तरी अजूनही या दोन्ही पक्षांना ठाकरे यांच्या पक्षाची भीती वाटते. ठाकरे गटाचे आमदार किंवा माजी नगरसेवक शिंदे गटाने फोडले असले तरी शिवसेनेचा पारंपरिक मतदारवर्ग अजूनही पूर्णपणे शिंदे यांच्याकडे हस्तांतरित झालेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांना राज्याच्या कानाकोपऱ्यात मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता ठाकरे गटाची ताकद अद्यापही कायम दिसते. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या मतांमध्ये विभाजन करण्याकरिता महायुतीचे नेते राज ठाकरे यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.

हेही वाचा – कर्नाटकात भाजपाचे टेन्शन वाढले; मोदी सरकारमधील मंत्र्यांविरोधात लिंगायत संत लढणार

मुंबईतील चार जागांवर शिवसेना ठाकरे गट रिंगणात आहे. याशिवाय ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण, भिवंडी, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मावळ आदी मतदारसंघांमध्ये मनसेच्या पाठिंब्याचा फायदा होईल, असे महायुतीचे गणित दिसते. मुख्यत्वे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरे यांचा वापर करून घेण्याची भाजपची रणनीती दिसते. मनसेचा उमेदवार रिंगणात नसल्यास मनसेची पारंपरिक मते ही शिवसेना किंवा ठाकरे गटाकडे हस्तांतरित होतात हे यापूर्वीच्या निवडणुकीत अनुभवास आले आहे. २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केले नव्हते. तेव्हा मनसेची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीला अनुकूल होती. राज ठाकरे तेव्हा मोदी, भाजप आणि शिवसेनेवर टीका करीत होते. पण मनसेची पारंपरिक मते ही शिवसेनेच्या उमेदवारांच्या पारड्यात पडली होती. राज ठाकरे यांचा आम्हाला काहीच फायदा झाला नव्हता, अशी टिप्पणी तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती.

हेही वाचा – LS Elections 2024: मुलगा पराभूत व्हावा ही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचीच इच्छा

मनसेची दोन टक्के मते

गेल्या विधानसभा निवडणुकीत (ऑक्टोबर २०१९) मनसेने १०१ उमेदवार उभे केले होते. हे मुख्यत्वे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे पट्य्यातीलच होते. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटीले हे मनसेचे एकमेव आमदार निवडून आले होते. तेव्हा मनसेला एकूण २.२५ टक्के मते मिळाली होती. एकूण मतांची संख्या ही १२ लाख, ४२ हजार, ४३५ होती. (संदर्भ – निवडणूक आयोगाची आकडेवारी). मनसेची सर्वच मते हस्तांतरित झाली नाहीत तरी एक ते दीट टक्का मते महायुतीला मिळाल्यास तेवढाच फायदा होणार आहे. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी एकत्रित सामना करताना भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीसमोर कडवे आव्हान आहे. अशा परिस्थितीत मनसेची मोठ्या प्रमाणावर मते मिळावीत, असा महायुतीचा प्रयत्न असेल. कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना मनसेच्या पाठिंब्याचा फायदा होऊ शकतो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray what is the benefit of mahayuti with the support of mns print politics news ssb
First published on: 10-04-2024 at 11:32 IST