केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना भाजपाकडून तिरुवनंतपूरममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचं तिरुवनंतपुरममध्ये भव्य स्वागत करण्यात आलं आहे. राजीव चंद्रशेखर यांच्या निकटवर्तीयांना ते येत असल्याचे समजल्यानंतर तिरुवनंतपूरममधील कुरवणकोनम जंक्शनवर भाजपा कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. भाजपा कार्यकर्त्यांच्या एका गटाने ट्रेनमधून उतरल्यानंतर भगवी शाल गुंताळून त्यांचे स्वागत केले. चंद्रशेखर गाडीमधूनही लोकांना अभिवादन करत होते. त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठीही भाजपा कार्यकर्ते धडपडत होते. आपली निवडणूक २६ एप्रिलला होणार आहे. मतदानात आपल्याला इतिहास घडवायचा आहे. बदल घडवून पुढे जायचे आहे. ४ जून रोजी पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, तेव्हा तिरुअनंतपूरम हा मोदींच्या ४०० जागांच्या लक्ष्याचा एक भाग असला पाहिजे, असंही तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर मेळाव्याला संबोधित करताना मतदारांना उद्देशून म्हणालेत. तुम्ही मला खासदार आणि मंत्री करा. २६ एप्रिलला मतपेटीतून दाखवून द्या, असंही आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.
रोड शो दरम्यान चंद्रशेखर जवळपास दोन डझनांहून अधिक ठिकाणी थांबले आणि त्यांनी मोदी सरकारसाठी सकारात्मक वातावरण निर्मिती केली. चंद्रशेखर यांचा विजय झाला तर मोदीजी त्यांना मंत्रिमंडळात घेतील, असंही भाजपाचे ज्येष्ठ नेते पी. के. कृष्णदास म्हणाले. दुसरीकडे शशी थरूर किंवा सीपीआय उमेदवार पन्नियन रवींद्रन निवडू आले तर ते फक्त दिल्लीत धरणे आंदोलनं करतील. तिरुवनंतपूरममध्ये कधीही विकास आणणार नाहीत. चंद्रशेखर यांनी या मतदारसंघात बदल घडवून आणावा, अशी आमची इच्छा असल्याचंही कृष्णदास सांगतात. रोड शो वेळापत्रकानुसार चालत नसला तरी स्थानिक मंदिरांमध्ये सध्या उत्सव सुरू आहे. तसेच जनतेकडून चंद्रशेखर यांची वाट बघितली जात आहे. सर्व भागातील लोक त्यांच्या स्वागताला उपस्थित असतात. पुढच्या मोदी सरकारमध्ये ते मंत्री होतील, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे,” असे शहरातील मन्नामूला येथील रहिवासी सांगतात.
हेही वाचाः ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
उद्योजक आणि राजकारणी असलेले चंद्रशेखर (५९) यंदा तिरुअनंतपूरममधून निवडणूक लढत असून, त्यांचा मुकाबला शशी थरूर यांच्याशी होणार आहे. भाजपाला केरळ राज्यात लोकसभेची एकही जागा जिंकता आलेली नाही. या मतदारसंघातून तीन वेळा काँग्रेसचे खासदार शशी थरूर विजयी झाले असून, हा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो. २००९ पासून थरूर इथून जिंकत आहे आणि आतापर्यंतचा सर्वात जास्त काळ ते खासदार राहिले आहेत. एलडीएफचे उमेदवार ७८ वर्षीय पन्नियन रवींद्रन हे २००५ च्या पोटनिवडणुकीत या जागेवरून विजयी झाले होते. २०१४ पासून भाजपा तिरुअनंतपूरममध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि एलडीएफला तिसऱ्या स्थानावर ढकलले गेले आहे. २०१९ च्या निवडणुकीत थरूर यांनी भाजपाच्या कुम्मनम राजशेखरन यांना जवळपास एक लाख मतांनी पराभूत केले होते. मोदी फॅक्टरव्यतिरिक्त चंद्रशेखर यांच्यासाठी भाजपाची एक फळी बदलाच्या त्यांच्या अजेंड्यावर काम करीत आहे, कारण ते तिरुअनंतपूरममध्ये विकासाची नवीन लाट आणण्यासाठी कृषीपासून तंत्रज्ञानापर्यंतच्या क्षेत्रांशी संबंधित विविध कल्पना मांडत आहेत.
