दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांनी आपल्या मृत मुलासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मन्सा मतदारसंघातून २०२७ ची विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. २९ मे २०२२ रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मुलाच्या तिसऱ्या पुण्यतिथीच्या काही दिवस आधी त्यांनी ही घोषणा केली आहे.

निवडणूक लढविण्याच्या निर्णयामागील कारण काय?

बलकौर सिंग म्हणाले की, त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय आपल्या मुलाला न्याय मिळावा म्हणून घेतला आहे. त्यांचा मुलगा शुभदीप सिंग सिद्धू हा सिद्धू मूसेवाला म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या वडिलांनी म्हटले, दीर्घ कालावधी उलटूनही, अनेक आरोपी अजून फरारी आहेत. त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही याबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली. बलकौर सिंग यांनी बोलताना भारतीय संविधानाचे रक्षण आणि पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करणे या गरजांवर त्यांनी भर दिला.

मन्सा येथे दिवसाढवळ्या त्यांच्या मुलाची निर्घृण हत्या झाली, असे म्हणत बलकौर सिंग यांनी पंजाब सरकार आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर राज्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यात, दोषींवर कठोर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचीदेखील टीका केली. बलकौर सिंग म्हणाले की, मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी ते राजकारणात प्रवेश करणार आहेत. सार्वजनिक सुरक्षा पुनर्संचयित करणे आणि लोकांसाठी आवाज उठवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

बलकौर सिंग मनसा येथून लढवणार निवडणूक

मन्सा मतदारसंघाचे प्रतीकात्मक महत्त्व आहे. याचे कारण असे की, २०२२ मध्ये सिद्धू मूसेवाला यांनी स्वतः याच मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला होता. आता याच मतदारसंघातून त्याच्या वडिलांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या निर्णयावर सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी बलकौर सिंग यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे; तर काहींनी त्यांच्यावर राजकीय फायद्यासाठी ते त्यांच्या मुलाच्या प्रसिद्धीचा वापर करीत असल्याचा आरोप केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाबच्या मनसा जिल्ह्यात सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनी गेल्या वर्षी १७ मार्च रोजी बलकौर सिंग (वय ६०) आणि त्यांची पत्नी चरण कौर (वय ५८) यांनी एका बाळाला जन्म दिला. त्यासाठी या जोडप्याने इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) पद्धत निवड केली होती. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची तब्बल ३० गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. या हत्याकांडामागे बिश्नोई गँग असल्याचेही समोर आले होते.