Mohan Bhagwat on Hindu festival meat ban राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘संघाच्या प्रवासाची १०० वर्षे – न्यू होरायझन्स’ या तीन दिवसांच्या शताब्दी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज विविध विषयांवर मते व्यक्त केले. त्यांनी हिंदू सण आणि मांसविक्रीवरून सुरू असलेल्या वादावरदेखील मत व्यक्त केले. आता त्यांच्या भूमिकेची चर्चा होत आहे. सरसंघचालक मोहन भागवत नक्की काय म्हणाले? जाणून घेऊयात…
मोहन भागवत काय म्हणाले?
सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू सणांदरम्यान लोकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी मांसविक्री मर्यादित ठेवण्यास समर्थन दिले, त्याच वेळी त्यांनी हेही स्पष्ट केले की, लोकांच्या खाण्याच्या सवयी हा कोणाचाही वैयक्तिक प्रश्न असू नये. भागवत म्हणाले, “अन्नपदार्थांचा धर्माशी संबंध नाही; पण उपवासाच्या दिवशी लोक त्याचे सेवन टाळतात. सणांदरम्यान शाकाहारी जेवण घेणे सामान्य आहे. अशा वेळी जर कोणी आपल्या घरासमोरच असे (मांस खाताना किंवा विकताना) दिसले, तर त्यांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. तो सण फक्त दोन-तीन दिवसांचा असतो. अशा वेळी सारासार विचार करून लोकांनी अशा गोष्टींपासून दूर राहायला हवे. कोणी काय खातो याने माझ्या भावना दुखावू नयेत; पण त्यांच्या भावनांचा आदर करणे चांगली गोष्ट आहे. भागवत यांनी संघाच्या ऐतिहासिक भूमिकेवर जोर दिला की, शाकाहाराला प्रोत्साहन देण्याच्या अजेंड्याशिवाय लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे.
मांसाहाराबद्दल संघाची भूमिका काय?
गेल्या १० वर्षांत विविध राज्यांमध्ये भाजपा सरकारांनी मांसाच्या विक्रीवर नियंत्रण आणले आहे. उत्तर प्रदेशमध्ये नवरात्री आणि कावड यात्रांसारख्या सणांच्या कालावधीत काही ठिकाणी मांसाची दुकाने बंद करण्यात आली आहेत. मध्य प्रदेशनेही विद्यार्थ्यांसाठीच्या माध्यान्ह भोजनातून अंडी वगळण्याचा निर्णय घेतला होता. २०२३ मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मोहन यादव यांनी मांसविक्रीचे नियमन हा त्यांच्या पहिल्या निर्णयांपैकी एक असल्याचे त्यांनी जाहीर केले ह़ोते.
मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मांसाहाराबद्दल समस्या नव्हती. त्यांचा विरोध मोठ्या प्रमाणात गोमांस खाण्याला आहे. आरएसएसचे इतिहासकार रतन शारदा सांगतात की, संघ कार्यकर्ते मोठ्या संख्येने मांसाहारी आहेत. “संघाने कधीही शाकाहाराला प्रोत्साहन दिलेले नाही. संघाच्या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला पूर्णपणे शाकाहारी जेवण दिसले असेल; पण त्याचा संबंध आर्थिक बाबींशी जास्त आहे. संघाकडे कधीही भरपूर निधी नव्हता आणि त्यामुळे ते त्यांच्या कार्यक्रमांसाठी स्वस्त शाकाहारी जेवणावर अवलंबून राहायचे. हळूहळू ती एक संस्कृती झाली. पण, संघ कार्यकर्ते मोठ्या संख्येने मांसाहारी आहेत,” असे आजीवन संघाचे सदस्य असलेल्या शारदा यांनी एका जुन्या मुलाखतीत ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले होते. शारदा यांनी स्पष्ट केले की, गाईच्या मांसावरील संघाची भूमिकाही स्पष्ट आहे की, हिंदू धर्मात गाईला मध्यवर्ती स्थान असल्यामुळे तिचे मांस खाऊ नये.
या भूमिकेत काही बदल झाले आहेत का?
