रत्नागिरी– रत्नागिरी नगर पालिकेचे आरक्षण जाहीर होताच हौशे- नवसे आता या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी महायुतीतील शिवसेना शिंदे गट व भाजपा मध्येच चुरस लागली आहे. या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शिवसेना शिंदे गटाकडून तीन ते चार आणि भाजपाकडुन तीन महिलांची नावे सद्या चर्चेत आहेत. मात्र महायुतीतील हा तिढा सोडविण्याची कसरत पालकमंत्री उदय सामंत यांना करावी लागणार आहे.

राज्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वपूर्ण असलेल्या रत्नागिरी नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. तसेच आरक्षण जाहीर झाल्यावर नाराज झालेल्या उमेदवारांनी त्या त्या जागांसाठी घरातीलच पत्नी किंवा मुलींना उमेदवारी मिळण्यासाठी खटाटोप सुरु केला आहे. मात्र खरी चुरस पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सुरु झाली आहे. आधीच युती करण्यावरून महायुतीत वाद सुरु असताना आता नगराध्यक्ष पदावरुन महायुतीत जुंपली आहे.

रत्नागिरी नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदावर भाजप व शिवसेना शिंदे गटाने दावा केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाने सावध भूमिका घेतली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सद्या शिवसेनेकडून चार नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये स्मितल पावसकर, शिल्पा सुर्वे, समृध्दी मयेकर व वैभवी खेडेकर यांचा समावेश आहे. तर भाजपाकडून शिल्पा पटवर्धन, वर्षा ढेकणे व शिवानी माने (सावंत) या तिघिंची नावे चर्चेत आहे.

नगराध्यक्ष पदासाठी हे सातही उमेदवार प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले जात आहे. यातील शिवानी माने (सावंत) या भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या कन्या आहेत. त्याचा विवाह शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते बाळ माने यांच्या मुलाशी झाला आहे. यामुळे शिवानी माने यांना उमेदवारी मिळाल्यास भाजप व शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांच्या घरातच हे पद जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र शिवानी माने यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाकडून विरोध केला जाण्याची शक्यता वर्तविली जावू लागली आहे. नगराध्यक्ष पदा बरोबर नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी देखील मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. भाजप व शिवसेना शिंदे गटात जागा वाटपा वरुन संघर्ष वाढत आहे.

रत्नागिरी शहरात तीन ते चार जागांवरच भाजपाने शिवसेना व राष्ट्रवादी बरोबर युती व्हावी अशी आशा व्यक्त केली आहे. इतर सर्व जागा स्वबलावर लढण्याची तयारी भाजपाने केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत महायुतितील वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता असताना महायुतीतील सर्वच नेते यावर काय तोडगा काढणार याकडे आता संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सर्व निवडणूका पार पडे पर्यत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा राजकीय कस पणाला लागणार असल्याचे चित्र उभे राहिले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच निवडणुका महायुती म्हणून लढल्या जातील. कोणी कितीही प्रयन्त केले केले तरी जागा वाटप सुरुळीत होवून कोणताच वाद महायुतीमध्ये होणार नाही.. – उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा.