पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याविरूद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी तातडीने पदाचा राजीनामा दिल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन शहराध्यक्षासाठी शोधाशोध सुरू झाली आहे.
मानकर यांच्या राजीनाम्यानंतर या पदासाठी कोणीही उघडपणे तयारी दर्शविली नसताना आमदार चेतन तुपे किंवा माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे जबाबदारी द्यावी की कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्याकडे प्रभारी अध्यक्ष पदाची धुरा सोपवावी, या विवंचनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘राष्ट्रवादी’ पडली आहे.
मानकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. वाढता राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकांकडून बदनामी केली जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय कारकीर्द मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाची नाहक बदनामी होत असल्याने राजीनामा देत असल्याचे मानकर यांनी राजीनाम्याच्या पत्रात स्पष्ट केले आहे. त्यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
मानकर यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाकडून शहराध्यक्ष पदासाठी कोणीही उघडपणे तयारी दर्शविलेली नाही. त्यामुळे शहराध्यक्ष पदासाठी अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ची चाचपणी सुरू झाली आहे. या पक्षाचे पुणे शहरातील एकमेव आमदार चेतन तुपे यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची धुरा देण्यात यावी, असे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी सुचविले आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याही नावाची चर्चा आहे.

मात्र, कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरण त्यांच्या अंगलट आले. तसेच विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये साधकबाधक चर्चा करण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. तुपे आणि टिंगरे यांच्याशिवाय पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्याकडे प्रभारी शहराध्यक्ष पद सांभाळण्याची जबाबदारी देण्याबाबतही पदाधिकाऱ्यांनी विचारविनिमय केला आहे. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’त शहराध्यक्ष पदाबाबत त्रांगडे झाल्याचे दिसून येते.

अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ची पुणे शहराच्या उपनगरी भागात ताकद आहे. आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्यादृष्टीने या पक्षाने तयारी सुरू केली आहे. महायुतीकडून महापालिकेच्या निवडणुका लढल्यास प्रभागांची चाचपणीही सुरू करण्यात आली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, युवक, विद्यार्थी संघटनांचे १५०० पदाधिकारी आहेत. एक लाख सभासद नोंदविण्याच्या प्रक्रियेचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांना सभासद नोंदणी पुस्तिकांचे वाटप झाले आहे. अशा परिस्थितीत शहराध्यक्ष पदाचा मानकर यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन शहराध्यक्ष नियुक्त करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

नवीन शहराध्यक्ष नियुक्तीबाबतचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील. पुणे जिल्हा हा अजित पवार यांचे प्राबल्य असलेला आहे. ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लवकरच नवीन शहराध्यक्ष पदाचा निर्णय घेतला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रदीप देशमुख, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)