नागपूर : देशात सर्वात प्रथम महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे तत्कालीन मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते रविवारी पक्षाच्या मंडल यात्रेची सुरूवात होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर डोळा ठेवून पवार पुन्हा एकदा ओबीसी समाजाला पक्षाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या प्रयत्नात असल्याचे यातून दिसून येते.
मंडल आयोगाला भाजपने विरोेध केला होता. अडवाणी यांच्या श्रीराम रथयात्रेला ‘कमंडल’ यात्रा म्हणून भाजप विरोधकाकडून संबोधले जात होते. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्या त्यावेळी पेटवला जात होता. त्याच संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमधून शरद पवार यांच्या हस्ते मंडल यात्रेला हिरवी झेंडी दाखवली जाणार आहे. त्यामुळे पवार यांच्या नागपूर दौऱ्याला महत्त्व आहे.
विधानसभा निवडणुकीनंतरचा हा त्यांचा पहिला नागपूर दौरा आहे. ते त्यांच्या दौऱ्यात नेहमीच समाजातील विविध स्तरातील लोकांच्या भेटी घेतात. त्यांच्याशी चर्चा करतात. समाज मनाचा कानोसा घेतल्यावर ते राजकीय मोर्चेबांधणी करतात. मंडल यात्रा व त्यासाठी केलेली नागपूरची निवड याकडे पवार यांच्या मोर्चेबांधणीचाच एक भाग मानले जात आहे.
पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ओबीसींची संख्या आहे. पवार यांचे राजकारण नेहमीच सर्वसमावेश स्वरुपाचे राहिले आहे. त्यात त्यानी ओबीसी समाजाला सोबत घेण्याची भूमिका घेतल्याने या समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे अनेक नेते पवार यांना मानणारे आहेत. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे शरद पवार यांनीू सर्वात प्रथम राज्यात मंडल आयोग लागू केल्या होत्या. सध्याच्या ओबीसी केंद्रीत राजकारणात नव्या पिढीला ही बाब माहिती नाही. ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडल यात्रेचे प्रयोजन असल्याचे पक्षाकडून सांगितले जाते. मात्र या यात्रेसाठी नागपूरची केलेली निवड नुसता योगायोग नाही. तेथे संघाचे मुख्यालय आहे. संघाचा त्यावेळी मंडल आयोगाच्या शिफारसींना असलेला विरोध आणि आता भाजपचा ओबीसींवर असणारा प्रभाव लक्षात घेतला तर मंडल यात्रेच्या माध्यमातून भाजपचे खरे रुप ओबीसींसमोर मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीतर्पे केली जाण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीतही ओबीसींनी भाजपची साथ सोडल्याचे चित्र होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने जास्तीत जास्त ओबीसींना उमेदवारी देऊन भरपाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही या समाजाला युवा वर्ग सत्ताधाऱ्यांपासून स्वत:ला वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे, बेरोजगारीमुळे पिचलेल्या या वर्गाला मंडल यात्रेच्या माध्यमातून पक्षासोबत जोडण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे.
शरद पवार यांचा दौरा म्हणजे एकप्रकारे ओबीसी समाजावर लक्ष केंद्रित करून आगामी निवडणुकांसाठी बांधणी करण्याचा प्रयत्न आहे. “मंडल यात्रा” हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक सामाजिक आणि राजकीय दोन्ही स्तरावर महत्त्वाचा प्रयोग ठरू शकतो. आता पाहावे लागेल की या यात्रेमधून शरद पवार कसला संदेश देतात आणि ओबीसी समाजावर त्याचा किती प्रभाव पडतो. या यात्रेच्या माध्यमातून पवार काय संदेश देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.