Sanjay Gaikwad controversy मुंबईतील आमदार निवासात दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाच्या आरोपावरून कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते, आमदार संजय गायकवाड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक त्यांच्यावर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना यावर प्रतिक्रिया देत म्हटले की, विषारी पदार्थ तयार करणाऱ्या व्यक्तीची मी पूजा करणार नाही. संजय गायकवाड आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी आणि त्यांच्या आक्रमक शैलीमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अलीकडेच छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या एका व्यक्तव्याने ते वादात अडकले होते. कँटिन कर्मचाऱ्याच्या मारहाणीचे नेमके प्रकरण काय? संजय गायकवाड यांच्याभोवतीचे वाद काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

नेमकं प्रकरण काय?

  • संजय गायकवाड यांनी मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील एका कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला.
  • त्यांनी मागवलेल्या डाळीला दुर्गंध येत असल्याचा आणि त्यामुळे उलटी झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
  • हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आणि त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. परंतु ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही आपल्या विधानांमुळे आणि कृतींमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
संजय गायकवाड यांनी मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील एका कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

गायकवाड आणि वादाचे समीकरण

छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान : त्रिभाषा सूत्राच्या प्रश्नावर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना छत्रपती संभाजी राजे व छत्रपती शिवराय यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता, यामुळे संपूर्ण राज्यात शिवभक्तांच्या भावना दुखावून वाद निर्माण झाला होता. मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेंवर टीका करताना त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले होते. या वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त करत विरोधक माझ्या शब्दाच्या अर्थाचा अनर्थ करत असल्याचा आरोप केला होता.

राहुल गांधींना धमकी : राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, अशी प्रक्षोभक घोषणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून करण्यात आली होती, त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही घोषणा केली होती. काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली होती.

मतदारांना शिवीगाळ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी मतदारांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. बुलढाण्यात एका कार्यक्रमानिमित्त आयोजित सभेमध्ये त्यांनी मतदारांवर टीका केली होती. “तुम्ही मला साधं एक मत देऊ शकत नाही? फक्त दारू, मटण, पैसे? अरे दोन दोन हजारांत विकले गेले साले. दोन हजारात? पाच हजारात? यांच्यापेक्षा तर रांXXX बऱ्या”, असे संजय गायकवाड म्हणाले होते.

संजय गायकवाड मारहाणीबाबत काय म्हणाले?

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “जर कोणी मला विष पाजले तर मी त्यांची पूजा करेन का? बाळासाहेबांनी (बाळासाहेब ठाकरे) आम्हाला ते शिकवले नाही. त्यांनी आम्हाला शिकवले की जर एखादी व्यक्ती अज्ञानी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे,” असे गायकवाड म्हणाले. त्यांनी असाही दावा केला की, आकाशवाणी निवासस्थानाच्या कँटीन चालकांना जेवणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी वारंवार विनंत्या करण्यात आल्या आहेत, मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी ‘एएनआय’ला सांगितले, “मी गेल्या ३० वर्षांपासून आकाशवाणी कँँटीनमध्ये येत आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून येथे राहतो आहे. मी वारंवार त्यांना चांगले जेवण देण्याची विनंती केली आहे. अंडी १५ दिवसांची, मांस १५ ते २० दिवसांचे, भाज्या २ ते ४ दिवसांच्या. जवळजवळ ५,००० ते १०,००० लोक येथे जेवतात आणि प्रत्येकाची हीच तक्रार आहे” असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, कँटीनमध्ये पूर्वी दिल्या जाणाऱ्या जेवणात पाल, उंदीर आढळून आले होते.

ते पुढे म्हणाले, “मी काल रात्री १० वाजता जेवण ऑर्डर केले आणि जेवल्यानंतर मला काहीतरी गडबड आहे असे जाणवले. त्याचा वास आल्यानंतर मला ते शिळे अन्न असल्याचे समजले. मी खाली गेलो आणि अन्न तयार करणाऱ्या व्यवस्थापकाला विचारले. मी सर्वांना अन्नाचा वास घ्यायला लावला आणि सर्वांना ते शिळे असल्याचे समजले. मी त्यांना समजावून सांगितले की, त्यांनी स्वच्छ आणि चांगले अन्न तयार करावे. विषारी अन्न खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे,” असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओविषयी बोलताना ते म्हणाले, “जर ते ऐकत नसतील, तर त्यांना समजावून सांगण्याची माझी स्वतःची पद्धत आहे. दरवर्षी सरकारकडे हजारो तक्रारी येतात आणि मला माहीत नाही की त्यांच्याकडे दुर्लक्ष का केले जाते. त्याची चौकशी का केली जात नाही? स्वयंपाकघरात उंदीर आणि घाण असते, याची तपासणी केली पाहिजे, पण कोणीही काळजी घेत नाही. लोकांच्या आरोग्याशी खेळू नये म्हणून मी त्यावर कारवाई करण्याची विनंती करतो,” असे गायकवाड म्हणाले. हा मुद्दा ते सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करतील असेही म्हटले.