-संतोष प्रधान
महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा वरचष्मा असून, मित्र पक्षांपुढे काँग्रेसची फरफट झाली आहे. सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या हक्काच्या जागा मित्र पक्षांसाठी तडजोड कराव्या लागल्याची स्थानिक काँग्रेस नेत्यांची भावना झाली आहे. जागावाटपावरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची कबुली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आणि नाराजांची समजूत काढू, असे स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे जागावाटप राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले. जागावाटपाच्या सूत्रानुसार शिवसेना २१, काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी १० जागा लढविणार आहे. काँग्रेसला १८ किंवा १९ जागांची अपेक्षा होती. राष्ट्रवादीला नऊ जागा सोडाव्यात, असे सुरुवातीला प्रस्तावित होते. पण राष्ट्रवादीने १० जागा पदरात पाडून घेतल्या. महाविकास आघाडीत शिवसेना मोठा भाऊ ठरला आहे.

eknath shinde sanjay raut (1)
“२०१९ मध्ये शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, पण…”, राऊतांनी सांगितल्या आतल्या घडामोडी; फडणवीस-तटकरेंचा उल्लेख करत म्हणाले…
Will Sharad Pawar NCP merge with Congress
शरद पवारांची ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसमध्ये विलीन होणार का? सोनियाविरोधी भूमिकेचं काय?
Jayant Patil on Supriya Sule
‘शरद पवारांचं पुत्री प्रेम कधीच दिसलं नाही’, सुप्रिया सुळेंच्या समोरच जयंत पाटील यांचं विधान
BJP confused by Prime Minister Narendra Modi appeal regarding Shiv Sena NCP
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाने सारेच संभ्रमात; नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीने ‘रालोआ’त यावे!
chadrashekhar bawankule
दोन पक्ष संपण्याच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीला टोला; म्हणाले…
praful patel
भाजप नव्हे, काँग्रेसमुळेच राष्ट्रवादी नेत्यांची बदनामी
Nana Patole, Sharad Pawar
काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन करण्याच्या पवारांच्या विधानावर नाना पटोलेंचं भाष्य; म्हणाले, “अनेक पक्षांचा…”
Leaders of Mahavikas Aghadi ignore Yavatmal-Washim
महाविकास आघाडीच्या नेत्यांची यवतमाळ-वाशिमकडे पाठ?

हेही वाचा – पीडीपीनंही काश्मीरमधून तीन उमेदवार उतरवले निवडणुकीच्या रिंगणात; नॅशनल कॉन्फरन्सशी थेट होणार टक्कर

शिवसेनेने सांगली, राष्ट्रवादीने भिंवडी आणि वर्धा या जागा स्वत:कडे घेतल्या आहेत. वास्तिवक विदर्भात राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादीला आतापर्यंत फारसे कधी यशही मिळालेले नाही. तरीही जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीने स्वत:कडे घेतली. राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार नसताना काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली. यामुळेच वर्धा जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचा राष्ट्रवादीला जागा सोडण्यास तीव्र विरोध होता. तरीही काँग्रेस नेत्यांनी वर्ध्याची जागा राष्ट्रवादीला सोडली.

सांगलीत शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेसची ताकद अधिक आहे. पण उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवार जाहीर करून काँग्रेसच्या दाव्याकडे दुर्लक्ष केले. सांगलीवरून काँग्रेस नेत्यांनी माघार घेणार नाही, अशी भाषा केली. पण ऐनवेळी शेपूट घातली, अशीच पक्षात प्रतिक्रिया आहे. भिवंडीतील मुस्लीम मतदार हे काँग्रेस किंवा समाजवादी पक्षाला मतदान करतात. राष्ट्रवादीला या मतदारसंघात कधीच यश मिळालेले नाही. तरीही सांगलीची जागा राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. सुरेश म्हात्रे यांच्यासाठी ही जागा मिळालीच पाहिजे, अशी राष्ट्रवादीची भूमिका होती. काँग्रेस नेते कितपत सहकार्य करतील याबाबत साशंकता व्यक्त केली जाते.

हेही वाचा – काशी-मथुरा, समान नागरी कायदा आणि मतदार संघांची पुनर्रचना; नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास काय निर्णय घेऊ शकतात?

दक्षिण मध्य मुंबई या जागेवर काँग्रेसचा आग्रह होता. धारावी, वडाळा, चेंबूर, दादर-माहिम परिसराचा समावेश असलेल्या या मतदारसंघात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या इच्छुक होत्या. पण ही जागा शिवसेनेच्या अनिल देसाई यांच्यासाठी सोडण्यात आली आहे. देसाई यांच्या तुलनेत गायकवाड अधिक प्रभावी ठरल्या असत्या, असा काँग्रेसमध्ये मतप्र‌वाह आहे.

काँग्रेसची नेहमीच मवाळ भूमिका

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहत असे. राज्यातील काँग्रेस नेते जागावाटपावरून आक्रमक होत असत. अगदी आघाडी तोडण्याची भाषा करीत असत. पण दिल्लीतील नेत्यांकडून मवाळ भूमिका घेतली जात असे. यामुळे राष्ट्रवादीच्या मनाप्रमाणे जागावाटप होत असे. असाच प्रकार महाविकास आघाडीच्या बाबत झाला आहे. सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागांवरून काँग्रेस नेते आग्रही होते. पण दिल्लीतील नेत्यांनी मित्र पक्षांचे समाधान करून स्वपक्षीयांना नाराज केले आहे. या नाराजीचा महाविकास आघाडीला कितपत फटका बसू शकतो, याचा अंदाज आता घेतला जात आहे.