संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी लोकसभेत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवरून चर्चेला सुरुवात केली. विरोधी पक्षांकडून बराच काळ उपस्थित केल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे यावेळी त्यांनी दिली. भारतीय सैन्याने पाकिस्तानवरील हल्ले का थांबवले, भारताच्या किती विमानांचे नुकसान झाले, युद्धविरामात अमेरिकेची भूमिका अशा अनेक शंका विरोधकांनी लावून धरल्या होत्या. राजनाथ सिंह यांनी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती किंवा तपासादरम्यान मिळालेल्या माहितीबद्दल बोलणे मात्र टाळले. तर राजनाथ सिंह यांनी विरोधकांच्या प्रश्नांची काय उत्तरं दिली ते जाणून घेऊ…
हवाई दलाने किती लढाऊ विमाने गमावली?
१ जूनपासून विरोधक हा प्रश्न सातत्याने विचारत होते. त्या दिवशी सिंगापूरमधील एका संवाद परिषदेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी ७ मे रोजी भारतीय हवाई दलाने काही लढाऊ विमाने गमावली होती, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्वरित धोरणात बदल करून पाकिस्तानच्या हवाई तळांवर हल्ले करीत त्यांचे मोठे नुकसान झाले, असे स्पष्टीकरणही दिले.
या मुद्द्यावर संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. त्यांनी हा प्रश्नच चुकीचा ठरवला. “कोणत्याही परीक्षेत निकाल महत्त्वाचा असतो. एखाद्या विद्यार्थ्याने चांगले गुण मिळवले असतील, तर तेच जास्त महत्त्वाचे असते. त्याची पोन्सिल तुटली की पेन हरवला याकडे लक्ष देण्याची गरज नसते. शेवटी निकाल महत्त्वाचा असतो आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैन्यानं सर्व ध्येयं पूर्ण केली. “
राजनाथ सिंह पुढे म्हणाले, “विरोधक विमान गमावल्याचा प्रश्न विचारतात. हा प्रश्न भारताच्या भावना दर्शवीत नाही. त्यांनी आजतागायत हे विचारले नाही की पाकिस्तानची किती विमाने पाडली गेली? जर प्रश्न विचारायचाच असेल, तर तो असा असायला हवा की, भारतानं दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले का? आणि याचं उत्तर आहे हो. प्रश्न असा असायला हवा की, आपल्या सैनिकांचं नुकसान झालं का? तर त्याचं उत्तर आहे, नाही. जेव्हा ध्येय मोठं असतं तेव्हा अशा लहानसहान गोष्टींवर लक्ष केंद्रित करू नये; अन्यथा आपल्या अशा वक्तव्यांमुळे सैनिकांचा उत्साह, मनोधैर्य यांसारख्या मोठ्या मुद्द्यांपासून त्यांचे मन विचलित होऊ शकते आणि विरोधक नेमकं हेच करीत आहेत.”
युद्धविरामामध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप होता का?
७ मे रोजी कारवाई थांबवण्यामागे ट्रम्प प्रशासनाच्या दबावाचा काही संबंध होता का, या विरोधकांच्या प्रश्नावर राजनाथ सिंह म्हणाले, “भारतानं कारवाई थांबवली. कारण- जी राजकीय आणि सैन्यानं ध्येय ठरवली होती, ती आपण पूर्णपणे साध्य केली होती. त्यामुळे ऑपरेशन कुठल्या तरी दबावामुळे थांबवण्यात आलं, असा समज पूर्णपणे निराधार आणि चुकीचा आहे. मी या सभागृहाला खात्री देतो की, माझ्या राजकीय प्रवासात मी कधीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला नाही.”
ऑपरेशन का थांबवले गेले?
राजनाथ सिंह पुढे असेही म्हणाले, “आपण ते क्षेत्र जिंकणं हे ध्येय नव्हतं. पाकिस्ताननं अनेक वर्षं पोसलेले दहशतवादी तळ नष्ट करणं हेच मुख्य उद्दिष्ट होतं. आपलं लक्ष्य केवळ तेच होतं. ऑपरेशन सिंदूरचं ध्येय होतं की, पाकिस्तानच्या प्रॉक्सी वॉरचा बदला घेणं. म्हणूनच संरक्षण दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं की, त्यांनी आपली लक्ष्यं ठरवावीत. युद्ध करणं हे ध्येय नव्हतं; तर शत्रूला झुकण्यास भाग पाडणं हे ध्येय होतं. जोरदार हल्ल्यांनंतर पाकिस्ताननं पराभव मान्य केला आणि विनंती केली की, आता थांबा, खूप झालं. आम्ही थांबलोसुद्धा; पण काही अटींवर. ही कारवाई केवळ थांबवली आहे; संपवलेली नाही. जर पाकिस्ताननं पुन्हा काही आगळीक केली, तर मी या सभागृहाला ठामपणे सांगतो की, ऑपरेशन पुन्हा सुरू होईल.”
१० मे रोजी पाकिस्तानच्या डीजीएमओनं भारतीय डीजीएमओंशी संपर्क साधला आणि भारतीय सैन्याला त्यांची कारवाई थांबवण्याचं आवाहन केलं. भारतीय सैन्याचं मनोबल आणि समर्पण १४० कोटी भारतीयांनी पाहिलं आहे. सैन्य केवळ भारतीय सीमांचंच रक्षण करीत नाहीत, तर आपल्या स्वाभिमानाचंही रक्षण करीत आहेत, असेही राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले.
विरोधक आणि त्यांच्या प्रश्नांची तुलना करताना राजनाथ सिंह म्हणाले, “मी गेल्या चार दशकांहून अधिक काळ राजकारणात आहे. आम्हीसुद्धा विरोधी पक्षात होतो आणि प्रश्न विचारले आहेत. १९६२ मध्ये चीनसोबतच्या युद्धाचे दु:खद परिणाम झाले तेव्हा आम्ही असा प्रश्न विचारला होता की, आपल्या देशाची जमीन दुसऱ्या देशानं कशी बळकावली. आम्ही विचारले की, आमच्या सैन्याचा आणि लोकांचा अपमान का केला गेला, आम्ही विचारले की, आमच्या सैनिकांना मोठ्या संख्येने का मारले गेले. भारताचे किती टँक, किती बंदुका नष्ट केल्या गेल्या हे आम्ही विचारले नाही.” शस्त्रांची काळजी करण्याऐवजी देशाच्या भूभागाची आणि सैनिकांची काळजी आम्हाला होती, असा खोचक टोलाही राजनाथ सिंह यांनी विरोधकांना यावेळी लगावला.