Smriti Irani on Tulsi Virani Role : माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेत पुन्हा ‘तुलसी विरानी’ हे पात्र साकारणार असल्याची घोषणा केली. राजकारणात येण्याआधी याच मालिकेमुळं त्यांना घराघरात ओळख मिळाली होती. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना इराणी यांनी अभिनय क्षेत्रात पुनरागमन करण्यामागचं कारण, मनोरंजन क्षेत्रात झालेला बदल याबाबत परखड मतं मांडली. तसंच आपण राजकारणातून बाजूला झालेलो नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिलं. नेमक्या काय म्हणाल्या स्मृती इराणी? त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

प्रश्न : तुम्ही पुन्हा अभिनय करण्याचा निर्णय का घेतला?

या प्रश्नाचं उत्तर देताना स्मृती इराणी म्हणाल्या, “ही एक मर्यादित भागांची मालिका आहे. मला उदय शंकर (JioHotstar चे उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखालील समूहाबरोबर काम करायचं होतं. त्यांना पत्रकारितेतील व दिल्लीतील राजकारणाचा चांगला अनुभव आहे आणि एकता कपूर… जिने एक मोठा सर्जनशील प्रवास केला आहे. आजच्या काळातील तरुण पिढीला भिडणाऱ्या मुद्द्यांकडे ती कशी पाहते, हे मला जाणून घ्यायचं होतं. मी याआधी कधीही ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम केलं नव्हतं, त्यामुळे सध्या मी निरीक्षणाच्या भूमिकेत आहे आणि अर्थातच अभिनय करायची तयारीही करीत आहे.”

प्रश्न : तुम्ही जेव्हा सेटवर पाऊल ठेवलं, तेव्हा लोकांनी कसा प्रतिसाद दिला? आणि दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत तो कसा वेगळा होता?

स्मृती इराणी म्हणाल्या, “मला सांगितलं गेलं की, नव्या पिढीच्या कलाकारांबरोबर बसून तुम्हाला स्क्रिप्ट वाचावी लागेल, जेणेकरून त्यांना तुमच्याबरोबर अगदी सहजपणे काम करता येईल. त्यानुसार मी त्यांच्यासोबत दीड तास बसले. दशकभरापूर्वी जेव्हा मी अभिनय करायचे, तेव्हा कधीच अशी तयारी केली जात नव्हती. मात्र, आजकाल खूप तयारी करून घेतली जाते.” इराणी पुढे म्हणाल्या, “मी जेव्हा त्यांच्याबरोबर बसले तेव्हा ते मला राजकीय चर्चांबद्दल, राज्यातील राजकारण, संसद कशी कार्य करते, कायदे कसे तयार केले जातात इत्यादी गोष्टी विचारत होते. ते केवळ कलाकार नव्हते, तर लेखक, क्रिएटिव्ह डायरेक्टरसुद्धा होते. मला असं वाटलं की हा एक मीडिया वर्कशॉप नव्हे, तर एक राजकीय वर्कशॉप आहे. ते सर्व वेगवेगळ्या राज्यांतील, वेगवेगळ्या भाषांतील आणि वेगवेगळ्या विचारसरणी असलेली मुलं आहेत. आम्ही सर्व एकत्र येऊन राजकारणावर चर्चा करतो, हे फारच अनाकलनीय होतं.”

आणखी वाचा : शिवसेना ते राष्ट्रवादी काँग्रेस मार्गे भाजपा; सतत वादात सापडणारे मंत्री माणिकराव कोकाटे कोण आहेत?

“मी माझं राजकारण आणि अभिनय हे दोन आयुष्य वेगळेच ठेवले होते. माझे काही जुने सहकारी मला विचारतात की, इतकं सगळं तुला येतं हे आम्हाला आधी माहीतच नव्हतं. गेल्या काही दशकांपासून जे माझ्याबरोबर राजकारणात आहेत, त्यांनी माझा हा अभिनयाचा पैलू एक दशकभर पाहिलाच नव्हता. मी नुकतंच बिजनौरला एका सहकाऱ्याच्या भेटीला गेले होते. तिथे अचानक एक कार्यकर्ता पुढे आला आणि म्हणाला- दीदी, माझ्या आईला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे. त्यांना हेदेखील कळालं होतं की, मी पुन्हा मालिकेत काम करणार आहे. आता हे दोन वेगळे जग एकत्र येऊ लागले आहेत, जे पूर्वी कधीच घडलं नव्हतं.”

