Shashi Tharoor on Indira Gandhi Emergency : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पक्षविरोधी भूमिका घेतल्याचं दिसून आलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये लादलेल्या आणीबाणीवर टीका करीत थरूर यांनी एक लेख लिहिला. आजचा भारत अधिक समृद्ध असून येथे एक मजबूत लोकशाही अस्तित्वात आहे, असं त्यांनी आपल्या लेखात म्हटलं. ‘हीडिंग द लेसन्स ऑफ इंडिया’ज एमर्जन्सी’या शीर्षकाखाली लिहिलेला हा लेख प्रथम प्रोजेक्ट सिंडिकेट या आंतरराष्ट्रीय संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला. त्यानंतर तो ख्रिस्ती समुदायाच्या पाठबळावर चालणाऱ्या दीपिका या मल्याळी दैनिकातही गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला.
नेमके काय म्हणाले शशी थरूर?
आणीबाणीच्या काळात ‘शिस्त आणि सुव्यवस्थेच्या’ नावाखाली झालेल्या अमानवीय क्रौर्याचा उल्लेख करीत थरूर लिहितात, “इंदिरा गांधी यांचे थोरले पुत्र संजय गांधी यांच्या नेतृत्वाखाली चालवण्यात आलेली जबरदस्तीची नसबंदी मोहीम हे क्रौर्याचे अत्यंत ठळक उदाहरण होते. ही मोहीम प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये राबवण्यात आली होती, जिथे नसबंदीच्या जबरदस्तीसाठी हिंसेचा वापर करून मनमानी उद्दिष्टे गाठली जात होती. तसेच, दिल्लीसारख्या शहरी भागांमध्ये अत्यंत निर्दयपणे झोपडपट्ट्या पाडण्यात आल्या आणि हजारो लोकांना बेघर करण्यात आले, त्यांच्या कल्याणाची कोणतीही काळजी घेतली गेली नाही.”
थरूर म्हणतात, आणीबाणीत जनतेचे दीर्घकालीन नुकसान
आणीबाणीची घोषणा करताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात शिस्तीची गरज असल्याचं म्हटलं होतं. तसेच देशातील व्यापक अराजकता व राष्ट्रीय सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या. त्याबाबत शशी थरूर लिहितात, “त्या काळात झालेल्या अतिरेकांमुळे असंख्य लोकांचे दीर्घकालीन नुकसान झाले. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या काळजाला खोलवर जखमा झाल्या. परिणामी, मार्च १९७७ मध्ये आणीबाणी हटवल्यानंतर घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींसह काँग्रेसला दारुण पराभवास सामोरे जावे लागले.”
आणखी वाचा : गुजरातमध्ये आम आदमी पार्टीच्या आमदाराला तडकाफडकी अटक; नेमकं काय आहे प्रकरण?
शशी थरूर यांची इंदिरा गांधींवर टीका
देशातील आजच्या स्थितीची १९७५ च्या परिस्थितीबरोबर तुलना करताना शशी थरूर लिहितात, “आजचा भारत अधिक आत्मविश्वासू, अधिक समृद्ध आणि मजबूत लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे. तरीसुद्धा आणीबाणीने दिलेले धडे आजही तितकेच अधिक महत्त्वाचे आहेत. सत्तेचे केंद्रीकरण, विरोधकांचा आवाज दाबणे आणि संविधानिक संरक्षणाला बगल देणे या सगळ्या गोष्टी विविध स्वरुपांत पुढे येऊ शकतात. विशेषतः जेव्हा ते ‘राष्ट्रीय हित’ किंवा ‘स्थैर्य’ यांसारख्या शब्दांच्या आड लपवले जाते.” थरूर पुढे म्हणतात, “या अर्थाने आणीबाणीचा काळ एक तीव्र इशारा म्हणून कायम लक्षात ठेवला पाहिजे. लोकशाही टिकवण्यासाठी सतत जागरूक राहणे हे प्रत्येक लोकशाही समर्थकाचे कर्तव्य आहे.”
इंदिरा गांधींनी आणीबाणी का जाहीर केली होती?
- १९७५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने १९७१ मधील लोकसभा निवडणुकीला अवैध ठरवले.
