जालना – भाजपकडून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची उमेदवारी अधिकृत जाहीर झालेली असली तरी महाविकास आघाडीत जालना लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडायचा की शिवसेनेला (उद्धव ठाकरे) हा प्रश्न अद्याप कायम आहे.

‘महायुती’मध्ये भाजपचे रावसाहेब दानवे यांनाच उमेदवारी मिळणार हे गेल्या अनेक महिन्यांपासून निश्चित होते. रेल्वे विभागाच्या जालना शहरातील एका कार्यक्रमात वर्षभरापूर्वीच तसे सूतोवाचही केले होते. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मागील दोन-तीन महिन्यांतून विविध शासकीय कार्यक्रमांतून दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकास कामे आणि जनकल्याणाच्या योजनांवर प्रकाश टाकणे सुरू केले होते. त्याचप्रमाणे जालना लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे मुद्देही त्यांनी विविध शासकीय कार्यक्रमांतून अधोरेखित केले होते. दानवे यांच्या प्रचारास अप्रत्यक्ष सुरुवात झाली.

हेही वाचा – CAA वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पाश्चात्य देशांना परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दाखवला आरसा, म्हणाले…

महाविकास आघाडीत मात्र कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा राहील, याचा प्रश्न कायम आहे. काँग्रेस पक्ष या मतदारसंघातून सलग सात वेळेस पराभूत झालेला असून भाजपचा विजय झालेला आहे. यापैकी दानवे सलग पाच वेळेस विजयी झालेले असून आता त्यांना सहाव्यांदा भाजपने उमेदवारी दिलेली आहे.

काँग्रेसचा सलग सात वेळेस पराभव झाला असल्याने यावेळेस महाविकास आघाडीने या मतदारसंघातून शिवसेनेस (उद्धव ठाकरे) उमेदवारी द्यावी, अशी मागणी आहे. कोल्हापूर, सांगली, भिवंडी मतदारसंघ काँग्रेसला देऊन त्याबदल्यात जालना मतदारसंघ शिवसेनेस (उद्धव ठाकरे) सोडण्यात येईल, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार शिवाजीराव चोथे यांचे नाव मागील महिनाभरापासून चर्चेत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केलेले काँग्रेसचे डाॅ. संजय लाखे पाटील यांच्या नावाचीही चर्चा त्यांच्या समर्थकांनी सुरू केली आहे.

हेही वाचा – मोले घातले लढाया : ‘नशीबवान’ नेते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस पक्षातून जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, प्रा. सत्संग मुंढे, राजेंद्र राख यांच्यासह कल्याणराव काळे यांच्या नावाचीही चर्चा आहे.
माजी आमदार काळे यांनी २००९ मध्ये दानवे यांना जोरदार लढत दिली होती याची आठवण काँग्रेसचे काही प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांगत आहेत. असे असले तरी अद्याप महाविकास आघाडीतून कोणता पक्ष निवडणूक लढविणार हेही ठरलेले नाही.