प्रश्न : राजकारण आणि अभियन या दोन्ही भूमिका कशा सांभाळणार?

स्मृती इराणी म्हणाल्या, “अभिनय आणि राजकारण या दोन्ही भूमिका मी यापूर्वीही यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत. केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मध्यंतरी मी अभिनयातून थोडा ब्रेक घेतला होता; पण त्यावेळी मी इतकी ठळकपणे लोकांसमोर आली की, त्यांनी मला फक्त मंत्री म्हणूनच पाहिलं. २००३ मध्येही माझ्याकडे भाजपाची संघटनात्मक जबाबदारी होती. दोनवेळा राष्ट्रीय सचिव व महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी असतानाही मी अभिनयात सक्रिय होते. अमेठीत राजकीय इतिहास घडवणारी मी कदाचित एकमेव व्यक्ती असेन. गेल्या दहा वर्षांत एक नवी पिढी मोठी झाली आहे, जी मला फक्त राजकारणी म्हणूनच ओळखते; पण त्याआधी मी एक काल्पनिक पात्रही साकारलं आहे.”

प्रश्न : तुम्हाला राज्यसभेसाठी नामांकित खासदार म्हणून पाठवले जाईल, अशी चर्चा होती…

स्मृती इराणी यांना राज्यसभेचे सदस्यत्व मिळणार अशी अटकळ लावली जात होती. मात्र, त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “माझं वय ४९ असून मी अजूनही राजकारणात सक्रिय आहे. माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या अनेक लोकांनी समाजासाठी आणि पक्षासाठी मोठं काम केलं आहे. जर कोणी असं म्हणू शकत असेल की वय माझ्या बाजूने आहे, तर ती व्यक्ती मीच आहे,” असं स्मृती इराणी म्हणाल्या. “मी तीन वेळा खासदार झाले असून पाच मंत्रालयं सांभाळली आहेत. मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळात मी सर्वात तरुण मंत्री होते, हे सर्वांनाच माहीत आहे. मंत्री म्हणून मी लोकांच्या मनात इतकी खोलवर रुजले आहे की, लोक मला दुसऱ्या कोणत्याही रूपात पाहू शकत नाहीत”, असंही त्या म्हणाल्या.

प्रश्न : सध्या तुम्ही ना सरकारमध्ये आहात ना संसदेत, त्यामुळे काहीतरी गमावत असल्याचं तुम्हाला वाटतं का?

स्मृती इराणी म्हणाल्या, “२०११ मध्ये मी पहिल्यांदा खासदार झाले आणि त्याआधी संसदेत नव्हते, त्यामुळे मला काहीच गमावल्यासारखं वाटत नाही. उलट लोकांना माझी उणीव कशी भासेल याकडे मी लक्ष देत असते. आजही तळागाळातील कार्यकर्ते माझ्याबरोबर संपर्कात असतात. राजकारण हे सोपं क्षेत्र नाही; पण मी अशा अनेक उत्कृष्ट लोकांना पाहिलं आहे, जे देशसेवेच्या भावनेने इथे आले आहेत. भाजपामधील माझ्या अनेक सहकाऱ्यांसाठी राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हतं, तर देशासाठी काहीतरी निर्माण करण्यासाठी होतं. आपला सहकारी पुढे जातो तेव्हा त्याच्या यशात आनंद मानणं हे आमच्या पक्षसंस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, भूपेंद्र यादवभाई आणि धर्मेंद्र प्रधानभाई यांनी मंत्री म्हणून केलेली कामगिरी याचा मला खूपच आनंद आहे. आम्ही एकमेकांच्या यशात खरोखर आनंद मानतो, हेच खरे भाजपा कार्यकर्त्याचे गुण आहेत.”

प्रश्न : ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’च्या नव्या भागात काही सामाजिक किंवा राजकीय संदेश असेल का?

