“भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त आहेत”, असे चमत्कारिक वक्तव्य भाजपाचे प्रवक्ते आणि पुरी मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार संबित पात्रा यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे बराच वाद झाला. खासकरून ओडिशामध्ये या वक्तव्यावरून वादंग माजले असून विरोधकांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेत भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पुरी मतदारसंघातील निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे पाहणे निर्णायक ठरेल.
“संबित पात्रा यांना त्यांची चूक कळाली हे बरे झाले. त्यांनी ताबडतोब माफी मागायला हवी होती, हेही खरे आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे मत न देण्याचा निर्णय मी घेतलेला नाही. मी फक्त नरेंद्र मोदींमुळे भाजपाला मत देतो. त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, अशी माझी इच्छा आहे”, असे स्थानिक रहिवाशी सुआरा यांनी म्हटले. मात्र, पुरी मतदारसंघातील प्रत्येकाचेच मत असे नाही. बरेच जण संबित पात्रा यांच्या वक्तव्यामुळे दुखावले गेले आहेत. त्यांची माफीही अनेकांच्या पचनी पडलेली नाही. पात्रा यांनी तीन दिवसांचा उपवास करून पश्चाताप करणार असल्याचे म्हटले असले तरीही अनेक मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. पुरी लोकसभा मतदारसंघातील उमाकांत बेहरा म्हणाले की, “राजकारण्यांनी अशी विधाने करण्याआधी थोडा विचार केला पाहिजे. बोलताना त्यांची जीभ घसरली की त्यांनी हे वक्तव्य मुद्दाम केले, याची मला कल्पना नाही. मात्र, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे भावना नक्कीच दुखावल्या जातात. कुणी देवाला एखाद्या माणसाचा भक्त कसे काय म्हणू शकते?”
हेही वाचा : पंचहात्तरीनंतर निवृत्त होण्याचा स्वत:चाच नियम मोदी का पाळणार नाहीत? केजरीवाल म्हणाले…
“भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त”
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २० मे रोजी ओडिशामधील पुरी मतदारसंघामध्ये गेले होते. तिथे त्यांनी जगन्नाथ मंदिरात देवाचे दर्शन घेऊन आपल्या रोड शोला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोदरम्यान संबित पात्राही सामील झाले. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, “भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त आहेत.” त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ झाला. ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी यावर टीका केली. विरोधकांकडून अधिक टीका होऊ लागल्यानंतर संबित पात्रा म्हणाले की, “पंतप्रधान मोदींच्या यशस्वी रोड शोनंतर मी अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. या मुलाखतींवेळी मी अनेक ठिकाणी म्हणालो की, पंतप्रधान मोदी भगवान जगन्नाथांचे भक्त आहेत. परंतु, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी म्हणालो, भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त आहेत. कधी-कधी माणसाची जीभ घसरते, त्यामुळे माझ्या त्या वक्तव्याला निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा बनवू नये.”
ओडिशामध्ये भगवान जगन्नाथाचे मंदिर महत्त्वाचे मानले जाते. या राज्यात ९० टक्के हिंदू लोकसंख्या आहे. पुरीमधील हे देवस्थान संपूर्ण देशातील हिंदूंसाठी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. संबित पात्रा याच पुरी मतदारसंघामधून भाजपाचे उमेदवार आहेत. संबित पात्रा यांची ओळख एवढ्यापुरती मर्यादित नाही. ते भाजपाचे सुप्रसिद्ध प्रवक्ते आहेत. वृत्तवाहिन्यांवरील वादविवादात ते हिरिरीने सहभागी होतात. पात्रा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही उमेदवारी दाखल केली होती. मात्र, बिजू जनता दलाचे उमेदवार पिनाकी मिश्रा यांच्याकडून ११,७१४ मतांनी त्यांचा पराभव झाला.
बिजू जनता दल विरुद्ध भाजप
ओडिशामध्ये काँग्रेसही निवडणूक लढवत असला तरीही पुरी मतदारसंघामध्ये मुख्य लढत बिजू जनता दल आणि भाजपाच्या उमेदवारामध्ये आहे. काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी निधीच्या कमतरतेचे कारण देत पक्षाचे तिकीट परत केले होते. त्यांच्या जागी जयनारायण पट्टनायक निवडणूक लढवत आहेत. पुरी लोकसभा मतदारसंघामधील काँग्रेसच्या मतांची टक्केवारी घटताना दिसत आहे. काँग्रेसच्या बाजूने २००९ मध्ये १७.०६ टक्के, तर २०१४ मध्ये १८.५ टक्के असणारे मतदार २०१९ च्या निवडणुकीमध्ये थेट ३.९४ टक्क्यापर्यंत घसरले.
