मधु कांबळे

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना  ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेचे निमंत्रण स्वीकारले आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते  अमरनाथ राजूरकर यांनी आज एका शिष्टमंडळासह मातोश्रीवर उद्धव ठाकरे तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे  शरद पवार यांची भेट घेतली.

हेही वाचा >>> काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाला गांधी कुटुंबांचं ऐकावंच लागेल- पी चिदंबरम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, आपणही या यात्रेत सहभागी व्हावे, असे निमंत्रण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उभय नेत्यांना दिले. दोहोंनीही हे निमंत्रण स्वीकारले असून, शरद पवार स्वतः तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले. भारत जोडो यात्रेला देशभरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतोच आहे.

हेही वाचा >>> कोल्हापूर ते अंधेरी : पोटनिवडणुकीतील भाजपची दुट्टपी भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने (ठाकरे गट) यात्रेत सहभाही होण्यास सहमती दिल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात माजी मंत्री नसीम खान,  विश्‍वजीत कदम, महाराष्ट्राचे सहप्रभारी बी.एम. संदीप, आमदार सुधीर तांबे, आबा दळवी यांचा समावेश होता.