‘इंडिया’तील जागावाटपाचा तिढा घटक पक्षांच्या नेतृत्वांमुळे नव्हे तर, स्थानिक नेत्यांच्या वर्चस्वाच्या लढाईमुळे निर्माण झालेला आहे. लोकसभा निवडणुकीत लढण्यासाठी काँग्रेसला अपेक्षित जागा हाती नसतील तर राज्यातील आपल्याच अस्तित्वावर घाला येईल या भीतीने दबावाचे राजकारण केले जात आहे.

‘तृणमूल काँग्रेस’च्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच राहुल गांधी-सोनिया गांधी या काँग्रेस नेते यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. पण, राज्यामध्ये पक्षावरील पकड टिकवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष व लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी धडपड करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये मालदा आणि मुर्शिदाबाद या दोन जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची थोडी फार ताकद टिकून असल्याने ‘तृणमूल काँग्रेस’ने लोकसभेसाठी दोन जागा काँग्रेसला देऊ केल्या होत्या. मुकाट्याने ही ‘ऑफर’ स्वीकारली तर अधीर रंजन यांच्या प्रदेश काँग्रेसमधील अस्तित्वालाच धक्का लागू शकतो. मग, त्याचे राजकीय वाटचालींवर विपरित परिणाम व्हायला फारसा वेळ लागणार नाही. त्यामुळे अधीर रंजन यांनी जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेआधीच ममतांसमोर आव्हान उभे केले आहे. ममतांना कोणी आव्हान दिलेले पसंत नसते, सुवेंदू अधिकारी यांनी बंडखोरी केल्यावर ममतांनी थेट नंदिग्राममधून त्यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती! अधीर रंजन यांनी ममतांच्या अधिकाराला ललकारल्यामुळे संतापून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या संभाव्य आघाडीवर कुऱ्हाड मारली आहे.

हेही वाचा – नगर जिल्ह्यात काँग्रेसची ताकद कायम राखण्याचे बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आव्हान

ममतांच्या आक्रमकपणामुळे पंजाबमधील आम आदमी पक्षाचे प्रादेशिक नेते आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही आघाडीत मोडता घालायला संधी मिळाली आहे. दिल्लीतील ‘आप’च्या नेत्यांनी काँग्रेसशी दोन बैठका केल्या होत्या. त्यामध्ये दिल्ली, गुजरात, गोवा, पंजाब आणि हरियाणा या पाचही राज्यांमध्ये जागा वाटून घेण्यावर सहमती झाली होती. दिल्लीमध्ये अजूनही ‘४-३’चे सूत्र स्वीकारले जाऊ शकेल. ‘आप’चे केंद्रीय नेतृत्व काँग्रेसशी आघाडी करण्याबाबत अनुकूल असले तरी पंजाब हे दिल्लीच्या तुलनेत मोठे राज्य आहे. तिथल्या १३ जागा हातातून सोडून देणे मुख्यमंत्री भगवंत मान यांना मानवणारे नाही. अंधीर रंजन यांना वाटणारी भीती मान यांच्याही मनात आहे. लोकसभेत तडजोड केली की, विधानसभा निवडणुकीतही करावी लागेल. मग, ‘आप’मध्ये आपल्या नेतृत्वालाही धक्का लागू शकतो. ही पाल चुकचुकल्यामुळे ममतांच्या आक्रमकपणाचा आधार घेत मान यांनीही काँग्रेसला विरोध केला आहे.

उत्तर प्रदेश व बिहार काँग्रेसमधील परिस्थिती फारशी वेगळी नाही. समाजवादी पक्षाने दोन-चार जागाच देऊ केल्या तर आम्ही करायचे काय, हा रास्त प्रश्न प्रादेशिक नेत्यांनी विचारला आहे. उत्तर प्रदेशमधील राजकारण बघून प्रदेशाध्यक्ष अजय राय, प्रभारी अविनाश पांडे वगैरे नेत्यांनी अयोध्या गाठली होती. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या समोपचाराच्या धोरणाविरोधात प्रादेशिक नेत्यांनी अप्रत्यक्ष बंड केल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – आदिती तटकरेंच्या विरोधातील शिंदे गटाच्या आमदारांची तलवार म्यान ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे असले तरी, ‘इंडिया’तील जागावाटपाला पूर्णविराम लागलेला नाही. महाराष्ट्र, तमिळनाडू आणि दिल्लीतील जागावाटपावर महिनाअखेर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. गुजरात, गोवा, हरियाणामध्येही ‘आप’शी तडजोड केली जाईल. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय’ यात्रा आज (गुरुवार) पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करत आहे. या यात्रेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण नसल्याचा दावा ममतांनी केला असला तरी खरगेंनी पत्र पाठवून अधिकृत निमंत्रण दिलेले होते. यात्रेच्या पश्चिम बंगालमधील टप्प्यामध्ये काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून ममतांची भेट घेऊन मनधरणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये जागावाटपावर तोडगा निघू शकतो, हाच कित्ता पंजाबमध्येही गिरवला जाऊ शकतो.