scorecardresearch

संजय राऊत म्हणतात, “चंद्रशेखर बावनकुळेंनी ‘ते’ वक्तव्य केलं आणि दोन दिवसांतच एकनाथ शिंदेंचं भूखंड….”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेमका काय आरोप केले आहे वाचा सविस्तर बातमी

संजय राऊत म्हणतात, “चंद्रशेखर बावनकुळेंनी ‘ते’ वक्तव्य केलं आणि दोन दिवसांतच एकनाथ शिंदेंचं भूखंड….”
संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे?

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियन प्रकरण बाहेर काढलं. त्यावेळी त्यांनी AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा उल्लेख बिहार पोलिसांनी केल्याचं सांगितलं. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आज हिवाळी अधिवेशनात उमटलेले पाहण्यास मिळाले. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एसआयटी चौकशी केली जाईल असे आदेश दिले आहेत. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा एकनाथ शिंदे यांना पदावरून खाली खेचण्यासाठी हा सगळा डाव भाजपानेच रचल्याचं म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वक्तव्य केलं होतं त्यात मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं म्हटलं होतं. त्यानंतर दोन दिवसातच मुख्यमंत्र्यांचं भूखंड प्रकरण बाहेर आलं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंनी ते वक्तव्य केलं आणि…
संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्यामागे भाजप आमदारांचाच हात आहे. ज्या भूखंडावरून तत्कालीन नगरविकास मंत्र्यांवर आरोप केले जात आहेत तो मुद्दा खरंतर भाजपाच्या आमदारांनी तारांकीत प्रश्न म्हणून उपस्थित केला होता. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण लटके यांचा समावेश होता. त्यामुळे भाजपाच्याच आमदारांनी तारांकित केलेला प्रश्न आम्ही लावून धरला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण आहोत तोवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर दोनच दिवसात मुख्यमंत्र्यांच्या विरोधातलं हे प्रकरण समोर आलं. त्यामुळे त्यांना पदावरून खाली खेचण्यासाठीच हा डाव भाजपाने रचला आहे असंही संजय राऊत म्हणाले.

राहुल शेवाळेंना आदित्य ठाकरेंवर बोलायचा अधिकारच काय?
राहुल शेवाळेंना आदित्य ठाकरेंवर आरोप करण्याचा अधिकारच काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरेंचा विषय काढून अकारण तरूण नेत्याला बदनाम केलं जातं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जे भ्रष्टचाराच्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच हे कारनामे केले जात आहेत असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

sanjay-raut-eknath-shinde (1)
संजय राऊत एकनाथ शिंदे ( संग्रहित छायाचित्र )

एकनाथ शिंदे यांचं सरकार पडणार हे निश्चित
एकनाथ शिंदे यांच्यावर जे आरोप झाले आहेत तो नागपूर न्याय भूखंड घोटाळा इतका गंभीर आहे की त्यात १०० कोटींपर्यंतचा गैरव्यवहार आहे. त्यावर फक्त आम्हीच नाही तर न्यायालयानेही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे मी लिहून देतो हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही त्याआधीच हे सरकार कोसळणार हे निश्चित आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंवर जे आरोप झाले आहेत त्यावरून लक्ष हटवण्यासाठीच आदित्य ठाकरेंवर आरोप

एकनाथ शिंदेंवर जे आरोप झाले आहेत त्यावरून लक्ष हटवण्यासाठी दिशा सालियन प्रकरण, आदित्य ठाकरेंवर आरोप हे सगळं प्रकरण बाहेर काढण्यात आलं. १०० कोटींपर्यंतचे गैरव्यवहार आहेत. रेवड्या वाटाव्यात तसे भूखंड वाटले आहेत. हे प्रकरण आपल्यावर शेकणार हे लक्षात येतात लक्ष विचलित करण्यासाठी आदित्य ठाकरेंवर आरोपांची चिखलफेक करण्यात येते आहे. काही कारण नसताना त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 18:26 IST

संबंधित बातम्या