- लोकसभा निवडणुकीदरम्यान इंदिरा गांधींनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला होता, असे न्यायालयाने म्हटले होते.
- उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे इंदिरा गांधी यांची खासदारकी धोक्यात आली होती आणि त्या पंतप्रधानपदी राहू शकत नव्हत्या.
- त्याचवेळी देशातील महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या विरोधात जनतेमध्ये असंतोष वाढत होता.
- जयप्रकाश नारायण यांनी “संपूर्ण क्रांती”चा नारा दिला आणि केंद्र सरकारविरोधात आंदोलन उभं केलं.
- त्यांनी लष्कराला आणि पोलिस प्रशासनाला सरकारचे आदेश पाळू नका, असे कथित आवाहन केले होते.
- न्यायालयीन निर्णय आणि जनआंदोलनामुळे इंदिरा गांधींचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले होते.
- २५-२६ जून १९७५ च्या रात्री इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली. त्यांच्या मते देशात शिस्त आणि स्थिरतेची गरज होती.
- देशात लागू करण्यात आलेली आणीबाणी २१ महिने चालली आणि त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी पराभूत झाल्या.

शशी थरूर यांच्याकडून पंतप्रधानांचं कौतुक
मागील काही महिन्यांपासून शशी थरूर हे केंद्र सरकारसह पंतप्रधान मोदींचं उघडपणे कौतुक करताना दिसून येत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी केंद्र सरकारने परदेशात पाठवलेल्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व थरूर यांच्याकडे होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळताना थरूर यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली होती. इतकंच नाही तर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर ‘द हिंदू’मध्ये लिहिलेल्या लेखातही त्यांनी विरोधाभासी भूमिका घेत पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं होतं. नुकत्याच पार पडलेल्या निलांबूर पोटनिवडणुकीदरम्यान थरूर यांनी पक्ष नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्याचं मान्य केल्याने केरळमधील काँग्रेससाठी आणखी अडचण निर्माण झाली.
शशी थरूर यांच्या लेखावर काँग्रेसची प्रतिक्रिया
शशी थरूर यांनी त्यांच्या लेखातून आणीबाणीवर भाष्य करीत पक्षविरोधी भूमिका मांडल्याने केरळमधील काँग्रेसमध्ये फूट पडणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मी थरूर यांचा लेख वाचला असून त्यावर सध्या कोणतेही भाष्य करणार नाही, असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीसन यांनी म्हटलं आहे; तर “थरूर यांनी आधी ठरवावे की ते कोणत्या पक्षात आहेत. आमचा मुख्य उद्देश पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत विजय मिळवणे हा आहे. सध्याच्या टप्प्यावर आणीबाणीबाबत चर्चा करणे कालबाह्य आणि अप्रासंगिक आहे,” असं केरळमधील काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष के. मुरलीधरन यांनी स्पष्ट केलं आहे. आणीबाणीनंतरच्या १९७७ मध्ये झालेल्या केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : कोट्यवधींची संपत्ती, दंगली भडकावण्याचे अनेक आरोप; निशिकांत दुबेंचा राजकीय प्रवास कसा आहे?
थरूर यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये फूट पडणार?
दरम्यान, शशी थरूर यांनी अलीकडेच त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून एक सर्वेक्षण अहवाल शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांना आगामी केरळ विधानसभा निवडणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून दाखवण्यात आले आहे. तिरुवनंतपुरममधून चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेले थरूर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, त्यांना राज्याच्या राजकारणात अधिकच रुची आहे, त्यामुळे केरळ काँग्रेसमध्ये अस्वस्थता आणि अंतर्गत संघर्ष वाढल्याचे चित्र दिसत आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (UDF) समन्वयक अडूर प्रकाश म्हणाले, “काही लोकांनी जाणीवपूर्वक हे सर्वेक्षण केले आहे. मात्र, केरळचे पुढील मुख्यमंत्री कोण होतील, याचा निर्णय फक्त आमचाच पक्ष घेईल. दुसरीकडे, केरळमधील काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांनी असा दावा केला की, या सर्वेक्षणामागे भाजपाचा हात आहे. दरम्यान, शशी थरूर हे वारंवार पक्षविरोधी भूमिका घेत असल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.