यंदा थरूर यांच्यासमोर मोठे आव्हान
थरूर यांनी त्यांच्या चौथ्या टर्ममध्येही खासदार होण्यासंदर्भात आत्मविश्वास व्यक्त केला, कारण त्यांच्या मागे संपूर्ण मतदारसंघातील त्यांच्या १५ वर्षांच्या प्रचाराचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. दोन हाय प्रोफाइल प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात उभे असलेले रवींद्रन मतदारांना सांगतात की, राज्याच्या राजधानीला जागतिक नागरिक नव्हे, तर विश्वसनीय व्यक्ती हवी आहे. सीएएला डाव्यांचा विरोध असल्याचं सांगत त्यांनी हिंदुत्वाविरुद्धचा लढाही अधोरेखित केला. गेल्या आठवड्यात निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून राजीव चंद्रशेखर यांनी अभियंते, डॉक्टर यांच्यासह शहरातील विविध व्यावसायिक गटांची भेट घेतली होती. खरं तर चंद्रशेखर यांना खासदार करण्यात तरुण आणि व्यावसायिक महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचंही चंद्रशेखर यांना माहीत आहे. तिरुवनंतपूरममधील तरुण आणि व्यावसायिक ही काँग्रेसची व्होटबँक असल्याचं समजलं जातं. गेल्या तीन निवडणुकीत शरुर यांच्यासमोर मोठे आव्हान नव्हते. परंतु चंद्रशेखर यांनी प्रचार आणि आश्वासनाद्वारे सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत थरूर यांच्यासमोर नक्कीच चंद्रशेखर यांचं आव्हान असणार आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
एनडीएचा प्रचार उत्साही आणि व्यावसायिक करीत आहेत. जर जनता ते ऐकत असेल तर जनतेनं त्याला विरोध करण्याची गरज आहे. गेल्या १५ वर्षांत मी केलेला विकास कोणीही नाकारू शकत नाही. राष्ट्रीय महामार्ग विकास, विझिंजम बंदर आणि आयटी विकास माझ्यामुळे इथे उभे राहिले आहे. २०२१-२२ मधील करपात्र उत्पन्नाबाबत चंद्रशेखर यांच्या मतदान प्रतिज्ञापत्रात विसंगती असल्याची तक्रारही काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. २०२२-२३ मध्ये त्यांचे उत्पन्न ५,५९,२०० रुपये होते, तर २०२१-२२ मध्ये ते केवळ ६८० रुपये होते. कोविड १९ साथीच्या आजारामुळे त्यांच्या व्यवसायात नुकसान झाले आणि त्यांचे उत्पन्न २०२१-२२ मध्ये घसरल्याचे त्यांनी सांगितले, असे प्रतिवाद करत चंद्रशेखर यांनी विरोधकांचे आरोप नाकारले. निवडणूक आयोगाने आयटी विभागाला भाजपा उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रात कोणतीही विसंगती तपासण्याचे निर्देश दिले.
थरूर, चंद्रशेखर आणि रवींद्रन हे उच्चवर्णीय नायर समुदायातील
थरूर यांनी चंद्रशेखर यांच्यावर मतदार आणि धार्मिक नेत्यांना कथितपणे पैसे ऑफर केल्याचा आरोप केला. चंद्रशेखर यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणूक आयोगाने थरूर यांना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून नको ते आरोप करू नयेत, असा इशाराही दिला आहे. तिरुअनंतपुरममध्ये शहरी, किनारी आणि ग्रामीण मतदार मोठ्या संख्येने आहेत. मतदारांमध्ये ६८ टक्के हिंदू, १९ टक्के ख्रिश्चन आणि १३ टक्के मुस्लिम आहेत. तिन्ही उमेदवार मग ते थरूर, चंद्रशेखर आणि रवींद्रन असो हे उच्चवर्णीय नायर समुदायातील आहेत, हिंदू मतदारांमध्ये त्यांच्या समाजाची लक्षणीय संख्या आहे. नायर संघटना आणि नायर सर्व्हिस सोसायटीचे सरचिटणीस जी सुकुमारन नायर यांनी थरूर यांच्या मागे आपली ताकद लावली आहे. त्यामुळे समाजातील लोकांची निष्ठा तीन पक्षांमध्ये विभागली गेल्याचे दिसते.
मतदारसंघात ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. किनारपट्टीच्या पट्ट्यात राहणाऱ्या ख्रिश्चन समुदायात सीपीएमच्या नेतृत्वाखालील एलडीएफबाबत आणि अदाणी समूहाच्या विझिंजम प्रकल्पामुळे भाजपाच्या कारभाराविरुद्ध काहीशी नाराजी आहे. खरं तर मतदारसंघात खरी लढत ही प्रामुख्याने थरूर आणि चंद्रशेखर यांच्यात असेल, असेही परसाला येथील पूजा साहित्याचा विक्रेते राजेश सांगतात. डावे तळागाळात वातावरण निर्मिती करीत आहे, पण राज्य सरकारच्या कामगिरीवर लोक खूश नाहीत. थरूर १५ वर्षांपासून येथे आहेत. थरूर यांनी कामगिरी केली नाही, असे लोक म्हणत नाहीत. परंतु मणिपूर हिंसाचाराबद्दलही अजूनही लोक रोष व्यक्त करीत आहेत.