Shashi Tharoor Differs With Congress Again केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत तीन महत्त्वाची विधेयके मांडली. गंभीर गुन्हेगारी आरोपांमध्ये अटक झाल्यास किंवा ताब्यात घेतल्यास पंतप्रधानांपासून ते राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि जम्मू व काश्मीरसह केंद्रशासित प्रदेशांच्या मंत्र्यांना पदच्युत करण्याची तरतूद या विधयेकांद्वारे केली आहे. विधेयकातील प्रस्तावित तरतुदींनुसार, जर एखादा मंत्री गंभीर गुन्ह्याच्या (पाच वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेचे गुन्हे) प्रकरणात सलग ३० दिवस तुरुंगात असेल, तर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती त्याला पदावरून काढून टाकू शकतील.
या विधेयकाला काँग्रेस आणि इंडिया आघाडीने जोरदार विरोध केला. विरोधक इंडिया आघाडीने बुधवारी भाजपाप्रणीत एनडीए सरकारवर तीन दुरुस्ती विधेयकांवरून गंभीर आरोप केले. मात्र, शशी थरुरांनी या विधेयकांना आपला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस आणि शशी थरूर यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेमकं प्रकरण काय? शशी थरूर नक्की काय म्हणाले? जाणून घेऊयात.
विधेयकांवरून विरोधकांचे आरोप
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक, २०२५, केंद्रशासित प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक, २०२५, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२५ सादर केले.
- मतचोरीच्या आरोपांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
- या प्रस्तावित कायद्याला लोकशाही व्यवस्थेवरील उघड हल्ला असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी प्रस्तावित कायद्याला हुकूमशाही म्हटले. प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या, “ही पूर्णपणे हुकूमशाही आहे. त्याला भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून सादर करणे म्हणजे लोकांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यासारखे आहे. उद्या कोणत्याही मुख्यमंत्र्यावर कोणताही खटला दाखल केला जाऊ शकतो. त्याला दोषी ठरवल्याशिवाय ३० दिवसांसाठी अटक केली जाऊ शकते आणि मुख्यमंत्री पदावरून हटवले जाऊ शकते. हे पूर्णपणे संविधानविरोधी आहे.”
शशी थरुरांची भूमिका काँग्रेसविरोधी?
शशी थरूर यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याची प्रशंसा केली होती. त्यावेळी काँग्रेस आणि शशी थरूर यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. मात्र, आता काँग्रेसबरोबरच्या त्यांच्या संबंधांमध्ये पुन्हा एकदा मतभेद दिसून आले आहेत. यावेळी त्यांनी गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणाऱ्या मंत्र्यांना पदावरून हटविण्याच्या विधेयकावरून त्यांनी पुन्हा एकदा पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले, “जर तुम्ही ३० दिवस तुरुंगात असाल, तर तुम्ही मंत्री म्हणून काम चालू ठेवू शकता का? हा सामान्य ज्ञानाचा भाग आहे. मला यात काहीही चुकीचे दिसत नाही; पण जर यामागे काही दुसरे असेल, तर मला ते त्याविषयी आधी समजून घ्यावी लागेल.”
ही विधेयके संसदेत मांडण्यात आल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. आता ही विधेयके निवड समितीकडे पाठविले जाण्याची शक्यता आहे. थरूर यांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले की, जर हे विधेयक अभ्यासासाठी पाठवले गेले, तर ही एक चांगली बाब आहे. ते म्हणाले, “जर त्यावर संयुक्त संसदीय समितीमध्ये चर्चा झाली, तर ही एक चांगली गोष्ट आहे. माझ्या मते, सर्व विषयांवर समित्यांमध्ये चर्चा होणे आपल्या देशासाठी एक चांगली गोष्ट आहे.” सोमवारी भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यावरील विशेष चर्चेतून काँग्रेसने माघार घेतल्यावर थरूर यांनी काँग्रेसवर टीका केल्याचेही दिसून आले.
शशी थरूर आणि काँग्रेसमधील मतभेद
थरूर आणि काँग्रेस यांच्यात २०२१ पासून तणाव पहायला मिळत आहे. २०२१ मध्ये ते G-23 गटात सामील झाले होते आणि राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, आता हे संबंध अधिकच बिघडल्याचे चित्र आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्याने काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली. जेव्हा त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पहलगाम आणि ‘ऑपरेशन सिंदूर’वर भूमिका मांडण्यासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर पक्षाची नाराजी वाढत गेली. थरूर यांनी त्यांच्या आणि काँग्रेसमधील मतभेद मान्यही केले आहेत. त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली; पण त्या भेटीतून काहीच निष्पन्न झाले नाही. गेल्या महिन्यात ‘एनडीटीव्ही’शी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली.
त्यांना काँग्रेसबरोबरचे त्यांचे संबंध कसे आहेत, यावर प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी सांगितले की, ते गेल्या १६ वर्षांपासून पक्ष आणि त्याच्या विचारधारेशी निष्ठावान आहेत. थरूर यांनी भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेचे खंडन केले आहे. मोदींच्या गतिमानतेबद्दल केलेल्या टिप्पणीनंतर ते म्हणाले, “काही लोक म्हणताना दिसत आहेत की, मी पंतप्रधानाच्या पक्षात जाण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, तसे काहीही नाही.”