scorecardresearch

हरियाणात ८ माजी आमदारांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश, हरियाणा काँग्रेसला संजीवनी मिळणार का ?

अनेक नेते काँग्रेससोडून भाजपा किंवा इतर स्थानिक पक्षांत सामील होत आहेत.

देशात सध्या काँग्रेस पक्ष संघटनात्मक अडचणींना सामोरा जात आहे. पक्षांतर्गत कुरबुरी पक्ष नेतृत्वाच्या अडचणींमध्ये भर घालत आहेत. अनेक नेते काँग्रेस सोडून भाजपा किंवा इतर स्थानिक पक्षांत सामील होत आहेत. हार्दिक पटेल यांच्यासारख्या राहुल गांधी यांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याने काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यामुळे पक्षात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना हरियाणामध्ये काँग्रेससाठी मोठी दिलासादायक बाब घडली आहे. हरियाणाच्या एका माजी मंत्र्यासह ८ माजी आमदारांनी कॉंग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला आहे. यापूर्वी काँग्रेस सोडलेल्या दोघांसह सर्व आठ जणांचे विरोधी पक्षनेते भुपिंद्रसिंग हुड्डा यांनी स्वागत केले आहे.

पक्षात सामील झालेल्या नेत्यांची नावे

हरियाणात कॉंग्रेसमध्ये सामील झालेल्यांमध्ये शारदा राठोड, ज्यांनी २०१९ मध्ये काँग्रेससोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता, रामनिवास घोडेला, नरेश सेलवाल, परमिंदरसिंग धुल, जिले राम शर्मा, राकेश कंबोज, राजकुमार वाल्मिकी आणि सुभाष चौधरी यांचा समावेश आहे. त्यांचे स्वागत करताना हुड्डा म्हणाले की “लोकांच्या भावना काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यासाठी हाच पर्याय असल्यामुळे लोकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. हरियाणात पक्ष पुनरागमन करत आहे.”

कॉंग्रेसमध्ये सामील झालेले नेते विविध समाजाचे प्रतिनिधित्व करतात. दोन कंबोज समाजाचे, दोन अनुसूचित जाती, एक ब्राह्मण, एक जाट, एक राजपूत, एक लोहट आणि एक प्रजापती समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. सर्व समाजातील लोक हे काँग्रेसच्या पाठिशी असल्याचे हे प्रतीक असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

हरियाणा काँग्रेसला संजीवनी

या नेत्यांच्या प्रवेशामुळे हरियाणा काँग्रेसला संजीवनी मिळण्यास मदत होणार आहे. जून महिन्यात हरियाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात होणार आहे. १९ जूनला नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. असं असताना महापालिका निवडणूक वगळून बाकी सर्व निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढावाव्यात की नाही याबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. पक्षाने नुकतीच सदस्य नोंदणी मोहीम राबवली होती. पण ती फारशी परिणामकारक ठरली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. हरियाणा काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत कुरबुरी आणि गटबाजी फार मोठ्या प्रमाणात आहे. अशातच पंजाब विधानसभेत बाजी मारल्यानंतर आम आदमी पक्ष हरियाणामध्ये पाय रोवण्याच्या तयारीत आहे. अरविंद केजरीवाल स्वतः हरियाणात लक्ष घालत आहेत. काँग्रेसपुढील आव्हाने वाढतच असताना या एका माजी मंत्र्यासह ८ माजी अमदारांनी पकडलेली काँग्रेसची कास पक्षासाठी नक्कीच दिलासादायक असणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rejoining of 8 ex mla in congress is the booster moment for haryana congress pkd

ताज्या बातम्या