“ही कहाणी जरी काल्पनिक असली, तरीही ती आपल्या सध्याच्या जीवनातील काही पैलूंना स्पर्श करणारी आहे. आजच्या पिढीशी संबंधित, त्यांना विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यांचा त्यात समावेश आहे. वास्तव दाखवणं सोपं असतं; पण तेच वास्तव कल्पनाविलासी कथा आणि अभिनयातून दाखवणं खूप कठीण असतं. त्यासाठी संतुलन साधावं लागतं. मी चॅनेल आणि प्लॅटफॉर्मच्या मर्यादा लक्षात घेऊनच काम करीत आहे. तुम्ही जर मालिकेचा प्रोमो बघितला तर लक्षात येईल की तो कोणत्याही पात्रावर नाही, तर स्मृती इराणी यांच्यावर आधारित आहे. ही गोष्ट GEC (जनरल एंटरटेनमेंट चॅनेल) च्या इतिहासात कधीच घडलेली नाही. यातून हे अधोरेखित होतं की, एका वळणावर दोन आयुष्यं एकत्र येत आहेत. लेखकांनी हे पात्र लिहिताना काळाच्या बदलाबरोबर आजच्या कुटुंबांशी ते सुसंगत राहील याची काळजी घेतली आहे. तुलसीचे पात्र काळ कसा बदलतो याची जाणीव करून देतं; पण मूल्यव्यवस्था मात्र तशीच कायम आहे.”

Smriti Irani interview on Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi
माजी केंद्रीय मंत्री व भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी (छायाचित्र दी इंडियन एक्स्प्रेस)

प्रश्न : ही मालिका एका गुजराती कुटुंबाभोवती फिरते, त्यामुळे गुजराती संस्कृतीला कितपत प्रोत्साहन मिळालं?

“या मालिकेतील कुटुंब गुजराती असून, त्यामुळे त्या संस्कृतीला मोठा वाव मिळाला आहे. मात्र, यावेळी कथानकात वेगवेगळ्या संस्कृतींचं मिश्रण पाहायला मिळेल”, असं स्मृती इराणी यांनी सांगितलं. “मी पारशी कुटुंबात लग्न करून गेले आहे; पण तरीही लोक मला शुद्ध गुजराती व्यक्ती म्हणून ओळखतात, यावरून लेखकाने लिहिलेल्या व्यक्तिरेखेचा प्रभाव स्पष्ट होतो,” असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीआधी ६०० जणांचे फोन टॅपिंग? पोलिसांचा नेमका दावा काय?

प्रश्न : तुम्ही मालिकेत नकारात्मक भूमिका करणार का?

“मी नकारात्मक भूमिका साकारू शकत नाही. काही लोकांना मी राजकारणात नकारात्मक वाटत असेन; पण अभिनयात माझ्यात तशी क्षमता नाही. मी माझ्या राजकीय आणि माध्यमांतील निवडीत स्वत:वर कोणतीही मर्यादा लावत नाही, पण मी एक जबाबदार राजकारणी आहे याचं मला भान आहे; म्हणूनच अंधश्रद्धा पसरवणाऱ्या संवादांबाबतही माझा दृष्टिकोन स्पष्ट आहे. जर एखादं पात्र अंधश्रद्धा पसरवत असेल, तर त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी याचा विचार करावा लागतो. तुमचं पात्र अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं नसावं, याची जबाबदारी कलाकार म्हणूनही घेतली पाहिजे,” असं स्मृती इराणी यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रश्न : तुम्ही सेटवर असताना पावसाळी अधिवेशनाचे अपडेट्स फॉलो करणार का?

सध्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेचं चित्रण सुरू आहे. मात्र, शूटिंगमध्ये व्यस्त असतानाही संसदेत काय चाललंय, याकडे लक्ष ठेवणार असल्याचं स्मृती इराणी यांनी सांगितलं. “मी कायमच संसदीय घडामोडी लक्षपूर्वक पाहते. मी कधीच राजकारणातून बाहेर गेले नव्हते आणि आजही सक्रिय आहे,” असंही त्या म्हणाल्या.