१९९८ पासून पुरी लोकसभा मतदारसंघामध्ये बिजू जनता दलाच्या उमेदवाराचाच विजय होत आला आहे. मात्र, २०१९ मध्ये पहिल्यांदा बिजू जनता दलाला भाजपाच्या संबित पात्रा यांच्याकडून तगडे आव्हान मिळाले. ते वृत्तवाहिन्यांवरील परवलीचा चेहरा असल्यामुळे त्यांची लोकप्रियता अधिक होती. मात्र, तरीही ते पराभूत झाले. २०१९ मध्ये पुरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाची संघटनात्मक ताकद फारच कमकुवत होती. मतदानाच्या फक्त महिनाभर आधी संबित पात्रा यांची उमदेवारी जाहीर करण्यात आली होती. तरीही संबित पात्रा यांनी चांगली कामगिरी केली.
संबित पात्रा – वाकयुद्धात पटाईत भाजपाचा प्रवक्ता
बिजू जनता दलाचे विद्यमान खासदार पिनाकी मिश्रा हे सुप्रसिद्ध वकील असून तब्बल तीनवेळा त्याच मतदारसंघातून संसदेत गेले आहेत. २००९ च्या निवडणुकीमध्ये २.११ तर २०१४ च्या निवडणुकीमध्ये तब्बल २.६३ लाखांच्या मताधिक्याने त्यांनी विजय प्राप्त केला होता. मात्र, यावेळी बिजू जनता दलाने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. ‘दिल्लीतील नेता’ अशी संबित पात्रा यांची ओळख असल्यामुळे तिकीट जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात ते लगेचच चर्चेत आले. ते वाकयुद्ध करण्यात पटाईत आहेत. तसेच लोकांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यातही त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. पारंपरिक धोतर-कुर्ता आणि खांद्यावर भगवे उपरणे परिधान करून ते विविध माध्यमांतून चर्चेत राहतात. आपल्या मतदारांच्या घरी जेवायला जाणे, मतदारांच्या घरी रात्र घालवणे आणि मंत्रोच्चारासाठी तलावात अंघोळ करणे यांसारख्या प्रयत्नांनी त्यांनी आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. संबित पात्रा यांनी अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते पुरी शहरातील तेलुगू मतदारांसमोर एका सार्वजनिक सभेत गाताना दिसले. पुरी लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवण्यात अपयश आलेले असले तरीही भाजपाने या मतदारसंघातील दोन विधानसभा मतदारसंघावर २०१९ मध्ये विजयी पताका फडकावली आहे. भाजपाची वाढती लोकप्रियता आणि संबित पात्रा यांचे प्रयत्न, यामुळे पुरी आणि ब्रह्मगिरी विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहेत. उर्वरित विधानसभा मतदारसंघामध्ये आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. २०१९ मध्ये पराभव पत्करावा लागला असला तरीही संबित पात्रा यांनी वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेणे थांबवलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्येही ते मजबूत आव्हान म्हणून उभे आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी पुरीत पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचे प्रगतिपत्रकही प्रसिद्ध केले.
हेही वाचा : तेजस्वींच्या पाठदुखीवरून राजकीय वाकयुद्ध; पंतप्रधान मोदी म्हणतात, “बिहारचा शहजादा…”
पुरी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रस्थापित उमेदवाराविरोधात जनमताचा कौलही आहे. “पिनाकी बाबूंना आम्ही २००९ पासून निवडून देत आहोत, मात्र निवडणूक झाल्यानंतर ते कुठेच दिसत नाहीत. यावेळी या मतदारसंघामधून नव्या उमेदवाराला संधी मिळायला हवी”, असे मत देलंगा येथील रहिवासी श्रीधर मंगराज यांनी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर अनेक वरिष्ठ भाजपा नेत्यांनी संबित पात्रा यांचा प्रचार केला आहे.
बिजू जनता दलाची ताकद
विद्यमान खासदाराविरोधात रोष असल्याचे पाहूनच बिजू जनता दलाने नवा उमेदवार दिला आहे. त्यामुळे पुरीमध्ये आपल्या पक्षाविरोधातील रोष कमी करण्यात त्यांना यश मिळू शकते. या ठिकाणी बिजू जनता दलाने निवृत्त पोलिस अधिकारी अरुप पटनायक यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी याआधी २०१९ मध्ये भुवनेश्वर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपाच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. अरुप पटनायक यांना आता पुरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची प्रतिमा स्वच्छ असल्याने आणि ते निवृत्त सनदी अधिकारी असल्यामुळे त्याचा फायदा बिजू जनता दलाला होऊ शकतो. त्यातच संबित पात्रा यांचे भगवान जगन्नाथ आणि मोदींसंदर्भातील वक्तव्य अंगलट आल्यानेही बिजू जनता दलाचे पारडे जड झाले आहे.