सोलापूर : भाजपने सर केलेल्या सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात या पक्षाचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या दोन्ही तरूण आमदारांमध्ये जोरदार लढत होणार असल्याचे चित्र सुरूवातीलाच स्पष्ट झाले आहे. राम सातपुते हे मूळचे बीड जिल्ह्यातील राहणारे असल्यामुळे त्यांना उपरा ठरविण्याची रणनीती काँग्रेसने आखली असताना दुसरीकडे सातपुते यांनी या लढाईला ‘ माजी मुख्यमंत्र्याची कन्या विरूध्द ऊसतोड मजुराचा मुलगा ‘ असे वळण देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र प्रचारात जागोजागी उपरेपणावरच खुलासा करण्यातच सातपुते यांचा वेळ खर्च होत असल्याचे दिसून येते.

मागील २०१४ आणि २०१९ सालच्या सलग दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा दारूण पराभव झाल्यामुळे यंदा या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे रणांगणात उतरल्या आहेत. तत्पूर्वी, राज्यात व देशात भाजप भरती जोरात सुरू असताना राज्यात काँग्रेस पक्षातही मोठी फूट पडून त्यात आमदार प्रणिती शिंदे सुध्दा भाजपमध्ये जाणार आणि सोलापूर लोकसभेची जागा भाजपच्या कमळ चिन्हावर लढविणार असल्याची चर्चा अनेक दिवस सुरू होती. त्यावर दोन-तीनवेळा खुलासा करूनही त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा थांबत नव्हती. अखेर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी गृहीत धरून प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघाशी संपर्क वाढविण्यास सुरूवात केली आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली. तेव्हा कुठे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या उठलेल्या वावड्या थांबल्या. कन्येसाठी सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात संपर्क वाढवून डावपेच आखायला सुरूवात केली असताना दुसरीकडे भाजपमध्ये तोडीस तोड उमेदवार ठरत नव्हता. शेवटी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना रिंगणात उतरविण्यात आले. मूळ संघ परिवाराशी संबंधित असलेले आणि अभाविपमधूर जडणघडण झालेले राम सातपुते यांनी उमेदवारी मिळताच सोलापुरात येऊन आक्रमकपणे प्रचाराला सुरूवात केली. आमदार प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना उद्देशून लिहिलेले पत्र समाज माध्यमांतून प्रसारित झाले. या पत्रातच प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांच्या उमेदवारीचे स्वागत करताना त्यांच्या उपरेपणावर सभ्य भाषेत नेमकेपणाने बोट ठेवले. ही बाब सातपुते यांना झोंबली आणि त्यांना आजही खुलासा करीत फिरावे लागत आहे. यात त्यांना उपरेपणाच्या मुद्यावर जखडून ठेवण्यात प्रणिती शिंदे यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : चावडी: शुक्राचार्य कोण ?

सातपुते यांनी या लढतीला ‘ माजी मुख्यमंत्र्याची कन्या विरूध्द ऊसतोड मजुराचा मुलगा ‘ असा रंग देऊन सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असताना त्यातून सातपुते यांच्या श्रीमंतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्यावर सातपुते यांनीही सुशीलकुमार शिंदे यांनी कमावलेल्या मालमत्तेचा हिशेब देण्याचे आव्हान देत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. फरंतु प्रणिती शिंदे यांनीही सातपुते यांना उद्देशून वडिलांवर कसली टीका करता, तुमच्या विरोधात मी उमेदवार आहे. माझ्याशी भिडा, असे आव्हान दिले. सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री असताना मालेगाव व अन्य ठिकाणी घडलेल्या बाॅम्बस्फोटाच्या संदर्भात हिंदू दहशतवादाचा उल्लेख केला होता. त्यावरून भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसला घेरून अडचणीत आणले होते. हा जुना मुद्दा आता सोलापुरात लोकसभा निवडणुकीत पुन्हा उकरून काढून धार्मिक ध्रुवीकरणाचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा करिष्मा समोर आणण्याचा डाव भाजपकडून आखला जात असताना काँग्रेसने स्थानिक विकासाच्या प्रश्नावरच प्रचाराची रणनीती आखल्याचे दिसून येते. मागील दहा वर्षे भाजपचे लागोपाठ दोन खासदार असताना केवळ त्यांच्या निष्क्रियतेमुळे सोलापूरचा विकास कसा मागे पडला ? आणि आता उपरा उमेदवार निवडून दिल्यास सोलापूरची आणखी अधोगती होईल, असा प्रचाराचा केंद्रबिंदू असलेला मुद्दा काँग्रेसकडून आणला जात आहे. मागील २०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीसारखी तेवढी सोपी परिस्थिती भाजपची राहिली नाही. मागील दहा वर्षातील खासदारांच्या निष्क्रियतेवर नागरिकांमध्ये नकारात्मक भावना दिसून येत आहे. त्याचा फटका बसू नये म्हणून भाजपला खूप प्रयत्न करावे लागणार असल्याचे बोलले जाते.