रत्नागिरी – कोकणातील महत्वपूर्ण असलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटातच जुंपली आहे. मंत्री नीतेश राणे यांनी राष्ट्रवादीचे प्रशांत यादव यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने हा पक्ष प्रवेश शिवसेना नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वर्मी लागला आहे. यादव यांच्या भाजप प्रवेशाने पालकमंत्री उदय सामंत यांना कोंडीत पकडण्याचा डाव राणे यांनी साधला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत सत्तेतील मित्र पक्ष शिवसेना व भाजपमध्ये मोठी चढाओढ पहायला मिळत आहे. या दोन्ही पक्षातील धुसफुस वारंवार चव्हाट्यावर आली आहे. कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांत भाजप व शिवसेना पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागले आहेत.

सिंधुदुर्गात झालेल्या एका कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांनी खासदार नारायण राणे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा वचपा काढण्यास भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी सुरुवात केल्याची चर्चा आता कोकणात सुरु झाली आहे.

गेले अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उद्योगपती प्रशांत यादव यांना पक्षात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेटीगाठी वाढविल्या होत्या. दोन्ही सामंत बंधूनी प्रशांत यादव यांना पक्षात घेण्यासाठी मनधरणी केली होती. त्यानंतर यादव लवकरच शिवसेना पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चांना मोठे पेव फुटले होते. मात्र या सर्वांवर पाणी टाकण्याचे काम भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. शिवसेनेच्या गळाला लागलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता भाजपने हिरावल्याने राणेंचा हा घाव पालकमंत्री उदय सामंत यांच्या वर्मी लागला आहे. प्रशांत यादव यांच्या रुपाने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्यावर मात करण्याची संधी चालून आली होती.

प्रशांत यादव यांचा भाजपात जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे. याची तयारीही सुरु झाली आहे. यादव हे क्षमता बघून भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत असल्याचे वक्तव्य करुन मंत्री नितेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना डिवचण्याचे काम केले आहे. मात्र या सर्वांवर पालकमंत्री सामंत यांनी संयमी भूमिका घेतली असून त्यांनी या पक्ष प्रवेशावर भाष्य करणे टाळले आहे. येत्या काळात हा दोन्ही पक्षातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यातील मित्र पक्षातील राजकीय संघर्ष कोकणातून सुरु झाला असून मंत्री नितेश राणे यांना रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बनवून भाजपच्या वरिष्ट नेत्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाचा खासदार आहे. मात्र या दोन्ही जिल्ह्यांत एकच आमदार आहे. मात्र नितेश राणे यांना मंत्री करुन या दोन्ही जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढविण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे. तसेच भाजपाने राणे यांना रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कमंत्री करुन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर अंकुश लावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कोकणातील या दोन्ही जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार जास्त असले तरीही भाजपचे आमदार व खासदार राणे पिता-पुत्राने या दोन्ही जिल्ह्यात शिवसेना संपविण्याचा विडा उचलला आहे. मात्र या दोन्ही मित्र पक्षातील वादाचा फायदा शिवसेना ठाकरे व मनसेला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच दोन्ही जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे भवितव्य ठरविणार आहेत, हेही तितकेच खरे आहे.

पक्ष वाढविण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. भाजप जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध करेल. प्रशांत यादव यांच्या रुपाने भाजपाला जिल्ह्यात आणखी मोठी ताकद मिळणार आहे. यातील बदल येत्या निवडणुकांमध्ये दिसेल. – राजेश सावंत, जिल्हाध्यक्ष भाजपा</p>