Madhya Pradesh roads controversy माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी बिहारमधील रस्ते अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालांसारखे गुळगुळीत करण्याबद्दल एक टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली होती. आता अशाच स्वरूपाच्या एका वादग्रस्त विधानाने मध्य प्रदेशात राजकीय वाद निर्माण केला आहे. मध्य प्रदेशमधील भाजपा आमदार प्रीतम लोधी यांनी राज्यातील रस्त्यांची तुलना अभिनेते ओम पुरी आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी केली आहे. ते नक्की काय म्हणाले? यामुळे वाद निर्माण होण्याचे कारण काय? यापूर्वीही त्यांनी अशी विधाने केली आहेत का? त्याविषयी जाणून घेऊयात.
भाजपा आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
सोमवारी राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी आलेले भाजपा आमदार प्रीतम लोधी पावसाळ्यात राज्याच्या खड्डेमय रस्त्यांबद्दल बोलत होते. त्यावेळी त्यांनी रस्त्यांची तुलना बॉलीवूड अभिनेत्यांशी केली. ते म्हणाले की, काँग्रेसच्या पूर्वीच्या राजवटीत मध्य प्रदेशातील रस्त्यांची अवस्था अभिनेते ओम पुरी यांच्यासारखी होती, तर भाजपाच्या राजवटीत हे रस्ते अभिनेत्री श्रीदेवींसारखे आहेत.
“दिग्विजय सिंह यांच्या कार्यकाळात (मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना) रस्ते ओम पुरींच्या गालांसारखे होते, तर भाजपाच्या राजवटीत ते श्रीदेवींसारखे आहेत. पण, आता पाऊस पडत आहे. आपल्याला अजूनही इंद्रदेवाशी बोलणी करावी लागेल,” असे ते म्हणाले. प्रीतम लोधी शिवपुरी जिल्ह्यातील पिछोर मतदारसंघाचे आमदार आहेत. लोधी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना खड्ड्यांबाबत आणि भोपाळमधील नुकत्याच झालेल्या भूस्खलनाच्या घटनेबद्दल विचारले असता त्यांनी हे वादग्रस्त विधान केले.
वादग्रस्त विधानावर विरोधकांचा संताप
- वादग्रस्त विधानामुळे विरोधकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
- मध्य प्रदेश काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा विभा पटेल यांनी या वादग्रस्त विधानाचा निषेध केला आहे.
- ही टिप्पणी एका दिवंगत महिलेचा अनादर करणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोधी यांनी माफी मागावी किंवा त्यांच्या पक्षाने त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी विभा पटेल यांनी केली आहे.
त्या पुढे म्हणाल्या, “भाजपा आमदार महिलांचा अपमान करण्याची सवय लावून बसले आहेत. ऑपरेशन सिंदूरदरम्यान आमच्या शूर महिलांचा अपमान करण्यात आला.” ही टीका करताना त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान अधिकृत माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात राज्याचे वरिष्ठ मंत्री कुंवर विजय शाह यांनी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीचा उल्लेख केला.
त्यांनी पुढे म्हटले, “भाजपा नेत्यांना संस्कृती आणि शिष्टाचाराबद्दल कितीही प्रशिक्षण दिले जात असले, तरी सत्तेच्या नशेत असलेले नेते महिलांचा अपमान करतच राहतात. जर आमदाराने माफी मागितली नाही आणि भाजपाने त्यांना बडतर्फ केले नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू. या आमदारांना आम्ही शांत बसू देणार नाही. “२०१७ मध्ये बॉलीवूड अभिनेते ओम पुरी यांचे निधन झाले होते, तर अभिनेत्री श्रीदेवी यांचे २०१८ मध्ये वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले.
लोधी यांची वादग्रस्त विधाने
लोधी यांनी वादग्रस्त विधाने करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सुमारे दोन महिन्यांपूर्वी जाती-आधारित जनगणनेवर बोलताना ते म्हणाले होते, “भारतात मोदी-लोधी नाणे राज्य करेल. जाती-आधारित जनगणनेमुळे ओबीसी समाजाला खूप फायदा होईल, लोधींचा उदय होईल.”
२०२२ मध्ये त्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या जातीयवादी टिप्पणीबद्दल त्यांच्यावर टीका झाली होती.
वीर योद्धा राणी अवंतीबाई लोधी यांच्या जयंतीनिमित्त एका विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले होते, “ब्राह्मण लोक धार्मिक विधी आणि प्रार्थनांच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवत होते आणि सामान्य लोकांकडून पैसे व इतर गोष्टी लुटत होते. ते आमच्या पैशांवर आणि संसाधनांवर भरभराट करत आहेत. चांगल्या कुटुंबातील सुंदर महिलांना पाहून त्यांना या महिलांच्या घरी जेवण करायचे असते. त्यांना तरुण महिला समोरच्या रांगेत आणि वृद्ध महिलांना मागे बसवायचे असते,” असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.