संजय राठोड : मतदारांसाठी धडपडणारा पण वादग्रस्त चेहरा

संजय राठोड मंत्री झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला हादरा बसला आहे.

संजय राठोड : मतदारांसाठी धडपडणारा पण वादग्रस्त चेहरा
संजय राठोड- कॅबिनेट मंत्री

नितीन पखाले

मंत्री झाल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारसलग तिसऱ्यांदा मंत्रीनितीन पखाले, लोकसत्तायवतमाळ –  शिंदे गटात गेलेल्या आमदारांपैकी विदर्भातील केवळ संजय राठोड यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे भाजपचे पाच आमदार असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. संजय राठोड मंत्री झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला हादरा बसला आहे.

संजय राठोड हे दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे चौथ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत. कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. यापूर्वी युती सरकारमध्ये २०१४ ते २०१९ मध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये २०१९ ते २०२१ असे दीड वर्षे वनमंत्री म्हणून कार्यरत होते. लोकांमधील नेता अशी संजय राठोड यांची मतदारसंघात ओळख आहे. २००४ पासून ते सलग आमदार आहेत. बंजारा बहुल असलेल्या दिग्रस मतदारसंघात  आमदार झाल्यानंतर या मतदारसंघावर त्यांची एकछत्री पकड आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे या मतदारसंघातील कधीकाळी असलेले वर्चस्व राठोड यांनी संपुष्टात आणले. बंजारा समाजाची ताकद, लोकांमध्ये थेट जाण्याची वृत्ती, मतदारसंघातील कोणत्याही व्यक्तीचे काम करून देण्याची धडपड, मतदारसंघासाठी सरकारकडून सातत्याने निधी आणून अनेक योजना मार्गी लागाव्या यासाठी होत असलेले प्रयत्न यामुळे संजय राठोड मतदारसंघात लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतरही बंजारा समाज आणि मतदारसंघातील जनता त्यांच्यासोबत असल्याचा प्रत्यय आला.

हेही वाचा- सुरेश खाडे : सांगलीत कमळ पुरवणारा भाजपचा चेहरा 

मात्र हे प्रकरण भाजपच्या चित्रा वाघ यांनी उचलून धरल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  राजीनामा घेतल्याची खंत राठोड यांना होती. त्यामुळे मंत्रीपद गेल्यानंतरराठोड यांनी मंत्रिमंडळात येण्यासाठी सर्व प्रयत्न चालविले होते. बंजारा समाजाचे राज्यात ठिकठिकाणी मेळावे घेऊन समाजाचे नेतृत्वही राठोड यांनी आपल्याकडे घेतले. बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी येथील महंतांसह अखिल भारतीय बंजारा परिषदेच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करावा म्हणून विनंती केली होती. शिवसेनेत फूट पडली नसती तरीही संजय राठोड मंत्री झाले असते, असे चित्र निर्माण करण्यात आले होते. स्वतःचे अस्तित्व आणि वर्चस्व यासाठी कायम दक्ष असलेले नेते म्हणून संजय राठोड ओळखले जातात. पक्षासह विरोधी पक्षातील नेत्यांशीही हितसबंध जपतात. त्यामुळे त्यांना जिल्ह्यात अद्याप उघड विरोधक तयार झाला नाही. आता ते शिंदे गटात असल्याने स्थानिक शिवसेना राठोड यांच्या विरोधात कशा पद्धतीने एकवटते ते महत्वाचे आहे. शिवाय भाजपचे जिल्ह्यातील पाच आमदारही राठोड यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याची शक्यता आहे. 

चित्रा वाघ संतापल्या

पुण्यातील एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणात केवळ राजकीय चिखलफेक झाली, प्रत्यक्षात राठोड यांच्याविरोधात कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने पुणे पोलिसांनी ‘क्लीनचिट’ दिल्याचा दावा राठोड समर्थक करतात. मात्र आज संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच हे प्रकरण लावून धरणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. ‘तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या राठोड यांना मंत्रीपद मिळणे दुर्दैवी आहे. ते मंत्री झाले असले तरी आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून लढू आणि जिंकू’, अशा शब्दांत चित्रा वाघ समाज माध्यमावर व्यक्त झाल्या आहेत. दुसरीकडे संजय राठोड मंत्री झाल्याने ‘ ज्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडले, तेच आता मंत्री झाल्यानंतर चित्रा वाघ कुठे गायब आहेत, ते शोधावे लागेल’, अशा शब्दांत शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी टीकास्त्र सोडले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay rathod is face who fight for his voters but he is controversial face print politics news pkd

Next Story
सुरेश खाडे : सांगलीत कमळ पुरवणारा भाजपचा चेहरा 
फोटो गॅलरी