राज्यसभेच्या १९९८ मध्ये झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीतील शिवसेनेचे दिवंगत नेते सतीश प्रधान यांच्या १.३७ मताच्या निसटत्या विजयाने राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली होती. सतीश प्रधानांच्या त्या विजयातच शरद पवारांच्या बंडाची व राष्ट्रवादीच्या स्थापनेची बिजे रोवली गेली.

ठाण्यात गडकरी रंगायतन, दादाजी कोंडदेव क्रीडा संकुल किंवा चांगले रस्ते अशी कामगिरी नगराध्यक्षपदी असताना केल्याने सतीश प्रधानांचे नाव तेव्हा राज्यभर झाले होते. ठाण्यातील महापौर निवडणुकीतील मतांच्या फाटाफुटीत सतीश प्रधान हे लक्ष्य झाले होते. पण पुढे शिवसेनेने सतीश प्रधान यांना १९९२ मध्ये राज्यसभेवर संधी दिली. १९९८ मध्ये त्यांची मुदत संपल्यावर पुन्हा उमेदवारी देण्यात आली. तेव्हा शिवसेना राज्यात सत्तेत होती. शिवसेनेने तेव्हा पत्रकार प्रितीश नंदी आणि सतीश प्रधान या दोघांना उमेदवारी दिली होती. भाजपचे प्रमोद महाजन, काँग्रेसचे नजमा हेपतुल्ला आणि राम प्रधान, अपक्ष विजय दर्डा आणि सुरेश कलमाडी असे उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसने सोनिया गांधी यांचे विश्वासू व माजी गृहसचिव राम प्रधान यांना रिंगणात उतरविले होते. विजय दर्डा आणि सुरेश कलमाडी हे दोन काँग्रेसचेच नेते अपक्ष रिंगणात उतरले होते. राज्यसभेची ती निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती.

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा-संघाचं मिशन मनपा, आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात; मित्रपक्षांबाबत भूमिका काय?

प्रमोद महाजन हे सर्वाधिक मते मिळवून पहिल्याच फेरीत निवडून आले होते. त्यापाठोपाठ विजय दर्डा यांना मते मिळाली होती. पुढील फेरीत प्रितीश नंदी आणि सुरेश कलमाडी निवडून आले. अन्य मते हस्तांतरित झाल्याने नजमा हेपतुल्ला यांचा मतांचा कोटा पूर्ण झाला. शेवटी सतीश प्रधान आणि राम प्रधान यांच्यातच चुरस झाली. ४१०१ मतांचा कोटा कोणीच पूर्ण केला नव्हता. सर्व मते मोजून झाल्यावर सतीश प्रधान यांना ३९३३ तर राम प्रधान यांना ३७९६ मते मिळाली. मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास सर्वाधिक मते मिळविणारा विजयी ठरतो. सतीश प्रधान हे १.३७ मताने निवडून आले.

हेही वाचा – Prajakta Mali vs Suresh Dhas: प्राजक्ता माळीच्या विषयावरून आमदार सुरेश धस भाजपामध्ये एकाकी; नेत्यांनी कान टोचले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम प्रधान यांचा पराभव काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फारच गांभीर्याने घेतला. शरद पवारांच्या गटातील आमदारांना नोटीसा बजाविण्यात आल्या. आर. आर. पाटील. जयंत पाटील आदी दहा आमदारांना दिल्लीत फार वाईट वागणूक देण्यात आली. यातूनच काँग्रेसमध्ये खदखद वाढली. शरद पवारांवर सारे खापर फोडण्यात आले. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एक मताने पडल्यावर तत्कालीन विरोधी पक्षनेते शरद पवार यांना विश्वासात न घेताच सोनिया गांधी यांनी सरकार स्थापण्याचा दावा केला होता. काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढत गेली. शेवटी शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्या विदेशीचा मुद्दा उपस्थित केला व त्यातून त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली. शरद पवारांनी मग राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडली. सतीश प्रधान यांच्या त्या दीड मताच्या विजयानेच सारी समीकरणे बदलत गेली.