रत्नागिरी : रत्नागिरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आजी – माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार बाळ माने यांनी केलेल्या आरोपांवर पालकमंत्री उदय सामंत यांच्या पदाधिका-यांनी माने यांना पत्रकार परिषद घेऊन सडतोड उत्तर दिले आहे. या सर्व प्रकारामुळे शिंदे व ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे रत्नागिरीतील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे.

रत्नागिरीतील राजकीय वातावरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच रंगू लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते व माजी आमदार बाळ माने यांनी रत्नागिरीतील विकासाबाबत मंत्री उदय सामंत यांच्यावर घाणाघाती आरोप केले होते. रत्नागिरीला आता आपल्या सारख्या सिंघम आमदाराची गरज असल्याचे माने यांनी सांगितले आहे. या माने यांच्या वक्तव्याचा समाचार मंत्री उदय सामंत यांच्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत घेतला आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदेश मयेकर, बाबू म्हाप यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी बाळ माने हे ‘सिंघम’ नसून, रत्नागिरीच्या जनतेने नाकारुन चार वेळा थुंकून ‘चिंगम’ केले आहे. अशी वक्तव्य करुन बाळ माने यांचा सर्व रोख केवळ चर्चेत राहण्यासाठी आहे. यापुढे अशी टीका केल्यास ‘जशास तसे’ उत्तर देण्यात येईल, असा इशाराच बंदरकर यांनी दिला आहे. तसेच केवळ पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करण्याशिवाय त्यांना दुसरे कोणतेही काम उरलेले नाही, असे बंदरकर यांनी सांगितले.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे फक्त रत्नागिरीपुरते मर्यादित नेते नाहीत, तर ते राज्यातील आघाडीच्या फळीतील नेते आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर आज त्यांचे नाव घेतले जाते. त्यांनी केवळ रत्नागिरीतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. एवढ्या मोठ्या नेत्यावर टीका केली तरच लोक आपल्याकडे लक्ष देतील आणि आपले राजकीय अस्तित्व टिकेल, यासाठीच बाळ माने यांचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. यापुढे अशी टीका सहन केली जाणार नाही, यापुढे बाळ माने यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंत यांच्या पदाधिका-यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेनंतर माजी आमदार बाळ माने यावर पुन्हा काय उत्तर देणार याकडे आता जिल्हा वासियांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां आधीच रत्नागिरीतील राजकीय वातावरण तापू लागल्याने राजकारणाला मोठी रंगत येवू लागली आहे.