ईशान्येकडील राज्यांमध्ये गोमांस मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते, तिथे संघाच्या भूमिकेत बदल झाले आहेत. “संघाने ईशान्य आणि इतर काही ठिकाणी जुळवून घेतले आहे. ईशान्येकडील भागात काम करणारे संघ प्रचारक स्थानिक लोक जे खातात, तेच खातात. १९६९ मध्ये आसाममध्ये संघाची एक बैठक झाली होती आणि त्यात सामील झालेले अनेक स्थानिक नेते गोमांस खाणारे होते. संस्थेमध्ये अशी कुजबुज सुरू होती की, या लोकांना हिंदू म्हणता येणार नाही. गुरू गोळवलकर म्हणाले होते की, ते सर्व हिंदू आहेत आणि आर्थिक कारणांमुळे त्यांनी गोमांस खाण्यास सुरुवात केली असेल. ते म्हणाले की, कालांतराने ते सर्व जण यातून बाहेर पडतील. आहारविषयक सवयींवरून समाजात संघाचा कधीही वाद झालेला नाही,” असे शारदा म्हणाले.
एका ज्येष्ठ आरएसएस नेत्याने याबाबत स्पष्ट करताना म्हटले, “सर्व प्रकारचे लोक संघात येतात. किनारपट्टी भागात आणि केरळसारख्या राज्यांमध्ये जवळजवळ प्रत्येक जण मांसाहारी आहे. संघ ज्या प्रदेशात काम करतो, त्यानुसार त्यांच्या आहाराच्या प्राधान्यांमध्ये बदल होतो. आम्ही कधीही असे म्हणत नाही की, एक खाद्यपदार्थ दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. संघात आहारावरून कधीही वाद होत नाही.”
संघाचा शाकाहाराकडे कल कधी वाढला?
माजी आरएसएस नेते के. एन. गोविंदाचार्य म्हणाले की, ऐतिहासिकदृष्ट्या संघाचा तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थळांजवळ मांस विकले जाण्यावर आक्षेप आहे. “त्यामुळेच हरिद्वार शाकाहारी झाले. मथुरा व वृंदावनसाठीही असेच युक्तिवाद झाले आहेत. हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी सरकारची होती; पण त्यात त्रुटी राहिल्या. पण, संघासाठी मांसाहारावर पूर्णपणे बंदी नाही,” असे ते म्हणाले.
एका ज्येष्ठ भाजपा नेत्याने सांगितले की, पक्षाच्या मोठ्या राजकीय कथनात शाकाहाराकडे कल वाढणे ही एक अलीकडील घटना आहे. या नेत्याने १९५४ मध्ये कोलकाता येथे झालेल्या जनसंघाच्या एका बैठकीचा किस्सा सांगितला. त्यात पक्षाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या निधनानंतर २५ नेते उपस्थित होते. एका स्थानिक जनसंघ कार्यकर्त्याने बंगाली परंपरेनुसार रात्रीच्या जेवणात मांसाहारी जेवण देण्याची व्यवस्था केली होती; पण नेत्यांच्या आहाराच्या प्राधान्यांविषयी त्याला खात्री नव्हती.
हा प्रश्न उघडपणे विचारणे असभ्य मानले जात असल्याने, त्यांच्या आहाराच्या प्राधान्यासाठी चिठ्ठ्या फिरवण्यात आल्या. “त्यात फक्त दोनच कार्यकर्ते शाकाहारी होते,” असे त्या नेत्याने सांगितले. एका आरएसएसच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, समुदायांमध्ये आपापसांत मतभेद मिटवता येत नसतील, तरच मांसबंदी कायद्याची गरज पडते.
आरएसएसच्या पदाधिकाऱ्याने सांगितले, “सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी जे सांगितले, तो सर्व समुदायांना आपापसांत याबाबतचे प्रश्न सामंजस्याने सोडवण्याचा एक संदेश आहे. जर ते सोडवले नाहीत, तरच कायदा अस्तित्वात येतो. हे खरे आहे की, देशाच्या काही भागांमध्ये बहुतेक हिंदू महत्त्वाच्या सणांदरम्यान मांस खात नाहीत. त्यांच्या भावनांचा आदर करण्यात काहीच गैर नाही. कावड मार्गाच्या काही भागांवर मांसाची दुकाने बंद केली जात नाहीत. त्या कालावधीसाठी दुकानदार पर्यायी व्यवस्था करू शकतात. पण, भागवतजींनी हेही स्पष्ट केले आहे की कोणीही इतरांनी काय खावे याचा द्वेष करू नये. हा सर्व समुदायांसाठी एक संदेश आहे.”